ग्रामपंचायत मासिक सभा नियम Gram Panchayat Masik Sabha Niyam Marathi

 

ग्रामपंचायत मासिक सभा नियम Gram Panchayat Masik Sabha Niyam in Marathi ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक होऊन, सुरळीतपणे चालावा तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असलेले ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व सदस्य यांमध्ये विचारविनिमय व्हावा म्हणून एका आर्थिक वर्षात सहा ग्रामसभे व्यक्तिरिक्त, दरमहा एक मासिक सभा ग्रामपंचायतीला घ्यावी लागते. या सभेला 'ग्रामपंचायतीची मासिक बैठक' किंवा 'ग्रामपंचायतीची सभा' असेही म्हटले जाते. या सभेचे कामकाज सुव्यवस्थीत चालावे म्हणून ग्रामपंचायत मासिक सभेचे नियम शासनाने पुढीलप्रमाणे ग्रामपंचायत अधिनियम कायद्यात निर्गमित केलेले आहेत.

ग्रामपंचायत मासिक सभा नियम | Gram Panchayat Masik Sabha Niyam Marathi | ग्रामपंचायत मासिक सभेत ग्रामस्थांची उपस्थिती | ग्रामपंचायत मासिक सभेचे ठळक मुद्दे/बाबी । ग्रामपंचातीची सभा । ग्रामपंचायतीची मासिक बैठक

ग्रामपंचायत मासिक सभा नियम:

१. दरमहा किमान एक मासिक सभा आवश्यक

२. ग्रामपंचायत मासिक सभेची पूर्वसूचना

३. ग्रामपंचायत मासिक विशेष सभा

४. ग्रामपंचायत मासिक सभेचे अध्यक्षपद

५. ग्रामपंचायत मासिक सभेचे ठिकाण

६. ग्रामपंचायत मासिक सभेची गणपूर्ती

७. ग्रामपंचायत मासिक सभेतील ठराव

८. ग्रामपंचायत मासिक सभेच्या कामकाजाचा कार्यवृत्तांत

९. ग्रामपंचायत मासिक सभा घेणे बंधनकारक


१. दरमहा किमान एक मासिक सभा आवश्यक:

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम ३६ नुसार आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत मासिक सभेबाबत नियम १९५९ मधील तरतुदीनुसार प्रत्येक महिन्यात किमान एक मासिक सभा म्हणजेच एका आर्थिक वर्षात बारा मासिक सभा घेणे सरपंच/उपसरपचांना बंधनकारक असते.

२. ग्रामपंचायत मासिक सभेची पूर्वसूचना:

मासिक सभेची नोटीस सभेपुर्वी किमान पूर्ण तीन दिवस अगोदर ग्रामपंचायत सदस्यांना देणे/बजावणे आवश्यक आहे. सभेच्या नोटीसीमध्ये दिनांक, वेळ, ठिकाण व विषयपत्रिकेचा समावेश असावा.

३. ग्रामपंचायत मासिक विशेष सभा:

ग्रामपंचायतीच्या सरपंचास किंवा त्याच्या अनुपस्थित उपसरपंचास कोणत्याही वेळी स्वतः पुढाकार घेऊन विशेष मासिक सभा बोलविण्याचा अधिकार असतो. तसेच, ग्रामपंचायत सदस्य संख्येच्या निम्म्या किंवा त्याहून जास्त सदस्यांनी लेखी मागणी केल्यास, अशी मागणी केल्यापासून आठ दिवसांच्या आता विशेष सभा बोलवणे आवश्यक असते. विशेष सभेसाठी किमान एक दिवस अगोदर सर्व सदस्यांना त्या सभेची पूर्वसूचना देणे आवश्यक असते.

४. ग्रामपंचायत मासिक सभेचे अध्यक्षपद:

मासिक सभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून सरपंच असतात. त्यांच्या अनुपस्थित उपसरपंच किंवा उपसरपंचाच्या अनुपस्थित, उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांपैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. परंतु, अशा सदस्याच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू असताना मध्येच सरपंच किंवा उपसरपंच यांपैकी कोणी उपस्थित झाला तर अध्यक्षस्थानी असलेल्या सदस्याने सरपंच व उपसरपंच यांच्यासाठी जागा रिकामी करावी लागते.

