कोकणातील रहस्यमय शिवकालीन भुयारे । Mysterious Shiva-era basements in Konkan लांजा तालुक्यातील काही गावांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या गावांत इतिहासाची साक्ष देणा-या अनेक गोष्टी आजही अस्तित्वात असल्या तरी त्यांचे योग्यतेने जतन व संवर्धन न झाल्याने हा ऐतिहासिक ठेवा दुर्लक्षित होण्याबरोबरच नामशेष होत चालला आहे.
रत्नागिरीतील लांजा तालुक्यातील Lanja talukyatil bhuyare प्रभानवल्ली गावात इतिहासाची साक्षीदार असलेल्या गूढ भुयारांचा त्यात समावेश आहे. या गूढ भुयारांवर कोरण्यात आलेला शिलालेखावरील भाषा ही अरबी आहे. या शिलालेखाचा अर्थ अद्याप कोणाला कळलेला नाही. या शिलालेखाचा अर्थ कळल्यास भुयाराच्या अंतर्गत भागातील माहितीचा खजिना उलगडू शकतो. तालुक्याच्या पूर्व भागात व सह्याद्रीच्या कडेकपारीत अतिशय दुर्गम भागात प्रभानवल्ली हे गाव वसलेले आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला हा गाव व परिसर एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडय़ांच्या टापांच्या आवाजाने दणाणून गेला होता. अशा या प्रभानवल्ली गावात फेरफटका मारल्यानंतर इतिहासाच्या खुणा जागोजागी आढळतात. त्यापैकीच एक असलेली म्हणजे या ठिकाणी आढळणारी गूढ अशी भुयारे होय.
 |
प्रभानवल्लीतील गूढ भुयारे |
मुचकुंदी नदीच्या काठाशी तीन भुयारे आढळतात. तीनही भुप्रभानवल्लीतील गूढ भुयारेयारे ही काळया दगडाने व एकसारख्या रूपात बांधलेली आहेत. यातील डावीकडील दोन भुयारांवर दोन वेगवेगळे शिलालेख कोरण्यात आलेले आहेत. भुयारांचे प्रवेशद्वार ४ ते ५ फूट रूंद आहे. आतमधील व्यास प्रवेशद्वाराएवढाच मोठा आहे. ५ ते ६ व्यक्ती सहज बसू शकतील एवढे हे भुयार आहे. या भुयारांचा नेमका मार्ग कोणालाच माहिती नाही. अंतर्गत भागात भुयारे बंद स्थितीत आढळतात, मात्र ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ही भुयारे ऐतिहासिक विशाळगडाकडे जातात. संकट काळात या भुयारांमधून पलायन केले जात असे. भुयारावर कोरण्यात आलेला शिलालेखावरील भाषा ही अरबी भाषेची साधम्र्य सांगणारी असली तरी ती अरबी नसल्याचे कळते. त्यामुळे या शिलालेखाचा अर्थ अद्याप कोणाला कळलेला नाही. एकसारख्या दिसणा-या या तीनही भुयारांपैकी केवळ दोनच भुयारांवर शिलालेख कोरण्यात आलेला असल्याने ही गोष्टही गोंधळात टाकणारी आहे.
शत्रूला गुंगारा देण्यासाठीच या तीन भुयारांची निर्मिती केली गेली असावी. या तीन भुयारांपैकी एकच भुयार विशाळगडाकडे जाते. उर्वरित दोन भुयारे ही शत्रूला चकवा देण्यासाठीच तयार करण्यात आली असल्याचे जुन्याजाणत्या ग्रामस्थांकडून कळते. या गूढ अशा भुयारांपासून काही मीटरच्या अंतरावर नदीच्या पात्रात पाटकोंड नावाची खोल कोंड (डोह) आढळते. ही कोंड बाराही महिने पाण्याने भरलेली असते. संपूर्ण नदीपात्र उन्हाळयात कोरडे पडलेले असताना या पाटकोंडीतील पाणी मात्र अजिबात आटत नाही. पाटकोंडीत वरील भुयारांतून बाहेर पडण्याचा मार्ग असल्याचे सांगण्यात येते. हा सुरक्षित व छुपा मार्ग असल्याचे मानले जाते. या मार्गाने पुढे थोडे अंतर पोहून जाऊन थेट नदीच्या पलीकडे जाता येते. नदीच्या पलीकडे गेल्यानंतरह्य साद्रीच्या पर्वतरांगा तुडवत गेल्यानंतर थेट विशाळगड गाठणे शक्य होते, असेही येथील जाणकार सांगतात. प्रभानवल्ली गावापासून विशाळगड अवघ्या दोन ते तीन तासांच्या अंतरावर आहे.
अशाप्रकारे शिवकालीन महाराष्ट्रातील रहस्यमय आणि इतिहासाच्या साक्षीदार असणा-या या गूढ गुहांबाबत पुरातत्त्व खात्याने योग्य ती कार्यवाही करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. तसेच गुहांवरील लिहिण्यात आलेल्या शिलालेखाबाबत संशोधन होणे गरजेचे आहे. तसे झाल्यास येथील अनेक ऐतिहासिक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो, मात्र पुरातत्त्व खात्याने या पुरातन भुयारांकडे गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचे जाणवते. त्यामुळेच इतिहासाची साक्षीदार असणारी येथील गूढ भुयारे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
0 टिप्पण्या
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.