ग्रामसभा नियम व अटी Gram Sabha Niyam In Marathi

 

ग्रामसभा नियम व अटी Gram Sabha Niyam In Marathi पंचायतराज मध्ये ग्रामसभेला अनन्य साधारण महत्व आहे. ग्रामसभा ही खऱ्या अर्थाने लोकशाही संस्था आहे. ग्रामस्थांच्या सहभागातून ग्रामपंचायतीच्या कारभार अधिक पारदर्शक व्हावा, तळागाळातील लोकांचा आवाज शासनापर्यंत पोहचावा म्हणून, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ७ अ अन्वये प्रत्येक गावासाठी एक ग्रामसभा अस्तित्वात आली.

ग्रामसभा नियम व अटी | ग्रामसभा म्हणजे काय | ग्रामसभा कलम | ग्रामसभा माहिती | ग्रामसभा ठराव | gram sabha in marathi | ग्रामसभा शासन निर्णय

ग्रामसभा म्हणजे काय?

प्रत्येक गावातील ग्रामसभा (Gram Sabha) ही गावांचे हक्काचे व्यासपीठ असते. ती गावातील 'लोकसभा' असते. गावातील लोकांनी एकत्र यावे, लोकांच्या गरजा काय आहेत त्या ग्रामपंचायतीला सांगाव्यात आणि गावांच्या भल्यासाठी कोणत्या योजना अगोदर घ्याव्यात हे सुचवावे, गावाच्या विकासाच्यादृष्टीने ग्रामपंचायतीला सल्ला द्यावा आणि मार्गदर्शन करावे. थोडक्यात सांगावयाचे झाले तर, ग्रामपंचायतीच्या कारभारात गावातील ग्रामस्थांचा सहभाग असेलेले गावातील लोकांचे व्यासपीठ म्हणजेच ग्रामसभा. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे, कलम ७ व ८ अन्वये ग्रामसभा घेण्याची तरतूद आहे. 

महाराष्ट्र ग्रामपंचायत (Gram Panchayat) अधिनियमच्या ग्रामसभेबाबत तरतुदी

• ग्रामसभेचे सदस्य गावातील मतदार व्यक्ती (मतदार यादीत नाव असलेले १८ वर्षावरील ग्रामस्थ) ग्रामसभेचे सदस्य असतील.

• प्रत्येक आर्थिकवर्षात (१ एप्रिल ते ३१ मार्च) निदान सहा ग्रामसभा ग्रामपंचायतीस घेण्यास बंधनकारक आहे.

• एका आर्थिक वर्षात सरपंच सहा ग्रामसभापैकी एकही ग्रामसभा घेण्यास चुकल्यास, त्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन, निलंबनास पात्र असेल. 

•  पहिली ग्रामसभा त्या आर्थिक वर्षाच्या सुरवातीच्या दोन महिन्यांच्या आत घेणे आवश्यक आहे. 

• ग्रामसभेच्या दोन सभा दरम्यान चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी असता कामा नये. 

• ग्रामसभेचे पदसिध्द अध्यक्ष सरपंच हे असतील. सरपंचाच्या अनुपस्थितीत उपसरपंच अध्यक्षस्थानी असेल. या दोघांच्या अनुउपस्थितीत ग्रामसभेत उपस्थित असलेल्या व्यक्तींकडून निवडलेली एखादी व्यक्ती अध्यक्षस्थानी राहील.

• ग्रामसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे अध्यक्ष यांनी किंवा ते ज्यांना आदेशीत करतील त्यांनीं देणे बंधनकारक आहे. 

• ग्रामसभेचे व्हिडिओ चित्रिकरण करणे, फोटो काढणे आवश्यक आहे. (शासन परिपत्रकानुसार).

• स्थायी समिती, पंचायत समिती किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी तसचे राज्यशासन यांच्याद्वारे फर्मावलेली कोणतेही कार्य ग्रामसभा पार पाडील.


• ग्रामसभेच्या महिला सदस्यांची सभा ग्रामसभेच्या नियमित सभेपूर्वी घेण्यात यावी. 

• ग्रामसभेसाठी मतदारांची उपस्थिती तसेच, महिलांची उपस्थिती वाढवण्यासाठी प्रचार व प्रसिद्धीसाठी ग्रामपंचायतीने खबरदारी घ्यावी. 

