ग्रामगीता - संत तुकडोजी महाराज | Gramgeeta Tukdoji Maharaj

   


संत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता
        

ग्रामगीता - संत तुकडोजी महाराज | Gramgeeta Tukdoji Maharaj in marathi राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (पूर्ण नाव - माणिक बंडोजी इंगळे, (१९०९-१९६८) हे आधुनिक काळातील महान संत होते. भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. त्या वेळी त्यांनी भारतीय ग्रामीण क्षेत्रांमध्ये लक्षणीय सुधारणा केल्या आणि आजही त्यांनी केलेल्या कार्याची अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थां प्रेरणा घेत आहेत. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. त्यासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. ग्रामोन्नतीच्या तळमळीतून प्रकटलेले आर्त उद्‌गार म्हणजे ग्रामगीता होय. तुकडोजी महाराज म्हणायचे, "माझा देव साधनारूपाने देवळात वा वनात असला, अनुभवरूपाने तो मनात वा चिंतनात असला तरी कार्यरूपाने तो जनात आहे. विस्तीर्ण स्वरूपात पसरलेली गावे, हीच माझी दैवते आहेत. ग्रामसेवा हीच माझी पूजा आहे.''

तुकडोजी महाराजांची " ग्रामगीता ' म्हणजे त्यांच्या मनात घर करून राहिलेल्या गावाचे, ग्रामसंस्कृती आणि ग्रामविकासाचे नितळ रूप होय. ग्रामगीता म्हणजे गाव-खेड्यांसाठी जणू दुसरी श्रीमद भगवद गीता म्हणावी लागेल. हा गाव सुखी व्हावा. सर्वार्थाने समृद्ध व्हावा. परस्परांचा स्नेहभाव जागवावा. ज्यांचे हात श्रमांसाठी पुढे सरसावले आहेत, त्यांच्या श्रमांना प्रतिष्ठा मिळावी, मानवतेचे तेज झळाळावे, या तळमळीने त्यांनी ही ग्रामगीता अर्पण करून ग्रामजीवनात समृद्धी आणणारी ग्रामदेवता जनमनात जागवली. विशेषतः त्यांनी गावांना केंद्रबिंदू ठेवून गाव कसा असावा? गावातील लोकांचे वर्तन, आचरण कसे असावे? गावपुढारी, समाजसेवक कसा असावा? त्यांची गावापरी कर्तव्य काय असावित? ग्रामविकास कसा घडवता येईल? गावातील तरुणांनी यासाठी कसे प्रयत्नशील राहावे? इत्यादी विचार साध्या-सोप्या आणि अगदी सरळ भाषेत परखडपणे मांडले आहेत. ग्रामोन्नतीच्या तळमळीतून प्रकटलेले आर्त उद्‌गार म्हणजे ग्रामगीता होय. तुकडोजी महाराजांनी ही ग्रामगीता ग्रामदेवतेलाच अर्पण केली आहे. ग्रामगीता सोबतच त्यांनी अनुभव सागर भजनावली, सेवास्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी साहित्य रचना केली.

ग्रामगीतेत एकूण एकेचाळीस अध्याय आहेत. त्यातील काही  निवडक अध्याय आणि ओव्या आपणास जसेच्या तसे देत आहे.


   ग्रामरक्षण   

ईश्वरसेवाचि गांव-सेवा । तो सर्वांच्याचि सुखाचा ठेवा । परि कांही असुरहि असती गांवां । यज्ञभंग करावया ॥
एका सज्जनें प्रश्न केला । गांवीं बाग फुलूं लागला । परि दुष्ट लाविती आग त्याला । काय उपाय नित्यासाठीं ? ॥
आम्हीं केली संघटना । निवडोनि आणिलें सज्जना । परंतु दुर्जनापुढे बनेना । कांही केलें तरीहि ॥
त्यांना दावा आदर्श जीवन । अथवा प्रचारें द्या पटवून । किंवा सेवा रात्रंदिन । करा त्यांची हवी ती ॥
परंतु ते न जुमानिती । उपदेश देतां उलटे चिडती । कार्यकर्त्यांसि हाणूनि पाडिती । पदोपदीं अडवोनिया ॥
चांगल्यातूनहि काढिती वाईट । हवा फैलाविती रोगट । सज्जनांवरि आणिती संकट । कारस्थानें करोनि ॥
मित्रा ! जो जो जेयीचा रोग । तेथेचि त्याची औषधि सांग । योजकचि पाहिजे कराया उपयोग । कुशलपणाने ॥
सत्य पडताहे कमजोर । म्हणोनीच असत्य होई शिरजोर । यास्तव सत्यासि करावें कठोर । सामर्थ्यशाली सेवेसाठी ॥
सत्याचें बळ वाढेल कैसें । तेंहि सांगतों ऐका शांतसे । सज्जनांनी न बसावें आळसें । अथवा हताश होवोनि ॥
लोकांचिया मनीं जरी दहशत । तरी तुमच्यासारिखेचि कांही त्यांत । असतील हृदयीं तळमळत । चांगलें व्हावें म्हणोनि ॥

गावात सक्षम आणि बळकट संघटन असणे आवश्यक आहे, ज्यांच्याजवळ लोकं येऊन आपआपले दुःख, प्रश्न मांडू शकतील. त्यासाठी गावकऱ्यांनी एकत्रित येऊन गावातील जे त्यागी, इमानदार, निर्भय आणि चरित्रवाण लोकं असतील त्यांची संघटनेसाठी नेमणूक करावी.


