विघ्नहर्ता मित्र मंडळ दिनदर्शिका वाटप - एक सामाजिक उपक्रम | Social campaign in village

       गावातील नाविन्यपूर्ण उपक्रम | Village campaign in marathi

विघ्नहर्ता मित्र मंडळ दिनदर्शिका वाटप - एक सामाजिक उपक्रम | Social village campaign in Marathi  गाव खेड्याचा सर्वांगणी विकास म्हणजेच तालुक्याचा,जिल्ह्याचा विकास आणि जिल्ह्याचा विकास झाला की राष्ट्राचा विकास आपोआपच होतो. मुख्यत्वे ग्रामीण भागातील तरुणाने गावातील सामजिक प्रश्न कसे सोडवता येतील या कडे अधिक लक्ष्य द्यायला हवे. तरूण हेच राष्ट्राचे भावी आधारस्तंभ होय. परंतु सध्या ग्रामीण भागात वेगळीच परिस्थिती दिसून येते. गावातील तरुण उदरनिर्वाहासाठी शहरात पळ काढत आहेत आणि चाकरमानी म्हणून जगत आहेत. परिणामी गावाच्या प्रगतीला खुंट बसतो. ही एक दुर्दवाचीच गोष्ट म्हणावी लागेल. मुंबईत हरवलेल्या तरुणांची मने गावाकडे वळवणे हे ही तितकेच महत्वाचे आहे. यासाठी पालु गावातील 'विघ्नहर्ता मित्र मंडळ, गावकर वाडी' या मंडळाने एका दिनदर्शिकेच्या माध्यमातून गावातील तसेच मुंबईत किंवा इतर शहरात असणाऱ्या प्रत्येक माणसाला असलेली आपल्या गावाबद्दलची आवड, आपुलकी, आणि गावातलं गावपण हे तसंच टिकून रहावं यासाठी एक आगळा वेगळा उपक्रम एकदा नव्हे, दोनदा नव्हे सलग तीन वर्षांपासून राबवत येत आहेत. 'विघ्नहर्ता मित्र मंडळ दिनदर्शिकेचे ' संपूर्ण पालु गावात विनामूल्य, घरोघरी जाऊन वाटप करत ते एका प्रकारे लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी या विघ्नहर्ता मित्र मंडळाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.


विशेष सांगायचे म्हणजे, ही दिनदर्शिका म्हणजे फक्त तारखा, सणवार किंवा पंचांग पाहण्यासाठी मर्यादित नाही. यापलीकडे यामध्ये गावातील रममाण निसर्गसौदर्य, वैशिष्ट्ये, ठळक घडामोडी, गावातील परंपरा आणि सणवार याबद्दल ची माहिती लेख, कविता आणि छायाचित्रांद्वारे लोकांपर्यंत पोहचवण्याचे कार्य करीत आहेत. या मंडळाबद्दल सांगायचे झाले तर कोणत्याही राजकीय पक्ष किंवा सामाजिक संस्थेचा आधार नसताना, मुंबईतलं धावपळीच जीवन जगत असताना थोडासा वेळ आपल्या गावासाठी, गावातल्या लोकांसाठी काहीतरी करता यावे म्हणून या मंडळाचे सदस्य दर वर्षी कामावरून सुट्टी टाकून हा उपक्रम राबवण्यासाठी बहुसंख्येने गावी जातात. गावातील सरपंच,गावकर मंडळी व इतर मान्यवरांच्या उपस्थित ह्या दिनदर्शिकेचे उदघाटन केले जाते. यानिमित्ताने मान्यवरांचे मार्गदर्शनही गावाला लाभते. उदघाटन सोहळा झाला की, दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावात दिवसभर दिनदर्शिका वाटप केले जाते. यात गावातील शाळा, बालवाडी यांना हे मंडळ आवर्जून भेट देते. गावातूनही त्यांना दरवर्षी भरभरून प्रतिसाद मिळतो. अश्या ह्या रीतीने हा सोहळा संपन्न होतो. आणि तिसऱ्या दिवशी हे चाकरमानी पुन्हा मुंबईची वाट धरतात.

गावातील सामाजिक उपक्रम
दिनदर्शिका २०१७ प्रदर्शित करताना गावचे सरपंच श्री.सुहास नामे सह गावकरी मंडळी

स्पर्धेच्या युगात आनंदासाठी धावपळ करणाऱ्यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष देतानाच आपला गाव, समाज यांकडेही लक्ष दिले पाहिजे. जनजागृतीसाठी गावात नव-नवीन सामाजिक उपक्रम राबवायला हवेत. त्यासाठी मुख्य म्हणजे तरुण वर्गाने पुढाकार घेऊन एकत्र व्हायला हवे. ग्रामपंचायत वा सरकारी योजना गावात राबवून गावतील प्रश्न नक्कीच सोडवता येतील. तेव्हाच त्यांना खरा आनंद मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी स्वतःला झोकून दिले. ते दुसऱ्यांसाठी जगल्यामुळेच त्यांचे विचार व कार्य चिरकाल टिकणारे आहेत. अश्याच महात्म्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चला एकत्र होऊया.! ठेवूनि एकचि ध्यास! गाव-खेड्याचा संपूर्ण विकास..! 


तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या