• सरपंचाला स्वतःहोऊन कोणत्याही वेळी ग्रामसभा बोलविण्याचा अधिकार असेल. तसेच, स्थायी समिती, पंचायत समितीने किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने किंवा राज्य शासनाने ग्रामसभेची मागणी केल्यावर सरपंचास पंधरा दिवसाच्या आत ग्रामसभा बोलावणे अनिवार्य असेल.

• ग्रामसभा, तिच्या पुढील सभेचा दिनांक, वेळ आणि ठिकाण तिच्या आगोदरच्या सभेत निश्चित करेल.

• ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी तसेच, गावात काम करणारे शासकीय, निम-शासकीय आणि पंचायतीचे सर्व कर्मचारी ग्रामसभेच्या सभांना हजर राहणे आवश्यक आहे. 

• ग्रामस्तरावरील कर्मचारी व अधिकारी जसे की तलाठी, कृषी सहाय्यक, वनपाल, शिक्षक, वायरमन, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य सेवक इत्यादींनी ग्रामसभेत उपस्थित राहून त्यांच्या कामाचा आढावा ग्रामसभेस देणे त्यांना बंधनकारक आहे. 

• ग्रामसभेस किमान १०० किंवा एकूण मतदारांच्या १५ टक्के यापैकी जी संख्या कमी असेल ती गणपूर्ती संख्या समजण्यात येईल.

• ग्रासभेचे कार्यवृत्त (विवरण), ग्रामपंचायतीचा संबंधित सचिव (ग्रामसेवक) तयार करील. किंवा त्याच्या अनुउपस्थित सरपंच निदेश देईल त्याप्रमाणे, ग्रामपंचायतीचा कर्मचारी तयार करील.

• ग्रामपंचायत प्रत्येक सहामाहीमध्ये एकदा, विकासकामांवर  केलेल्या खर्चाचा अहवाल ग्रामसभेत ठेवील व त्याची माहिती ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर लावील.

• ग्रामस्थांनी ग्रामसभेत मांडलेल्या सर्व बाबींवर चर्चा केली जाईल आणि त्यावर ग्रामपंचायत विचार करील.

हे देखील वाचा : ग्रामपंचायत कर व फी नियम

ग्रामसभेचे वेळापत्रक

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ७ नुसार सहा सभापैकी चार सभेचे आयोजन एप्रिल-मे, ऑगस्ट, नोव्हेंबर व दिनांक २६ जानेवारी रोजी आयोजित करणे बंधनकारक आहे. ग्रामसभेची पहिली सभा ही त्या वर्षाच्या सुरवातीनंतर दोन महिन्यांच्या आत भरविण्यात आली पाहिजे.


ग्रामसभेची पूर्वतयारी

१. ग्राम सभेची नोटीस ही लेखी स्वरूपात किमान ७ दिवस देणे आवश्यक आहे. 

२. ग्रामसभेचा प्रचार प्रसिद्धी दवंडीद्वारे व गावातील सार्वजनिक ठिकाणी नोटीस लावून करण्यात यावी. तसेच, मोबाईल एस.एम.एस द्वारे प्रसिद्धी करावी.

३. ग्रामसभेची सूचना, नोटीस गाव पातळीवर सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांना दिली पाहिजे.

४. ग्रामसभेमध्ये ऐन वेळी घ्यावयाचे विषय लेखी स्वरूपात ग्रामसभेच्या तारखेपूर्वी दोन दिवस अगोदर सरपंच/ग्रामसेवाकडे देणे आवश्यक असते.

५. प्रत्येक ग्रामसभेपुर्वी सदस्यांनी आपापल्या वार्डात वार्डसभा घेणे बंधनकारक आहे.

ग्रामसभेचे कामकाज

आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेमध्ये पंचायतीचा मागील आर्थिक वर्षाचा प्रशासन अहवाल, जमा खर्चाचे विवरण, लेखा परीक्षण अहवाल, लेखा परीक्षणास दिलेली उत्तरे व चालू वर्षाचा विकास कार्यक्रम हे विषय घेणे बंधनकारक आहे. (कलम ८ अन्वये). हे विषय ग्रामसभेमध्ये मान्यतेसाठी न ठेवल्यास सरपंचाला पदावरून दूर करण्याची कारवाई होऊ शकते. 

इतर ग्रामसभेमध्ये प्रामुख्याने विकास कामांचा आराखडा, वैयक्तिक लाभाच्या योजनांअंतर्गत लाभार्थी निवड (घरकुल, वैयक्तिक शौचालय इत्यादी), महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा आर्थिक आराखडा तसेच, आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकास मान्यता देणे आणि विविध योजनांमधून घ्यावयाच्या कामांचा समावेश करणे आवश्यक असते.

