कोकणातील एक टुमदार गाव - पालू | Beautiful Village In Konkan



Maze Gav Essay In Marathi

कोकणातील एक टुमदार गाव - पालू | Beautiful Village In Konkan गाव म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते गावकडचं सुंदर कौलारू घर. मनात रुजून असलेल्या सुंदर आठवणी डोळयांसमोर तरंगू लागतात. एका मागून एक अश्या त्या आठवणी आठवून मन कधी पुन्हा गावाकडे हरवतं हे कळतच नाही. माझं कोकणातील गाव ही असचं आहे. विशाळगडाच्या पायथ्याशी वसलेलं, लांजा तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात असलेलं पालू गाव. Beautiful Village In Konkan. आपण स्वर्ग पहिला नाही, परंतु निसर्गाची काही जिवंत दृश्य पाहिल्यानंतर याहून दुसरा स्वर्ग तो काय असावा ? असं मात्र नक्की वाटेल.

गावाच्या मुख्य रस्त्यातून आत शिरताना डौलदार कमानीच्या थाट पहायला मिळेल. दूरवर पसरलेल्या रस्त्यावर दुतर्फा झाडे आणि गावाच्या शेवटच्या टोकापर्यंत साथ देणारी संथ वाहती नदी. साधारणत: ३००-४०० लोक वस्तीचं हे लहानसं गाव. त्यामुळे रस्त्यावर रहदारी कमीच पहायला मिळते. नदीच्या दोन्ही बाजूला काही अंतर ठेवून वस्त्या आहेत. त्यामुळे त्यांची वाडी तयार होते. वाडीतील घरे ही साधारणतः आजूबाजूच्या घरांपासून लांब असलेली दिसणार नाहीत. ती एकमेकांच्या जवळच असतात. वाडीत १०-१२ घरांसाठी एक विहिर असतेच. त्या वाड्या वेगळ्या असल्या तरीही गावाच्या उत्सवात सगळे समरस असतात. गावातील मुख्य चावडीवर ग्रामदैवत रवळनाथ देवाचं सुंदर कौलारू पुरातन मंदिर आहे. हे ग्राममंदिर म्हणजे जणू गावाचा गाभारा. अनेक पारंपरिक सण, उत्सव साजरे करण्यासाठी अक्खा गाव इथे देवळाच्या जागेत जमत असतो. त्या जागेला 'मांड' असं म्हणतात. दसरा-दिवाळी आणि शिमगोत्सवात या जागेवर अनेक धार्मिक सोहळे होतात. तेव्हा सगळा गाव एकत्र होतो. गणपती, शिमगा म्हणजे मोठे सण. गणपतीतले जाखड़ी नृत्य, शिमग्यातील गोमुचा नाच, नमन किंवा कोकणचे खेळे अश्या बहुतेक परंपरा अजुनही टिकून आहेत. गावात प्रत्येक वाडीत अनके डौलदार मंदिरं, बुद्ध विहार आणि मठ देखील आहे. जी गावाची धार्मिक शोभा आणखी वाढवतात.


पूर्वीपासून गावातील सर्व घरे ही मातीची असायची, घराच्या भिंती मातीच्या असायच्या, मातीच्या चुली असायच्या. त्या मातीच्या घराला लाकडी मजबूत खांब आधार द्यायचे. घरासमोर अंगणात सुख्या भाताच्या पेंडींच्या गवताचे छप्पर असायचे. पण आता अशी घरे गावात फार कमी प्रमाणात पाहायला मिळतात. या मातीच्या घरांची जागा आता लाल चिऱ्याच्या घरांनी आणि गॅस शेगडीने घेतली आहे. मात्र प्रत्येक घरं अजून कौलारूच आहेत. कौलारू घरांचा थाट काही औरच असतो. आजही कित्येक नवीन घरे बांधताना ती कौलारूच बांधली जातात. आजही प्रत्येक घरासमोर एक मोठं प्रशस्त असं अंगण पाहायला मिळेल. काही ठिकाणी हे अंगण खुले असतं तर काही ठिकाणी त्यावर पत्र्याचे किंवा गवताचे छप्पर असते. गवताच्या छप्परबांधणीला 'मांडव' असे म्हणतात. गावात घरासमोर अंगणात एक तुळस असतेच. घरांमध्ये एक खोली ही देवपूजेसाठी राखून ठेवलेली असते. त्यात कुळदेवतेची पूजा केली जाते. त्याला 'देवघर' असे म्हणतात. घरांमध्ये कौलारू छप्पर असते. छप्परच्या खालोखाल एक मोकळी जागा असते त्यात अनेक गोष्टी ठेवण्यात येतात. त्या जागेला 'माळा' असे म्हणतात. तिथे प्रामुख्याने लोकं आपली भातशेतीचं उत्पादन गोळा करून ठेवतात. स्वयंपाक घर, पडवी म्हणजे दाराजवळची मोकळी जागा, ओटी म्हणजे हॉल अशी घरांची रचना अजून मात्र टिकून राहिली आहे. घरांच्या आजूबाजूला आंबा, फणसाची झाडे लावलेली असतात. घराच्या मागच्या बाजूला परसामध्ये फुलांची आणि पालेभाज्यांची लागवड केलेली असते. थोड्या दूर अंतरावर बांबूच्या झाडांची लागवड केलेली असते. 

