न्याय: छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेवर असतानाचा हा प्रसंग. Chhatrapati Shivaji Maharaj in Karnataka mohim in marathi
थंडीचे दिवस होते. राजे आपल्या तंबूच्या बाहेर आनंदरावांच्या सह उभे राजांचे सरदार सखुजी गायकवाड मुजऱ्याला आले.
राजांनी विचारले,
'काय, सखुजीराव छावणीची हालहवाल काय म्हणते?'
'सर्व ठीक आहे, महाराज, फक्त एकच कागाळी कानांवर आली आहे.'
'कसली कागाळी?'
'काल आपले काबडीचे बैल पुढच्या मुक्कामी जात असता बेलवडीच्या गढीच्या पाटलाने अडविले, आणि सामनासाहित पळवून नेले.'
राजे क्षणभर विचारात पडले. ते म्हणाले,
'सखुजीराव, काहीतरी गफलत झाली असेल. बेलवडी म्हणजे एवढी छोटी गढी. तिची ही हिंमत व्हायची नाही. पाटलांना समज देऊन बैल सोडण्याची आज्ञा करा.'
राजांची आज्ञा घेऊन सखुजीराव गेले. बेलवडी सपाट भूमीवर वसलेली, मातीच्या चौफेर कुशीने सजलेली छोटी गढी. त्या सपाट भूमीवर वसलेली ती गढी पावसाळी उगवलेल्या एकाकी अळंबीसारखी दिसत होती. पण त्या गढीचा पाटील मोठा हिंमतवान होता. सखुजी गायकवाडांचा निरोप जेव्हा त्याला कळला, तेव्हा त्याने एकच उत्तर दिले,
'हिंमत असेल, तर बैल सोडवून न्या!'
राजांना पाटलांचा निरोप कळला. राजांनी सखुजीरावांना हुकूम दिला,
'पाटील आपल्याच तोऱ्यात आहेत, असं दिसतं. सामारोप त्यांना मानवेल असं दिसतं नाही. ठीक आहे सखुजीराव, तुम्ही आपली कुमक घ्या, आणि बेलवडी काबीज करून बैल ताब्यात घ्या. तोवर आमचा तळ येथेच राहील.'
सखुजीरावांनी आपल्या स्वरांनिशी बेलवडीची नाकेबंदी केली.चौफेर चौक्या जारी केल्या. क्वचित चकमकी झडू लागल्या. पण बेलवडीला मराठी फौज भिडेना. भिडण्याचा प्रयत्न केला, तर हिरिरीने प्रतिकार केला जाई. कर्नाटकी प्यादे पायीच्या लढाईत मजबूत. त्याचे प्रत्यंतर सखुजीरावांना येत होते. दिवस उलटले; पण गढी काबाजी होण्याची चिन्हे दिसेनात.
राजांच्या छावणीतून गढी दिसत होती. सारी फौज गढीकडे डोळे लावून बसली होती. राजांचा मन:क्षोभ वाढत होता. राजे विचारमग्न बसले असता सखुजीराव आल्याची वर्दी आली. सखुजीराव येताच राजांनी विचारले,
'बोला, सखुजीराव गढी काबीज झाली?'
सखुजीरावांची मान खाली झुकली. ते हताशपणे म्हणाले,
'महाराज, गढीचा बंदोबस्त कडेकोट केला आहे. पण फार काळ गढी ठिकाव धरेल, असं वाटत नाही.'
राजे हसले.
'वा! सुरेख सखुजीराव कोणी ज्योतिषी भेटला का?'
'त्यांनीही तेच सांगितलं.' सखुजीराव म्हणाले.
राजांची नजर शेजारी उभ्या असलेल्या आनंदरावांच्याकडे गेली. आनंदराव म्हणजे फौजेचे दुय्यम सेनापती.