ग्रामसभेचे अधिकार व कर्तव्य

१. गावात राबविण्यात येणाऱ्या सामाजिक किंवा आर्थिक योजना, कार्यक्रम व प्रकल्प ग्रामपंचायतीने हाती घेण्यापूर्वी त्यास मान्यता देणे.

२. विकास योजनांवर कोणताही खर्च करण्याची परवानगी ग्रामपंचयतीला देणे.

३. ग्रामसभा राज्य किंवा केंद्र सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना करिता लाभधारकांची निवड करणे. 

४. आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकास मान्यता देणे.

५. कोणतीही भूमी संपादन करण्यापूर्वी ग्रामपंचायतीने आपले मत कळवण्याआधी ग्रामसभेचे मत घेणे आवश्यक आहे.

६. तंटामुक्ती समिती, ग्राम शिक्षण समिती, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, लेखा परीक्षण समिती इत्यादी सारख्या समित्या निवडायचे अधिकार ग्रामसभेस असतात.

हे देखील वाचा : नवीन ग्रामपंचायत स्थापना निकष अटी


ग्रामसभा ठरावांची अंमलबजावणी

१. ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी सरपंच/ग्रामसेवक यांनी करायची असते.

२. ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरवांबाबत संबंधित शासकीय विभागांशी विहित वेळेत पत्रव्यवहार करण्याची जबाबदारी ग्रामविकास अधिकारी (ग्रामसेवक) यांची असते. सरपंच यांनी याचा पाठपुरावा करून घेणे आवश्यक असते.

३. ग्रामसभेचे इतिवृत्त पंचायत समितीकडे ७ दिवसाच्या आत सादर करणे आवश्यक आहे. 

ग्रामसभा संबंधित शासन निर्णय व परिपत्रके

ग्रामसभेचे कार्यवृत्त फलकावर लावणे बंधनकारक

दिनांक २५, जून, २०१४ रोजीच्या शासन निर्णय क्र. संग्राम-२०१४-प्र.क४३/संग्राम कक्ष नुसार १ एप्रिल, २०१४ पासून, राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी ग्रामसभा/मासिक सभा/ महिला सभा/वार्ड सभा व विविध समित्यांच्या बैठकांचे कार्यवृत्त/इतिवृत्त ग्रामपंचायतीच्या फलकावर लावणे तसेच, ग्रामपंचायतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक केले आहे. तसेच, ग्रामसभा व इतर सभेच्या सूचना/नोटीस देताना, विहित केलेल्या नमुन्यातच देण्यात यावीत. 

ग्रामसभा उधळणाऱ्यावर होणार कडक कारवाई

शासनाने प्रसिद्ध केलेल्या, दिनांक १२ ऑगस्ट, २०१४ रोजीच्या परिपत्रकानुसार, ग्रामसभा उधळणाऱ्यावर कडक कारवाई करावी, महिलांसाठी ३० टक्के निधी खर्च करावा व ग्रामसभेचा अध्यक्ष फक्त सरपंच असावा इत्यादी बाबींसाठी शासनाने तज्ज्ञांची समिती गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. सदर समिती सदर बाबींचा सखोल अभ्यास करून आणि छाननी करून शासनास अहवाल सादर करण्यात येईल. 

आदर्श गौरव ग्रामसभा स्पर्धा

ग्रामसभेबाबत अधिक जागृती होण्याच्या दृष्टीकोनातून मा. यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्मरणार्थ 'आदर्श गौरव ग्रामसभा स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा पुरस्कार प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका ग्रामपंचायतीला देण्यात येतो. यामध्ये जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामसभेला १ लाख रुपये रोख रक्कम व मानचिन्ह देण्यात येते. आदर्श ग्रामसभा निवडीचे निकष शासन परिपत्रक क्रमांक व्हीपीएम-२०१३/प्र.क.२८०/प.रां- ३ यामध्ये दिले आहेत.