पावसाच्या ऋतुमध्ये गावातील निसर्ग विविध रंगाने सजतो. तसेच ऋतुनुसार वेगवेगळ्या फळांची, फुलांची मुक्तहस्ताने उधळणही करतो. त्यामुळे पावसाळ्यात विविध रान पालेभाज्या तसेच काकड़ी, पडवळ, चिबुड़ अशी फळे व फ़ळभाज्या मिळतात. रानटी आळंबीची भाजी खाल्लीत तर परत शहरातील मशरूमच्या वाटेला जाणार नाहीत. हिवाळयात चिंचा, बोरे आणि आवळे, उन्हाळ्यात फणस, आंबे, काजु आणि करवंदे अशी निसर्गाची माया सांड़त असते.

गावातील माणसं ही जन्मताच कष्टाळू, मिळेल ते काम करणारी,सहिष्णू ,दयाळू ,दैववादी, धार्मिक आणि इमानी आहेत. पण त्यांच्या अस्मितेला कुणी धक्का दिला तर प्रसंगी रागीट पण आहेत. निसर्गाने गावाला अमूल्य देणगी दिली आहे. हिरवळ, उंच डोंगररांगा, भात शेती अशा वातावरणात वावरलेली माणसं, अल्पसंतुष्ट आणि सुखी आहेत. मिळेल ते काम आणि पोटापुरते अन्न यातच त्यांचे  सर्व सुख सामावले आहे. 



असे पडले नाव 'पालू'


माझे गाव मराठी निबंध लेखन

प्रत्येक गावाच्या नावामागे एक इतिहास दडलेला असतो. माझ्या गावाच्या नावामागे महाभारतातील एका कथेची पार्श्वभूमी सांगितली जाते. श्रीकृष्णाची रुतलेली पावलं, त्यावरून पालव (पालू) हे नाव पडलं. श्रीकृष्ण व मुचकुंद ऋषी यांची ती कथा अशी आहे. फार काळापूर्वी देवदानवाचे युद्ध झाले. दानव युद्धा मध्ये भारी होऊ लागेल असता मुचकुंद ऋषींनी देवांना युद्धात सहकार्य केले व देवांचा विजय झाला. युद्धामूळे मुचकुंद ऋषी थकले असता त्यांनी देवांकडे अज्ञात ठिकाणी वास करून विश्रांती व तपश्चयेसाठी अनुमती मागितली. देवांच्या आज्ञेप्रमाणे पालू गावाच्या पाठीमागे आजही दिमाखात उभ्या असलेल्या विशाल सह्याद्रीच्या टोकावर एका गुहेत तपश्चर्या करत राहिले.

महाभारत काळात श्रीकृष्ण व कालियावन राक्षस यांचे युद्ध सुरू असताना, श्रीकृष्णाच्या हातून कालियावन मरेना. श्रीकृष्णालाही माहित होते याचे मरण आपल्या हाती नाही. म्हणून कृष्ण प्रभानवल्ली या गावातून पळत निघाले. कालियावन त्यांच्या मागून होताच. श्रीकृष्णाला माहीत होते याचे मरण मुचकुंद ऋषींच्या हाती आहे. श्रीकृष्ण हळूच मुचकुंद ऋषींच्या गुहेत शिरले. मुचकुंद ऋषी तपश्चर्या करून झोपले होते. कृष्णांनी त्यांच्या अंगावर आपला शेला पांघरला, आणि स्वतः ही गुहेत दुसऱ्या बाजूला लपून बसले. कालियावनाला वाटले झोपलेला कृष्ण आहे. त्याने त्यांना लाथ मारली, आणि म्हणाला. 'तू इथं लपून बसलास तर! मुचकुंद ऋषि रागाने लाल झाले, मुचकुंद ऋषींनी कालियावनाकडे बघताच क्षणी कालियावनाचा भस्म झाला. त्यानंतर लपलेल्या कृष्णाने कडे-कपाऱ्यामधून उडी मारली ती थेट खाली पालू गावामध्ये. श्रीकृष्णांची पावले तिथल्या चखलात रुतली. अश्या प्रकारे रुतलेल्या कृष्णाच्या पावलांचे ठसे पालू गावाला लागले. अश्या प्रकारे पालव हे नाव पडले. नंतर पालवचे पालू असे झाले. 

असं हे निसर्गाचं वरदहस्त असलेलं आणि पूर्वजांची पुण्याई लाभेलेलं कोकणातील एक टुमदार गाव - पालू. आधुनिक औद्योगिकरण आणि जीवनपद्धतीमुळे आज महाराष्ट्रातील प्रत्येक गावे शहराच्या वाटेवर जात आहेत. गावाने विकासाची वाटचाल नक्कीच करावी. मात्र आपला पारंपरिक वारसा आणि गावचं नैसर्गिक सोंदर्य जपूनच. निसर्गाने दिलेला हा अमूल्य ठेवा माझ्या गावातील (majhe gaon) लोकं कितपत जपतील? हाच मोठा प्रश्न सतावत आहे.

- विशेष आभार: हर्षद नामे, बंटी चव्हाण (मु. पो. पालू, लांजा)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या