नमस्कार ! वाचक मित्रहो,
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्यांची आज काय दुरावस्था होत चालली आहे हे मला नव्याने सांगायची गरज नाही. जगाच्या इतिहासामध्ये एवढे सुंदर,भव्य गडकिल्ले असतील तर ते फक्त भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये. आणि हेच महाराष्ट्राचं खरं वैभव, महाराष्ट्राची संपत्ती आणि महाराजांची आठवण होय. आणि आजच्या या काळामध्ये महाराजांच्या या आठवणीकडे कोणाचंच कसं लक्ष नाही? असं वाटायला लागतं. खरंच! गडकिल्यांची ही झालेली दुरावस्था म्हणजे, अवघ्या महाराष्ट्राचं दुर्दैवच म्हणावे लागले. सरकार फक्त महाराजांच्या नावाखाली आतापर्यंत राजकारण करत आले आहे, आजचा काहीसा तरुण वर्ग त्या गडकिल्ल्याकडे फक्त पर्यटन स्थळ म्हणून पाहत आहे. प्रेमी- युगल साठी तर गडकिल्ले म्हणजे मोक्याचं ठिकाण होऊन बसलं आहे. गडकिल्ले संवर्धन करणाऱ्या संस्था आहेत महाराष्ट्रामध्ये, पण त्या ही हाताच्या बोटाने मोजता येतील येवढयाचं. अश्यामध्ये या गडकोटाचें जतन, त्यांचं संरक्षण कोणी करायचे? आजच्या युवा पिढीला या गोष्टीचं गांभीर्य लक्षात आणून देणं ही काळाची गरज आहे. नाहीतर महाराष्ट्राचं हे खरं वैभव नामोशेष व्हायला वेळ लागणार नाही.
![]() |
'शिवमय' श्री सत्यनारायण महापूजा : पूर्वतयारी करताना मंडळाचे सदस्य |
रत्नागिरीतील लांजा तालुक्यातील, विघ्नहर्ता मित्र मंडळ, गावकर वाडी, मु. पो. पालू. या या सामाजिक मंडळाने गावातील तरुणांची भटकेली मने गडकिल्ले संवर्धनकडे वळण्यासाठी, श्री सत्यनारायण महापूजेनिमित्त गावात एक Save Forts of Chhatrapati Shivaji Maharaj सामाजिक उपक्रम राबविला. विघ्नहर्ता मित्र मंडळ या मंडळाबद्दल विशेष सांगायचे झाले तर, आपल्या गावापासून दूर, मुंबईमध्ये उदरनिर्वाह करण्यासाठी आलेले कोकणी चाकरमानी. जे देहाने जरी मुंबईत असले तरी, त्यांची मनं मात्र सदैव गावीच हरवलेली असतात. मुंबईतीलं धावपळीचं जीवन जगत असताना, आपल्या गावासाठी, लोककल्याणासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात.
तर दिवस ठरला, १४ मे, २०१९ रोजी सत्यनारायण महापूजे निमित्त गावकर वाडीला 'शिवमय-भगवी' करण्याचे या पट्ट्यांनी ठरवले. आणि त्यानुसार हे मावळे तयारीला लागले. अर्थातच, त्याची तयारी अगोदरच २ महिन्यापासून करण्यात आली होती. महाराजांच्या गडकिल्ल्यांची झालेली दुरावस्था, गडकिल्ले संवर्धन, करणे ही काळाची गरज आहे याचे फलक प्रदर्शन करून लोकांमध्ये गडकिल्ले संवर्धन करण्याची भावना रुजू व्हावी हाच ह्या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्ट होते. एकूण बॅनर्स किती? बॅनर्सचा आकार, बॅनरची जागा, बॅंनर्सच्या फ्रेम साठी लागणाऱ्या लाकडी रिपा इ. बारकाईने तयारी करण्यात आली. जेणेकरून ऐन वेळीस धावपळ होता कामा नये. महापूजेच्या १ दिवस अगोदर हे शिवरायांचे मावळे सर्व तयारीनिशी गावात दाखल झाले. १३ मे चा संपूर्ण दिवस आणि अगदी मध्यरात्री होई पर्यंत एकत्र येवून जो-तो उद्याची तयारी करण्यात दंग झाला होता. त्यांच्यातील प्रचंड उत्साहाने तहान, भूक, कुठच्या कुठे नाहीशी केली होती. वाडीच्या मुख्य प्रवेशाला एक भव्य किल्लेसम प्रवेशद्वार उभा करण्यात आला. रस्त्याच्या बाजूला महाराजांचा एक मोठा बॅनर लावण्यात आला. गडकिल्यांचे माहिती देणारे प्रदर्शन फलक, शिवकाळात वापरण्यात येणारी शस्त्रे आणि अवजारे यांचे माहिती देणारे फलक लावण्यात आले.