ग्रामपंचायतीची मासिक सभा

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम ३६ नुसार आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत नियम १९५९ मधील तरतुदी नुसार आर्थिक वर्षातील सहा ग्रामसभे व्यतिरिक्त प्रत्येक महिन्यात किमान एक मासिक सभा घेणे सरपंच/उपसरपंचांना बंधनकारक आहे. यात गावातील ग्रामस्थांचा सहभाग नसतो. यामध्ये सभेची नोटीस सभेपुर्वी किमान तीन दिवस अगोदर ग्रामपंचायत सदस्यांना देणे आवश्यक आहे. तसेच, विषयपत्रिका अंतिम करण्याचा निर्णय सरपंच यांना असतो. मासिक सभेचे अध्यक्ष सरपंच असतात. सरपंचाच्या अनुपस्थितीत उपसरपंच व उपसरपंचाच्या अनुपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांपैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. 

सरपंच/उपसरपंचानी पुरेसे कारण नसताना, ग्रामपंचायतीची मासिक सभा बोलविण्यास कसूर केली तर प्रशासकीय कारवाई होऊ शकते. तसेच, सलग ६ महिने सभेस गैरहजर राहणाऱ्या सदस्यांना अध्यक्ष, जिल्ह्यापरिषद अपात्र ठरवतील.

हे देखील वाचा : ग्रामपंचायत मासिक सभा नियम

टीप: ग्रामपंचायतींच्या मासिक सभांना ग्रामस्थांची उपस्थिती असावी म्हणून, पालघर जिल्ह्यातील, जिल्ह्या परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारींनी नुकत्याच सूचना दिल्या आहेत. त्यामुळे, हा आदेश राज्य शासनाकडून राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींना लवकरच लागू होण्याची शक्यता आहे.


ग्रामपंचायतीने ग्रामसभेचे नियम मोडले तर काय?

• एकूण मतदारांपैकी २० टक्के मतदारांनी आर्थिक हिशोब ग्रामसभेसमोर न ठेवल्यासंबधी तक्रार केल्यास ग्रामपंचायतीच्या सदस्याला/सरपंचाला किंवा उपसरपंचला पदावरून काढून टाकण्याचा अधिकार आहे.

• आर्थिक गैरव्यवहारास ग्रामसेवक (सचिव), आणि सरपंच संयुक्तपणे जबाबदार असतात.

• खर्चाचा अहवाल ग्रामसभेपुढे ठेवण्यास ग्रामसेवकाने कसूर केल्याचे आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाते.

ग्रामसभेत कोणत्याही कर्मचाऱ्याकडून घडलेली नियमबाह्य गोष्टीबाबत संबंधित गटविकास अधिकारीकडे (BDO) लेखी अहवाल देता येईल. गटविकास अधिकारी यावर तीन महिन्यांच्या कालावधीत आपला निर्णय देईल. परंतु, आणखी असे की, गट विकास अधिकारीने निकाल देण्यात काही कसूर केली तर, अहवाल जिल्हा परिषदेच्या मूख्य कार्यकारणी अधिकारीकडे हस्तांतरित होईल. आणि त्याचा निर्णय अंतिम असेल.

ग्रामस्थांनी ग्रामसभेत उपस्थित का रहावे?

जर का गावाचा सार्वांगणी विकास साधायचा असेल तर, ग्रामसभेत ग्रामस्थांचा सहभाग असणे गरजेचे आहे. गावासंबंधीत विकासकामे मंजूर करण्याचा अधिकार ग्रामसभेला नसला तरीही, ग्रामसभेत गावचा विकास आराखडा तयार करण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे फक्त वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या मर्यादेपुरते ग्रामसभेत उपस्थित न राहता प्रत्येक ग्रामसभेत आवर्जून उपस्थित रहावे हे गावातील लोकांचे प्रथम सामाजिक कर्तव्य आहे. ग्रामसभेबाबत असलेली उदासीनता झटकून, लोकांनी ग्रामपंचायतीच्या कारभारात आवर्जून सहभाग घेतला तर नक्कीच देशातील गावे-खेडी खऱ्या अर्थाने समृद्ध होतील.

हे देखील वाचा : ग्रामसभा - आमच्या गावात आम्हीच सरकार

माहिती आवडली तर नक्कीच आपल्या समाज बांधवांसोबत शेअर करा. आणि ग्रामसभा नियम व अटी संबंधित काही प्रश्न असतील तर खाली टिप्पणी करून कळवा किंवा संपर्क फॉर्म भरुन माझा गाव ला संपर्क करा.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