'आनंदराव, आमच्या सखुजीरावांची तारीफ करावी, तेवढी थोडी! ज्योतिष्याला विचारण्यापर्यंत यांच्या शौर्याची मजल गेली! एवढा दक्षिणदिग्विजय करुन आम्ही आलो; पण बेलवडीची ही चुमुकली गढी आम्हाला काबीज करता येत नाही. बेलवडीच्या पाटलानं ही आगळीक केली नसती, तर आमचं त्या गढीकडे लक्षही गेलं नसतं...सखुजीराव, आम्हाला असल्या खेळात फार दिवस घालवता येणार नाहीत.' तुमच्या हातून ही कामगिरी होत नसेल, तर सांगा आम्ही दुसऱ्या कोणाची तरी नेमणूक करू!'
राजांचा निरोप घेऊन सखुजीराव बाहेर पडले. आपल्या माणसांसहित ते गढीला भिडू लागले. चकमकी उडू लागल्या. आणि एके दिवशी गढीच्या द्वाराशी चाललेल्या चकमकीत पराभव होत आहे, हे ध्यानी येताच गढीचा पाटील त्वेषाने बाहेर पडला. शर्थीची लढाई सुरू झाली. त्या लढाईत पाटील पडले. पाटलांना घेऊन पाटलाचे लोक गढीत गेले.
पाटील पडल्याचे ऐकताच सखुजीरावांना आनंद झाला. आता गढी ताब्यात येईल, असे वाटुन ते दुसऱ्या दिवशी गढीवर चालून गेले. तेथील दृश्य पाहून सखुजीराव आश्चर्याने थक्क झाले. पाटलाच्या पश्चात पतीचे कार्य हाती घेऊन सावित्रीबाई गढीवर उभी होती. शौर्याने गढी लढवत होती. नुसत्या पायदळाने गढी काबीजी होण्याचे दिसेना. दिवस मात्र उलटत होते. गढीला वेढा घालून एकवीस दिवस झाले होते. सावित्रीबाई गढी लढविते आहे, हे राजांना कळले, तेव्हा राजे उद्गगारले,
'धन्य आहे त्या शूर स्त्रीची! पतिनिधनानंतर आपलं दुःख विसरून ती आपली गढी लढविते आहे. तिच्या धैर्याला तोड नाही. आम्ही आणखीन एक दिवसाची वाट पाहु. नाहीतर जातीनिशी या मोहीमेत भाग घेऊ. त्याखेरीज आम्हाला गत्यंतर नाही.'
राजांचा निर्धार सखुजीरावांना कळला. त्यांनी त्वेषाने ओठ चावले.
दुसऱ्या दिवशी छावणीवर दाट धुके उतरले. रात्रभर जळत राहिलेले पलोते विझवले जात होते. सुर्योदयाबरोबर पूजा आटपून राजे तंबूबाहेर आले. त्यांची नजर बेलवडीच्या गढीला गेली. राजांनी आनंदरावांना विचारले.
'आनंदराव, सखुजी आले नाहीत?'
'महाराज, आज पहाटेच सखुजीराव आपली कुमक घेऊन गढीवर चाल करून गेले.'
'कालचे आमचे बोल त्यांनी जिवाला लावून घेतलेले दिसतात.'
'सखुजीराव कामात कुचराई करणारे नव्हते.' आनंदरावांनी ग्वाही दिली.
'आम्ही कुठे तसं म्हणतो? पण हा पेचच वेगळा पडला आहे. एवढी फौज हाताशी असूनही गढीवर चालून जाता येत नाही. तोफखाना वापरता येत नाही. एका लहान गढीवर आम्ही फौज, तोफखाना वापरला, तर अपकीर्ती मात्र पदरात पडेल. धरलं तर चावतं; सोडलं तर पळतं, अशी अवस्था झाली आहे. शौर्य आहे; पण....'
'पण काय, महाराज?' आनंदरावांनी विचारले.