दुसरा दिवस उजाडला, सगळा परिसर झाडून -लोटून काढण्यात आला, जमिनीवर शेणाचा सडा पसरला, भगव्या पताका लावण्यात आल्या, संपूर्ण वाडीत असंख्य भगवे झेंडे फडकवले गेले. महाराजांची जिरेटोपची अप्रतिम रांगोळी काढण्यात आली. महापूजेच्या मकरजवळ रोहिडेश्वर मंदिरात शिवारांयांनी घेतलेल्या स्वराज्याच्या शपथेचं दृश्य उभं करण्यात आलं. शिवरायांचे आणि त्यांच्या मावळ्यांचे वाजणारे पोवाडे अंगामध्ये शहारे आणत होते. शिवरायांच्या स्फूर्ती देणाऱ्या गाण्यांनी आणि पोवाड्यांनी अवघी गावकर वाडी दुमदुमून गेली होती. पुरुषांनी पिवळा रंगाचा कुर्ता आणि फेटा, गळ्यात रुद्राक्षमाळ, आणि कपाळी चंद्रकोर अशी वेशभूषा केली होती, तर स्त्रियांनी नववारी परिधान केल्या होत्या. सायंकाळी स्त्रियांचा हळदकुंकू समारंभ पार पडला.
सांस्कृतिक स्पर्धाही उत्तमरित्या रंगल्या होत्या. यात पारंपरिक सांस्कृतिकस्पर्धे व्यतिरिक्त महाराजांवर निबंध स्पर्धा, महाराजांविषयाची प्रश्नो-उत्तरे इ. अनेक अनोख्या स्पर्धा घेण्यात आल्या. अवघ्या वाडीने किल्ल्याचं स्वरूप घेतलं होतं आणि त्या किल्यावर जणू काय शिवजन्मोस्तव साजरा होतोय, असं भासत होतं. सायंकाळी बक्षीस वितरण समारंभ करण्यात आला. विजेत्या स्पर्धकांस गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात आले. आणि त्यानंतर शेवटी गडकिल्ले सुरक्षित ठेवणे, त्यांचे जतन करणे ही काळाची गरज आहे हे पटवून देण्यासाठी अनके लोकांनी आपले विचार मांडले. अश्या तऱ्हेने 'गडकिल्ले संवर्धन करणे' हा अनोखा उपक्रम संपन्न झाला. त्यानंतर रात्री महापूजेनिमित्त कोकणचे प्रसिद्ध बहुरंगी नमन ठेवण्यात आले होते.
हा आंनदोउत्सव सोहळा संपता न संपताच दुसऱ्या दिवशी वाडीत एक दुःखद बातमी घडली. कै. कृष्णा नामे यांचे अकस्मित निधन झाले. येथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, महापूजेच्या दिवशी वयाची सत्तरी गाठलेल्या या थोर माणसाने छत्रपती शिवाजी महाराजानंवरील निबंध स्पर्धेत भाग घेऊन प्रथम क्रमांकाचं बक्षिस पटकावलं होतं. त्यांच्या या महाराजांबद्दल असलेल्या असीम श्रद्धेला खरंच दाद द्यावी लागेल. भगवंत त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना.
अश्या प्रकारे, या मावळयांनी केलेल्या मेहनतीचं चीज झालं होतं. आणि त्याचं समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होतं. पुढच्या वर्षी अश्याच एका नव्या उपक्रमाचे स्वप्न रंगवत हे चाकरमानी परत मुंबई नगरीत परतले, ते वर्षभराची ऊर्जा घेऊनच. चला महाराष्ट्राचे वैभव परत आणूया.
0 टिप्पण्या
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.