इतिहासाची साक्ष असलेला किल्ले विशाळगड | Vishalgad Fort

    
विशाल किल्ला विशाळगड | Vishalgad Fort

vishalgad

विशाल गडाची माहिती | Vishalgad Fort Information in Marathi नावाप्रमाणेच विशाल असलेला किल्ला विशाळगड (विशाळगड फोर्ट) कोकणातल्या बंदरांना कोल्हापुरातल्या बाजारपेठेला जोडणाऱ्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी आणि संरक्षणासाठी हा किल्ला बांधला गेला. इतिहासामधे विशाळगड, खेळणा, खिलकिला अशी वेगवेगळी नावे या किल्ल्याला मिळालेली आहेत. किल्ले विशाळगड सह्रयाद्रीच्या मुख्य रांगेला लागूनच आहे. विशाळगडाच्या पूर्वेला ९ ते १० कि.मी. अंतरावर गजापूर, पांढरपाणी व येळवण जुगाईच्या मध्यावर उंची ठिकाणी म्हणजे १७११ फुटावर पावनखिंड आहे. पावनखिंड ज्या दोन डोंगरांच्या दरीत येते ती दरी दक्षिणोत्तर असून सात मैल लांबीची आहे. या दरीतच कासारी नदी उगम पावली आहे. पन्हाळा, म्हाळुंगे, पांडवदरी, धनगरवाडा, पांढरपाणी, घोडखिंड असा हा मार्ग आहे.


मलकापूर मार्गे अथवा आंबा गावा कडून असे दोन गाडीमार्ग गजापूर मार्गे विशाळगडाला जातात. आंबा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या साखरपा गावाकडून तीन तासाच्या चढाईने माचाळच्या गुहेकडून आपण विशाळगडावर पोहोचू शकतो. किंवा संगमेश्वरहून शिपोशी या गावाला जाणाऱ्या गाड्या आहेत. यानंतर शिपोशीहून व्हाया कोचरी गाडी धनगरवाडय़ापर्यंत पोचते. धनगरवाडय़ाहून वर मात्र चालत जावं लागतं. समुद्रसपाटीपासून अंदाजे ५ ते ७ हजार फुट उंचीवर असलेल्या ऐतिहासिक किल्याची उभारणी इ.स. १०५८ मध्ये शिलाहार राजा मारसिंह याने केली. साधारण इ.स.१४५० च्या सुमारास बहमणी राज्याचा एक सुभेदार हा प्रांत काबीज करण्यासाठी आला तो मलीक उत्तुजार. त्याने प्रथम पन्हाळ्या किल्ल्यावरील शिर्क्यांना जेरीस आणले. शिर्क्यांनी मलीक उत्तुजाराला विशाळगडाचे आमिष दाखवले. शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली मलीक उत्तुजारची सात हजाराची फौज विशाळगडाच्या निबिड अरण्यात येऊन दाखल झाली. अतिशय अडचणीच्या जागेवर सैन्यासकट मलीक उत्तुजारला आणल्यावर विशाळगडावरील शंकरराव मोरे यांनी जोरदार हल्ला केला. शिर्के आणि मोरे यांनी कात्रीत सापडलेल्या मलीक उत्तुजारला सात हजार सैन्यासकट त्यांच्या आक्रमणापासून मुक्त केला. यासैन्यातील एक सरदार मलीक रैहान होता. त्याचीच कबर विशाळगडावर आहे असे जाणकारांचे मत आहे.

पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६५९ मध्ये हा किल्ला जिंकला व याचे नामकरण केले विशाळगड ! विशाळगड हा मराठ्यांच्या इतिहासातील एका अचाट पराक्रमाचा साक्षीदार आहे आणि तो म्हणजे महाराजांची आदिलशाही सरदार सिद्दी जौहर याने टाकलेल्या पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका ! इ.स. १६६० मधे आदिलशाही सरदार सिद्धी जैहर याने शिवरायांना पन्हाळगडावर कोंडले होते. या कोंडीतून शिवराय चतुराईने निसटले. त्याचा पाठलाग करीत सिद्धी मसूद आला. त्या सिद्धी मसूदला थोपवण्याचा महान पराक्रम अजरामर झालेले वीररत्न बाजीप्रभु देशपांडे यांनी केला. यासाठी अवघे ३०० मावळे घेऊन आठ तासांहूनी अधिक काळ हजारोंच्या फौजेला गजापूरच्या खिंडीत थोपवून ठेवले.