'युक्ती नाही. त्याऐवजी संताप आहे. संतापाने बुद्धीवरचा ताबा नष्ट होतो. चाल कळत नाही. नाहीतर ही गढी घ्यायला इतका उशीर लागला नसता.'
अचानक तुताऱ्यांचा आवाज साऱ्या मुलुखात उठला. सारे आवजाच्या दिशेने पाहत होते.
गढीच्या रोखाने आवाज येत होता. महाराजांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले. महाराज हात जोडून उद्गारले,
'जगदंबेची कृपा! आनंदराव, सखुजीराव विजयी झाले. चला आनंदराव विजयी वीरांच्या स्वागताला चार पावले पुढं जाऊ.'
थोडी धावपळ उडाली. मोतद्दारांनी घोडी आणली. जाधवराव, निंबाळकर, आनंदराव ही मंडळी त्वरित डेऱ्यासमोर आपापल्या घोडयनिशी सज्ज झाली. महाराज डेऱ्यातून बाहेर आले. त्यांनी सर्वांवरून नजर फिरवली. खास अश्वपथके तयार होते. राजांनी घोड्यावर मांड टाकली. टाच दिली. त्या काळ्या उमद्या जनावराने ऐटीने पावले उचलली. पाटोपाट सरदार मंडळी जात होती. मागून अश्वपथकांचे स्वार जात होते. महाराज गढीजवळ पोहचले. मुख्य दरवाजाचा नगारा धडधडू लागला. महाराज पायउतार झाले. अनेक जखमी वीर तेथे होते. कामी आलेल्या वीरांवर शेले झाकले होते. महाराज गंभीर झाले. स्वागतासाठी श्रीपतराव नाईक आलेले पाहताच राजांचे पाय थबकले. श्रीपतरावांच्या मुजऱ्याचा स्वीकार करून राजांनी विचारले,
'श्रीपतराव, सखुजीराव कुठं आहेत?
महाराजांची चिंता ओळखून श्रीपतराव म्हणाले,
'महाराज, गढी मोठया शर्थीनं सर झाली; पण या अनर्थाला कारणीभूत झालेली सावित्रीबाई मात्र धुक्याचा फायदा घेऊन हातून सुटली. तिला गिरफदार करण्यासाठी सखुजीराव जातीनिशी गेले आहेत.'
राजांनी नि:श्वास सोडला. आनंदरावांना ते म्हणाले,
'काय, आनंदराव? आम्ही बोललो ते खरं आहे ना? गढी सर होऊनही सखुजीराव थांबू शकले नाहीत. त्यांचा संताप एवढ्यावरच तृप्त झाला, तर नवल! आम्ही त्यांच्या स्वागताला येथवर आलो, पण त्यांचाच पत्ता नाही! श्रीपतराव फार हानी झाली?'
'पाच-सहा कामी आले. जखमींची संख्या फार आहे.' श्रीपतराव अदबीने म्हणाले.
नि:श्वास सोडून राजे म्हणाले, जे कामी आले त्यांना विरोचित सन्मान द्या. जखमींची नीट काळजी घ्या. आम्ही येतो.'
'महाराज आपण गढीत यावं...'
'जरूर येऊ. पण श्रीपतराव, ज्यांनी ही गढी मोठया शर्थीनं जिंकली, ते सखुजीराव गढीत नसताना आम्ही गढीत प्रवेश कसा करणार? ते शोभणार नाही. सखुजीराव आले, की त्यांना सांगा....आम्ही त्यांच्या भेटीसाठी इथवर आलो होतो. त्यांच्या भेटीस्तव आमचा जीव उतावीळ आहे.'
त्यानंतर दोन दिवस गेले, तरी सखुजींचा पत्ता नव्हता. महाराज चिंतेत होते. छावणी उठवण्याची गडबड सुरू झाली. राजे सखुजीरावांची वाट पाहत होते. त्यांचा शोध घेण्यासाठी दोन पथकेही पाठवण्यात आली होती.
