कोकणातील होळी-शिमगोत्सव | Holi Festival In Konkan

    

 कोकणातील शिमगा उत्सव | Holi Festival In Konkan

कोकणातील होळी-शिमगोत्सव वर्षातून दोनवेळा माझं गाव गजबजत ते म्हणजे एकदा गणेशोत्सवात आणि शिमग्याच्या दिवसात. गणपतीनंतर गावात नवचैतन्य आणणारा सण म्हणजे होळी. या दोन ही वेळी मुंबईचे चाकरमानी अगदी आवर्जून हजेरी लावतात. 'रे पोरा घराशीक आठव, पाच तरी रुपये पाठव.' असं बापाला मुलाला पत्र पाठवण्याची गरज भासत नाही. शिमगा म्हटल्यावर बायकापोरांसकट, पैसे गाठीक बांधून तो गावाला निघालेला असतो. खऱ्या अर्थाने हा लोकोत्सव असतो. लोकांनी लोकांसाठी लोकांकरता साजरा केलेला सण. भट-बामणांचा आधार न घेता! पूजाअर्चा मानकरी असलेल्या कुणबी, मराठ्यांनीच करायची. शिमग्याला भटजी लागत नाही. प्रत्येक गावानुसार हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. Holi festival in village.

kokanatil holi utsav
गावातील पालख्या


मुंबईत होळीचं महत्त्व फक्त एकाच दिवसांच असतं. पण माझ्या गावात, कोकणातील शिमगा पालखी ( Palakhi ) मात्र त्या आधीपासूनच म्हणजे फाल्गुन पंचमीपासून होळीला सुरुवात होते. हा सण सुमारे 5 ते 15 दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी /त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. शिमगोत्सावाची सुरुवात होते ती ग्रामदैवत रवळनाथ देवाच्या मंदिरात. देवाला कौल लागतो कौल मिळाला कि उत्सवाला सुरुवात होते. होळी कुठून आणायची हे अगोदर पासूनच ठरलेलं असतं. सगळा गाव मिळून सूरमाडाची प्रचंड होळी उचलत आणि नाचवतच आणि अगदी धावतच वर्षानुवर्षाच्या गावाच्या निश्चित केलेल्या जागी म्हणजे मांडावर आणली जाते. हे काम खूप जिकिरीचे आणि जबाबदारीचे असते. 

सुमारे 50-70 फूट उंचीचे, आणि सुमारे 1200-1500 किलो वजनाचे झाड तोडून ते गावकरी खांद्यावरूनढो लताशाच्या गजरात, नाचत, गात आणतात. शेकडो हात एकत्र येतात आणि होळी उभी केली जाते. इतकी मोठी होळी पाहता पाहता लिलया उभी राहते. मग होम केला जातो, गावातील नवीन जोडपी या होमात नारळ देतात .तो एक महत्त्वाचा विधी असतो. होळी झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची परंपरा म्हणजे उत्सवाची पालखी ही होय. पालखीत देवांचे मुखवटे लावले जातात आणि देवाला नवीन वस्त्र नेसवली जातात, मुखवट्यांना सजवले जाते. शेकडो वर्ष जुने दागिन्यांनी ग्रामदेवता सजते. याला देवाला 'रूपं लावणे ' असं म्हंटले जाते. कुलदैवत, ग्रामदैवत, यांचे स्मरण व पूजन केले जाते. ग्रामदेवतेच्या मंदिरातून ग्रामदेवतेची पालखी निघते. पालखी निघाली की अख्खा गाव तिच्या मागे. पालखी उचलायची कुणी, ती कुठल्या वाडीतून न्यायची, ती कुठे प्रथम थांबवायची, जागरण कुठे, जेवण कुठे, खेळे कुठे हे सारं ठरलेलं असतं. घरोघरी अंगण शेणाने सारवून सज्ज. घराला तांबडा लखलखीत रंग आणि त्यावर चुन्याच्या नक्षी. पक्ष्याच्या, प्राण्याच्या, फुलांच्या, वेलींच्या. भांडीकुंडीही घासून स्वच्छ. नवा भात गिरणीला लावून आणलेला. वस्तीसाठी आलेला देव आणि त्याबरोबरची वाडीवरच्या माणसांच्या जेवणाची  तयारी.

'देव उपाशी नाय गेला पायजेल, माझ्या दारातून.
भलं वरीसभर मी उपाशी राहीन, पण देवाचं पॉट रिकामी राहिलं नाय पायजेल...'