बाजीप्रभू देशपांडे माहिती

अश्या अनेक रोमहर्षक घटनांचा साक्षीदार विशाळगडाचा किल्ला आहे. शिवकालीन इतिहासामधे विशाळगडाला महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे. विशाळगडाच्या दर्याखोर्यांचे निबीड अरण्याचे सुरेख वर्णन फेरीस्ता या इतिहासकाराने केलेले आहे. तो म्हणजो या घाटामधील वाटा अतिशय वाकडय़ा-तिकडय़ा आहेत. याची तुलना कुरळ्या केसांशी केली तरी यांची बरोबरी होणार नाही. या पर्वतांचे देखावेही अतिशय भयंकर असून याच्या कडय़ावर आणि गुहांजवळ आल्यावर प्रत्यक्षात भुते आणि राक्षस देखील दचकतील. या रानात सूर्याचा कवडसाही पडायचा नाही. इथे वाढलेले गवत सर्पाच्या सुळ्याप्रमाणे चिवट, तिक्ष्ण ! हवा अजगराच्या श्वासो श्वासासारखी दुर्गंधमय. इथल्या पाण्यामधे मूतिमंत मृतयूचेच वास्तव्य. वार्याची प्रत्येक झुळूक विषाने माखलेली अशा या वाकडय़ातिकडय़ा वाटांनी चालून मुसलमानी सैन्य अगदी भिऊन आणि थकून गेले!

विशाळगडाच्या परिसरात भटकंती केल्यास आजही याचा प्रत्यय आल्याशिवाय रहात नाही. गडावर मुंढा दरवाजा, रणमंडळ मलीक रैहानचा दर्गा Vishalgad Fort Dargah, अमृतेश्वर मंदिर, दगडी कुंउ, पंतप्रतिनिधीचा वाडा अशा अनेक वास्तु गडावर पहायला मिळतात. या शिवाय छत्रपती राजाराम महाराज यांच्या तृतीय पत्नी अंबीकाबाई यांचे स्मारक आणि बाजीप्रभु देशपांडे आणि फुलाजी प्रभु यांच्या समाध्या आज दुर्लक्षित असल्या तरी नमन करण्यायोग्य आहेत.

विशाळगडाची दुरवस्था...!!

परंतु सध्या विशाळगडावर एक वेगळंच चित्र बघायला मिळतं. हे आपलं दुर्दैवच म्हणावं लागेल. शिवकाळात महत्व लाभलेला हा किल्ला इंग्रज काळापासून दुर्लक्ष केला गेला तो आजतागायत. आज गडावर साधं प्यायला सुद्धा पाणी मिळत नाही. गडावर असलेल्या अनेक लहान मोठ्या विहीरी आणि तलाव आता नामशेष झालीे आहेत. आणि जे काही जे जलस्रोत आहेत ते उन्हामुळे आठले आहेत. परिणामी गडावरील रहिवाशी आणि पर्यटकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याशिवाय गत्यंतर नसते.

विशाळगडाच्या पायथ्याशी उतरल्यांनातर  वाहनतळ आणि विशाळगड मध्ये दरी आहे. पुर्वी या दारीतूनच उतरुन विशाळ गडावर जावे लागत होते. मात्र आता या दरीवर लोखंडी पूल बांधण्याचं काम सुरु आहे आणि ते ही अगदी कासवाच्या गतीने. त्यामुळे गडावर ये जा करणाऱ्या लोकांना प्रचंड कष्ट घ्यावे लागत आहेत. गडावर जाण्यासाठी आधीपासून असलेल्या वाटा धोकादायक झाल्या आहेत.  याशिवाय गाड्याच्या दुर्मिळ ठेव्याकडे राज्य सरकार आणि केंद्रसरकार यापैकी कोणीही लक्ष देत नाहीत. गडापाशी असलेल्या दर्ग्याच्या आजूबाजूला राहण्यासाठी अनेक अनिधृकृत हॉटेल्स झालेली आहेत. मात्र त्याचा वापर झुगार आणि पार्टीसाठीच होतो. तर शौचालयाची सोय नसल्यानं किल्ल्यावर दुर्गंधीचा फैलाव झाला आहे. स्मारकाच्या नावावर राजकारण करण्याऱ्या नेत्यांना  शिवाजी   महाराजांच्या जिवंत साक्षीदार असणाऱ्या किल्ल्याचं संरक्षण करता येणार नाही का? हा एक मोठा प्रश्नच आहे.

"गडकोट फक्त दगडामातीचे नसून आपल्या महाराजांचे श्वास आहेत; हिंदू स्वराज्याचे प्रतिक आहेत पर्यटनाच्या, पार्टीच्या नादात त्यांना घाण करू नका ..!"

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात 

 •  कोकणातील रहस्यमय शिवकालीन भुयारे

 •  न्याय: छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेवर असतानाचा हा प्रसंग

 •  गडकिल्ले संवर्धन करणे हे कर्तव्य माझे - एक सामाजिक उपक्रम

 •  कोकणातील रमणीय माचाळ गाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या