• सरपंच व उपसरपंच मानधन २०२१

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा

महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान २०२१

दिव्यांग व्यक्ति हक्क अधिनियम २०१६


टिप्पणी पोस्ट करा

12 टिप्पण्या

  1. उपयुक्त माहिती आपल्या कडून मिळत आहे मला अजून थोडी माहिती हवी आहे आपणाकडून ग्रामपंचायत पाणीपुरवठा विहिरी अधिग्रहण दोन वर्षांपूर्वी झाले आहे आणि दोन वर्षांपूर्वी सदर विहिरीचे बांधकाम झाले तरी अद्यापपर्यंत पाइपलाइनद्वारे पाणी गावात आणण्यास संबंधित कोणतीही उपाययोजना ग्रामपंचायतीने केली नाही तरी आपण या संबंधी माहिती सादर करावी ही विनंती

    उत्तर द्याहटवा
  2. ग्राम पंचायत शिरोळे ता.भिवंडी येथे शासनाने ठरवुन फिक्स केलेली 26 जानेवारी 2020 रोजिची ग्रामसभा दी.27 जानेवारीला घेण्यात आली ती 104 ग्रामस्थ चे उपस्थित 50% महिला हजर आवश्यक असताना 35 महिला चे उपस्थित त्याचा इतीअहवाल सुध्दा BDO भिवंडी ला पाठवला नाही ग्रामसेवक व सरपंच यांचेवर आजपावेतो कारवाई झाली नाही

    उत्तर द्याहटवा
  3. ग्राम पंचायत rajur जिल्हा सोलापूर
    आमच्या गावात सार्वजनिक शौचालय 8, 10 वर्षा पासून बंद आहे त्याची दुरुस्ती करण्यात आले नाही
    त्यामुळें गावातील लोक रस्त्याच्या कडेला शौच करतात त्यामुळे गावात येण्या जाण्या चां मार्गावर खूप दुर्गंध येतो
    व अशी गावची परस्तीती असताना देखील गावात
    हागणदारी मुक्त गावात आपले स्वागत आहे अशा प्रकारची बोर्ड लावण्यात आलेली आहे
    माझी ही तक्रार कोणाला देऊ
    कळवा

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपण सर्व गावकरी मिडून करू शकता आपली अडचण गावकरीचे नियोजन

      हटवा
  4. १) गावातील ‌‌‌‌‌सार्वजनिक‌ जागेवर अतिक्रमण ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌
    केलेले ग्रामस्थ ग्रामसभेस उपस्थित राहुन
    ग्रामसभेत भाग घेऊ शकतो का?
    २) घरपट्टी पाणीपट्टी थकबाकीदार‌ ग्रामसभेला उपस्थित राहुन ग्रामसभेत भाग घेऊ शकतो का?

    उत्तर द्याहटवा
  5. ग्रामपंचायत ने खाजगी जागेवर(वयक्तिक) जागा मालकाची परवानगी न घेता, पुर्वसुचनेशिवाय अतीक्रमण करुन सरकारी पैशाने बांधकाम केल्यास ग्रामपंचायत वर काय कारवाई होईल?

    उत्तर द्याहटवा
  6. ग्रामसभेत मंजूर केलेले ठराव मासिक सभेत बदलता येतात काय ?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मे इदिरा नगर तिरुपती नगर पुसद जिल्हा यवतमाळ चा रहिवाशी असून आमच्या एरिया मध्ये आतापर्यंत नाली बांधणी चे काम झालेले नाही आम्ही टॅक्स पण भरतो टाइम्स वर आणि आमच्या एरिया मध्ये पाणी ची सुविधा पण नाही आहे मे आता कोणाला तक्रार करू...

      हटवा
  7. ग्रामसभा ही गावातील मंदिरा मध्ये घेतली तर चालते का ? तसेच ग्रामसभा गावातील मंदिरा मध्ये घेण्या साठी काय करायला पाहिजे नियम आटी सांगा

    उत्तर द्याहटवा
  8. पहिली ग्रामसभा जय तहकूब असेल तर तहकूब ग्रामसभा घेण्यासाठी पहिल्या ग्रामसभे प्रमाणे प्रसिद्धी करने बंधन कारक आहे का व पहिल्या ग्रामसभे मध्ये सभेची जी वेळ आहे ती वेळ बदलता येऊ शकते का दुसर्या सभेच्या नोटिसा सदस्यांना देने बंधन कारक नाहि का

    उत्तर द्याहटवा
  9. ग्रामसभा घेण्यासाठी गावातील किती लोकसंख्या उपस्थिती असणे आवश्यक आहे.

    उत्तर द्याहटवा
  10. गावातील रस्त्यावर सार्वजनिक वस्तु ठेवण्यासाठी काय करावे लागेल

    उत्तर द्याहटवा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.