खरंतर देव जेवणार नसतो. देवाच्या निमित्ताने गाव जेवणार असतं आणि देवालाच तो गावाच्या रूपाने बघत असतो. दिवसभर हि पालखी प्रत्येकाच्या घरी जाते याला 'घर घेणे ' असं म्हणतात. पालखी म्हणजे प्रत्यक्ष देवच आपल्या घरी येत असतो. याचा आनंद काही वेगळाच असतो. पालखी घरी आल्यावर घरातल्या सुवासिनी,माहेरवाशिणी खणा-नारळाने ओटी भरतात. तिच्यापुढे नवस बोलतात. मृदंगच्या थापेवर नवीन लग्न झालेल्या जोडप्यांची लग्नाची 'वाणकरणी' म्हटली जाते. 'वाणकरणी' म्हणजे काव्य स्वरूपात टाळ-मृदंगच्या गजरात नवविवाहीत जोडप्यांसाठी देवापुढं गाऱ्हाणं घातलं जात. शिमगोत्सावात रंग भरतात ती इथली पारंपारिक वाद्य, ढोल, ताशा, मृदंग आणि याचवेळी साऱ्या दिवसांत खेळे, नमन, सोंगे, गोमूच्या गाण्यांनी सार गाव गजबजून जातं.  सारं गाव होळीच्या उत्साहात रंगलं असत. स्त्रीच्या वेषातला पुरुष, राधा मुदृंगाच्या तालावर फेर धरते. हाताच्या तालावर पायांना नाचावत गिरकी घेत राधा गाते. राधा, नमन वाल्यांचा मान द्यावाच लागतो. तर, गावातली पोरंटोर,

वाळकेश्वरी हवा डोंगरी बंगला बांधिला वरच्यावरी | त्या बंगल्यावर चित्र काढिले पोपट चिमणी मोर गो || म्हणत  'खेलेपान' मागणार. दोन पैसे कमावणार.

पालखी घरं घेताना,  पालू


दिवसभर ठरलेली घरं घेऊन झाली की संध्याकाळी पालखी आपल्या जागेवर म्हणजे पुन्हा मांडावर येते. त्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू होतो. त्यास 'पालखी खेळवणे' असे म्हणतात. लाकडी कोरीव अशी ही पालखी शंभर दोनशे किलोची, पण एखाद्या 'सिंगल फसली' माणसं एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर, डावीकडून उजवीकडे, चारही दिशांना गोल गोल नाचवू लागली की थक्क व्हायला होतं. ढोल, ताश्यांच्या आवाजात पालखी कधी डोक्यावर,खांद्यावर अशी खेळवली जाते. आणि मुख्य म्हणजे या पालखीतील देव जराही हलत नाही. होळीच्या शेंड्याखाली  संपूर्ण गावाच्या साक्षीने उभे राहून गार्‍हाणे घातले जातात ज्यात मागच्या वर्षीचे नवस फेडणे आणि यावर्षी नवीन नवस करणे असा प्रकार असतो. त्यानंतर बैठक(गावची सभा) असते ,ज्यात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते.


काही गावात पालखीने खुणा काढणे हा कार्यक्रम असतो ,यामध्ये गावचा गुरव आदल्या रात्री एक नारळ सहाणे समोर पटांगणात जमिनीत लपवून ठेवतो. तो नारळ पालखी हुडकून काढते. हा कार्यक्रम देखील पाहण्यासारखा असतो. मोकळ्या चव्हाट्यावर एक ठिकाणी नारळ पुरला जातो आणि तो पालखीने शोधून काढायचा. खुल्या मैदानात पालखीच्या नाचाला उधाण येते. खांदेकरी अशा काही किमयेने पालखी नाचवतात की एक क्षण आपल्याला वाटते की ती निसटणार तर नाही, पण हवेत हलकाच झोक घेत ती पुन्हा खांद्यावर स्थिरावते तेव्हा काळजात कुठेतरी धस्स झालेलं असतं. अचानक मोराच्या पिसासारखी भासणारी पालखी जड जड होत जाते आणि खांदेकरांच्या तालावर नाचण्याऐवजी तीच त्यांना घुमवायला सुरुवात करते. खेचत खेचत खांदेकऱ्यांनाच पालखी नारळ पुरलेल्या ठिकाणी घेऊन जाते आणि तिचा खूर आपटला जातो. पुरलेला नारळ सापडतो!
खरंच !! डोळ्यांचं पारणं फेडणारा असा हा उत्सव असतो. कदाचित या परंपराच या गावाच्या समाज व्यवस्थेचा कणा असतात. यामुळेच कोकणातील प्रत्येक गावात वर्षानुवर्ष साजऱ्या होणाऱ्या या शिमगोत्सवाच्या उत्साहात कुठे कमतरता येत नाही.

शिमगोत्सवात वैशिष्ट्यपूर्ण असतात ते गावातील मानपान. इथेही प्रत्येकाचा परंपरेने आलेला मान ठरलेला असतो आणि तो प्रत्येक जण पाळतो. शिमगोत्सव म्हंटला की अनेक मानापमान आणि वाद हे ओघानं आलंच. गावात दोन गट असले तरीही होळीच्या आधी एकमेकांच्या नावानं शिमगा करणारी गावातली माणसं या सोहळ्याला मात्र मनापासून एकत्र येतात. हा शिमगोत्सव गुडीपाडवा येईपर्यंत चालू असतो. गुडीपाडव्याला देवाला जी रूपं लागलेली असतात ती उतरवली जातात आणि इथे शिमग्याची सांगता होते.

तर असा आहे माझ्या गावतील शिमगोत्सव ! Holi festival in village  शिमगोत्सव हा सांगायचा नाही तर अनुभवाचा उत्सव आहे. गावकरी आणि चाकरमानी यांच्या साथीने गावातील संस्कृती अनुभवायला एकदा तरी शिमग्याला माझ्या गावात याच !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या