महाराज शामियान्यात बैठकीवर बसले होते. सारे सरदार चिटणीस शामियान्यात हजर होते. राजे पुढचा मनसुबा सांगत होते. तोच जासूद आत आला. मुजरा करून तो म्हणाला,
'महाराज, सखुजीराव आले.'
'सखुजीराव आले?' म्हणत राजे बैठकीवरून उठले. त्याच वेळी शामियान्याच्या प्रवेशद्वारातून सखुजीराव प्रवेश करते झाले. राजे पुढे झाले. सखुजी मुजऱ्याकरिता वाकले असतानाच राजांनी त्यांना मिठीत घेतले.
'सखुजीराव, धन्य आहे तुमची! आम्ही इकडे तुमच्या स्वागतासाठी आतुरलो असता तुमचा पत्ता नाही.' राजांनी आपला डावा हात सखुजीरावांच्या डाव्या खांद्यावर ठेवीत हसत विचारले, मग गनीम सापडला?'
'तो सापडला नसता, तर समोर आलो नसतो.' सखुजीराव म्हणाले.
'शाब्बास!'
'महाराज गनीम आपल्या समोर हजर करण्याची आज्ञा व्हावी.'
राजांनी मानने होकार दिला. सखुजीराव शामियान्याच्या बाहेर गेले. राजे आसनस्थ झाले. साऱ्यांच्या नजरा शामियान्याच्या प्रवेशद्वारावर खिळल्या. सखुजीराव आत आले. त्यांच्या पाठोपाठ जेरबंद केलेल्या सावित्रीबाई पाहताच राजांचे हास्य कुठच्या कुठं गेलं. त्यांनी सखुजीरावांच्याकडे पाहिले. सखुजीराव म्हणाले,
'महाराज, ह्याच त्या सावित्रीबाई!'
'पण स्रियांना जेरबंद करण्याची आवश्यकता केव्हापासून भासू लागली?'
राजांचा आवाज किचिंत कठोर बनला.
'महाराज, क्षमा असावी! ज्या शर्थीनं गढी लढवली, आणि जिनं तीन दिवस अन्नपाण्याविना रानोमाळ हिंडवलं, ते यांचं रूप इतकं सोज्वळ नाही. यांचा शेवटचा माणूस गारद होईपर्यंत ह्या आमच्या हाती लागल्या नाहीत. गढीसाठी जेवढे बळी द्यावे लागले नाहीत, तेवढे यांना पकडण्यात द्यावे लागले.'
'बाई, धन्य आहे तुमची, तुमच्या पराक्रमाची!' राजे उद्गगारले. 'सखुजीराव, बाईंच्या हाती बांधलेल्या काढण्या सोडा.'
'पण महाराज!...'
'सखुजी, अबलांना जेरबंद करणं हे वीरांना शोभत नाही. त्या आम्हाला मातेसमान आहेत. प्रथम त्यांना मोकळं करा!'
काढण्या सोडल्या गेल्या. सावित्रीबाई अधोवदन निश्चल उभी होती. राजे गंभीर वाणीने बोलु लागले,
'सावित्रीबाई तुम्हास त्रास द्यावा, हा आमचा हेतू नव्हता; आजही नाही. तुमच्या पतींनी अकारण आमची आगळीक काढली, आमचे काबडीचे बैल लुटले. दिलेली समज त्यांनी मानली नाही. लढायला ते सिद्ध झाले. पण अविवेकी धडसाला अर्थ नसतो. स्वराज्यस्थापनेसाठी, धर्मस्थापनेसाठी प्रयत्न करीत असता आपल्यासारख्या शौर्यशालिनीचा विरोध आम्हाला व्हावा, याचं दुःख होतं. स्वधर्म आणि स्वराज यांसाठी आम्हाला तुमच्या आशिर्वादाची गरज असता तुमचा विरोध का यावा?'