५. ग्रामपंचायत मासिक सभेचे ठिकाण:

ग्रामपंचायतीची प्रत्येक मासिक सभा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात किंवा गावातील चावडीत भरविणे बंधनकारक असते. प्रत्येक सभेची तारीख, वेळ व ठिकाण यासंबधीची सूचना ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर लावली जाते.

६. ग्रामपंचायत मासिक सभेची गणपूर्ती:

मासिक सभेची गणपूर्ती होण्याकरीता १/३ सदस्यांची उपस्थिती आवश्यक आहे. ही उपस्थिती मोजताना सरपंच, उपसरपंच यांचा समावेश करावा लागतो. सभेची गणपूर्ती विहित वेळेत न झाल्यास, अर्धा तास वाट पाहूनही गणपूर्ती झाली नाही, अशी सभा तहकूब करण्यात येते. तसेच तहकूब झालेली सभा त्या दिवसानंतर इतर कोणत्याही दिवशी घेता येते. मासिक सभा तहकूब सूचनेची नोटीस प्रत्येक सदस्याला देण्याची तरतूद नाही.


७. ग्रामपंचायत मासिक सभेतील ठराव:

ठरावाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित अध्यक्ष, सचिव व ग्रामपंचायतीची असते. एखाद्या ठरावात बदल किंवा तो रद्द करायचा असल्यास, सदर ठराव तीन महिन्यानंतर सभेत चर्चा करून बहुमताने बदल किंवा रद्द करता येतो. एखाद्या ठरावावर एकमत न झाल्यास, अध्यक्ष यांनी सदर ठरावावर आवाजी, हात उंचावून किंवा गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेऊन त्यानुसार कारवाई करावयाची असते. एखाद्या ठरावास समसमान मते पडल्यास अध्यक्षांना निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे.

८. मासिक सभेच्या कामकाजाचा कार्यवृत्तांत:

सभेचे कामकाज संपल्यानंतर कार्यवृत्तांत लिहून अध्यक्ष व उपस्थित सदस्य यांचे सहीनिशी नोंद ठेवली जाते. सभेच्या कामकाजाची नोंद ठेवताना त्या सभेस उपस्थित असलेल्या सदस्यांची नावे, सभेत मांडले गेलेले ठराव, मतदानात भाग घेतलेल्या तसेच तटस्थ राहिलेल्या सदस्यांची नावे इत्यादी गोष्टींचा त्यामध्ये उल्लेख केला जातो. सदरचा कार्यवृत्तांत ७ दिवसांच्या आत पंचायत समितीला व स्थायी समितीस  सादर केला पाहिजे. याची जबाबदारी ग्रामसेवक (सचिव) यांची असते.

९. ग्रामपंचायत मासिक सभा घेणे बंधनकारक: 

किमान एक मासिक सभा महिन्यातून घेणे सरपंच यांना बंधनकारक आहे. तसेच सरपंच यांनी सभा बोलविण्यास कसूर केल्यास उपसरपंचानी ही सभा बोलवावी.  सरपंच / उपसरपंचानी मासिक सभा घेण्यास किंवा बोलविण्यास असमर्थता दर्शविल्यास अशी बाब ग्रामसेवकांनी गट विकास अधिकारी यांच्या निर्दशनास आणून द्यावयाची असते.

सरपंच / उपसरपंचानी मासिक सभा घेण्यास कसूर केल्यास सरपंच व उपसरपंचावर अपात्रतेची कारवाई ग्रामपंचायत अधिनियम कलम ३६ नुसार होऊ शकते. सभा न घेण्याचे कारण पुरेसे होते कि नाही, याचे अधिकार जिल्ह्याधिकारी यांना आहेत. मासिक सभा न बोलविल्यास ग्रामसेवक/सचिव यांचेवर प्रशासकीय कारवाई होऊ शकते.

हे देखील वाचा : ग्रामपंचात सरपंच,उपसरपंच,सदस्य अपात्रता

ग्रामपंचायत मासिक सभेचे ठळक बाबी/मुद्दे: 

• मासिक सभेची विषयपत्रिका अंतिम करण्याचा अधिकार सरपंच यांना आहे.