सावित्रीबाईंनी प्रथमच आपली नजर दरबारात वर केली. एखादी वीज चमकून जावी, तशी सवित्रीबाईंची नजर दरबारावरून फिरली. स्फुलिंगाची धगधगीत नजर त्या फेकीत होत्या. राजे सस्मित वदनाने विचारते झाले.
'बोला, बाई! हा पराजायचा अपमान तर...'
'हं;!' सावित्रीबाई हुंकारली. 'राजे, जय-पराजय ह्या नशिबाच्या गोष्टी. त्यांची खंत कसली?'
'खरं आहे! राजे म्हणाले. 'धर्मानं, न्यायानं आणि नीतीनं जाणाऱ्याला यशापयशाचा वारा शिवत नाही. आमच्या स्वराज्याला....'
'तुझ्या आसुरी राज्याला स्वराज्याचा टिळा कशाला लावतोस, बाबा? दुर्दैव, आज माझा पराभव झाला! मंगल कार्यात देवाने हात दिला नाही.'
'खामोश!' आनंदराव ओरडले. राजांची नजर वळताच ते शरमले.
'बोला बाई! आम्ही सारं ऐकून घेऊ. तुमच्यावर अन्याय झाला, असं का तुम्हाला वाटतं?'
'अन्याय? राजा तुला न्यायाची चाड आहे?' फरसबंदीवर नगदी रुपये खणखणत उतरावेत, तसा तो प्रश्न उमटला.
राजे स्थिर नजरेने आणि स्थिर मनाने बोलले,
'आई, ह्या शिवाजी बद्दल अनेक प्रवाद असतील; पण त्याच्या स्वराज्याच्या हेतुवर कोणीही आजवर शंका घेतली नाही. तुमची काही तक्रार दिसते. आमचं अभय आहे. तुम्ही मोकळ्या मनानं सांगा. तुमच्यावर अन्याय झाला असेल, जरूर न्याय मिळेल. पण त्याचबरोबर स्त्री म्हणून शत्रूचे अकारण लाड पुरवले जातील, असंही समजू नका.'
सावित्रीबाई स्तब्ध उभी होती. शांतता असह्य होत होती.
'बोला, बाई!' राजे म्हणाले.
खालच्या मानेनेच सावित्रीबाई म्हणाली.
'भर दरबारी मी काय सांगू?'
राजांनी आज्ञा केली. चकित झालेले सारे बाहेर गेले.
'सांगा....' राजे म्हणाले.
नागिणीसारखी संतप्त झालेली सावित्रीबाई त्या शब्दाबरोबर ढासळली. उभ्या जागी ती कापू लागली; आणि एकदम तिने आपला चेहरा हातात दडविला.
हुंदक्यांचा आवाज आला. राजे उभे राहिले.
'आई! काय झालं, सांगा. मुलाचा संकोच बाळगू नका.'
सावित्रीबाईंनी डोळे टिपले.
राजांच्या नजरेला नजर देत ती म्हणाली,
'तुमचे सखुजीराव गढी जिंकूनच थांबले नाहीत....' आणि नजर खाली वळवीत म्हणाली, ' त्यांनी माझी अब्रू घेण्याचा प्रयत्न केला!'
'अशक्य!' राजे अस्वस्थ होऊन एकदम उद्गगारले. 'बाई, तोहमत खोटी ठरली, तर गुन्ह्याला शीरच्छेदाखेरीज शिक्षा नाही.'
राजांच्या नजरेला नजर भिडवीत सावित्रीबाई म्हणाली,
'राजे मी पाटलीण, गावची वतनदार, कोणती खानदानी स्त्री असं खोटं सांगेल? आपण सखुजीरावांना विचारा....'
(पुढे चालू...)
तुम्हाला या पोस्ट आवडू शकतात
• गडकिल्ले संवर्धन करणे हे कर्तव्य माझे - एक सामाजिक उपक्रम
0 टिप्पण्या
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.