• तीन किंवा तीनपेक्षा अधिक सदस्यांनी एखादा विषय, विषय पत्रिकेत घेण्यासाठी सरपंच यांना नोटीस दिली, तर तो विषय, विषय पत्रिकेत घेणे सरपंचाना बंधनकारक आहे.

• जेव्हा एखाद्या मुद्द्यावर कायदेशीर इलाज होईल, त्या विषयावर ग्रामसेवेकाने स्वतःचे कायदेशीर मत नोंदविणे  अभिप्रेत असते.

• मासिक सभा ठरावाची अंमलबजावणी करण्याकरिता संबधित विभागाला ठराव सादर करण्याची जबाबदारी सरपंच व ग्रामसेवक यांची असते.

• सदस्यांच्या मागणीवरून एखादा विषय बहुमतानी मंजूर केल्यास व तो ठराव गावाच्या हितासाठी बाधा निर्माण करणारा असेल तर सरपंचाला असा ठराव स्थगित करण्याचे अधिकार असतात. सरपंच असा ठराव ग्रामसभेत मांडवा लागतो. त्यावर ग्रामसभेचा निर्णय अंतिम असतो.

• सलग ६ महिने सतत गैरहजर राहणाऱ्या सदस्यांना अध्यक्ष, जिल्ह्यापरिषद हे अपात्र ठरविण्याचे अधिकार असतात. तशी त्यांच्याकडे तक्रार आल्यास, त्याला बाजू मांडण्याची संधी देऊन जिल्ह्याधिकारी निर्णय देतात.


ग्रामपंचायत मासिक सभेत ग्रामस्थांची उपस्थिती?

पालघर जिल्ह्यातील एका कार्यकर्त्याने ग्रामविकास विभागाशी पाठपुरावा केल्यास, पालघर जिल्हाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासनाचे परिपत्रक क्र. पीआरसी १०७७/२७०३/सीआर- २७३२ दि. १९/०९/१९७८ रोजीचा संदर्भ देताना, मासिक सभेस ग्रामस्थांची उपस्थिती असावी असे पत्रात नमूद केले होते. या पत्रामुळे राज्यातील ग्रामपंचायत स्तरावर संभ्रम निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ग्रामस्थांची उपस्थिती असल्यास ग्रामसभेला किती महत्त्व उरणार? ग्रामपंचायतीच्या सदस्यांना अधिकारच शिल्लक राहणार नाहीत? ग्रामसभा कशी होणार? यांसारखे अनेक प्रश्न सामाजिक माध्यमांतून उपस्थित झाले. तर काहीजणांनी ग्रामस्थांना ग्रामपंचायत मासिक सभेत उपस्थित राहता येते परंतु, चर्चेत सहभाग किंवा मतदानाचा हक्क बजावता येत नाही याचे संदर्भ दिले. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात याबाबत अस्पष्ट संकेत आहेत. या विषयीचा स्पष्ट शासन निर्णय किंवा परिपत्रक नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. त्यामुळे, मुळात प्रशासनच याबाबत संभ्रमात असल्याचे दिसून येते. या कारणांमुळे, ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ग्रामसस्थांची उपस्थित असावी की नाही? याबत अजुनही प्रश्नचिन्हचं आहे.

ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ग्रामस्थांची उपस्थितीचा प्रश्न मांडताना, लोकशाहीचा साक्षात्कार असलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांची किती उपस्थिती असते? ही देखील विचार करण्यासारखी बाब आहे. त्यामुळे मासिक सभेतील ग्रामस्थांची उपस्थिती आहे की नाही? या मुद्द्यावरील चर्चेत व्यर्थ उर्जा घालत बसण्यापेक्षा, ग्रामसभेचे अधिक बळकटीकरण कसे केले जाईल याचा विचार केला तर कधीही उत्तमच !

हे देखील वाचा : ग्रामसभा बळकटीसाठी मार्गदर्शक सूचना

ग्रामपंचायत मासिक सभा नियम बाबत दिलेली माहिती आवडल्यास खाली टिपण्णी करून अवश्य कळवा.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

ग्रामसभा नियम व अटी 

ग्रामपंचायतीची विविध बँक खाती

ग्रामपंचायत आशास्वयंसेविका कर्तव्य व जबाबदारी

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.