Gramgeeta Tukdoji Maharaj

जनतंत्राचा हा काळ । शक्ति लोकांअंगींच सकळ । जनतेच्या निश्चयाचें बळ । साम्राज्यासहि नमवूं शके ॥
हत्तीस आवरी गवती दोर । मुंग्याहि सर्पासि करिती जर्जर । व्याघ्रसिंहासि फाडिती हुशार । रानकुत्रें संघटोनि ॥
संघटनेने काय नोहे ? । बिंदू मिळतां सिंधुपणा ये । गांवचा बाग बहरोनि जाय । फुलाफळांनी संघटनेच्या ॥
ग्रामसुधारणेचा मूलमंत्र । सज्जनांनी व्हावें एकत्र । संघटना हेंचि शक्तीचें सूत्र । ग्रामराज्य निर्माण करी ॥
गांव करी तें राव न करी । ऐसें सांगोनि ठेविलें चतुरीं । जरी दाद न घेतील अधिकारी । तरी गांव तय सुधारूं शके ॥
यासाठीच पाहिजे सशक्त संघटन । जें करी अन्याय-निर्मूलन । देवोनिया न्यायदान । करी रक्षण गांवाचें ॥
संघटन गांवीं मजबूत असावें । आपापलें दु:ख त्यासि सांगावे । कोणावरि अन्याय होऊं न द्यावे । कार्य संघटनेचें ॥
त्यासाठी मिळोनि लोक नेमावे । जे असतील इमानी बरवे । त्यागी निर्भय, चरित्र असावें । उज्जल ज्यांचें ॥
गांवाचे जे पवित्र सेवक । तेचि प्रसंगी होती सैनिक । ज्या गांवी ऐसे सावध पाईक । तेथ विघ्न न ठाके ॥
कांही अपराध घडतां गांवांत । त्वरित कळवावी खबरमात । सर्वांनी भाग घेवोनि त्यांत । ठीक करावें बिघडेल तें ॥
गांवचा प्रत्येक सज्ञान । यांचें असावें सहकार्य पूर्ण । हांक देतां सर्वजण । जमोनि यावेत एकत्र ॥
एकाने कोणी गुन्हा केला । शहाणपण सांगावें सकळांनी त्याला । गुन्हेगार ऐकेनासा झाला । शिक्षा द्यावी गांवाने ॥
जेथे समजदार प्रलोभनीं पडला । सोंग करोनि घोरूं लागला । चिमटे घेवोनीच त्याला । उठविलें पाहिजे ॥
कोळसा साबूने धुवा उगाळा । परि तो शेवटवरि काळा । अग्निसंस्कारी जळतां उजाळा । येई त्यालागी ॥
ऐसी असावी गांवाची तयारी । तरीच गांव बनेल स्वर्गपुरी । नलगे सत्ताधीशांची तुतारी । पाठीमागे ॥
ऐसा होतां आचार-विचार । गांव होईल न्यायभांडार । जागृत असतां सज्जन चतुर । सेवेसाठी ॥
ऐका ऐसी विचारसरणी । ऐकोनि भुलूं नये कोणी । तारतम्यचि ठेवोनि मनीं । गांव सुधारावें विचारें ॥
काय केलें म्हणजे होतो सज्जन । याचें आहे मोजमाप जाण । हें प्रथमक्षणींच ओळखोन । हुशार व्हावें गांवाने ॥
म्हणोनि गांवीं कोणी अन्याय केला । दु:ख दिलें कोणा गरिबाला । त्याचा प्रतिकारचि पाहिजे झाला । गांवामाजी ॥
नाहीतरि गुंडांस फावे । सुटती जैसीं स्वैर गाढवें । दुष्टासि दया करोनि सोडोनि द्यावें । नव्हे हा धर्म ॥
अन्याय होतां प्रतिकारचि करावा । प्रथम अन्याय समजूनि घ्यावा । निश्चित कळतां आवाज द्यावा । संघटनेचा ॥
अन्याय नाना तर्‍हेचे असती । कांही धनाचे मानाचे दिसती । कांहींनी वाढे व्यसन अनीति । लोकांमाजी ॥

जेव्हा गावातील कार्यकर्तेच गाढ झोपेत असतात तेव्हाच गावाची अवदशा सुरू होऊन गावगुंड्याचा तमाशा सुरू होतो. शहाणी लोकं गाव सोडून शहरात गेली त्यामुळेच इथे रान माजेलेलं आहे. त्यांनी परत आपुल्या गावी मुक्काम करून, इथेच व्यवसाय- उद्योगधंदा सुरू करावा आणि रक्षण करावे. तेव्हाच गावाचे गावगुंड पासून रक्षण होईल.

त्या सर्वांतूनि मार्ग काढावा । गांवीं दुराचार होऊं न द्यावा । हाचि खरा धर्म ओळखावा । विचारवंताने ॥
न्यायाचा कांटेकोरपणा । भिनावा आपुल्या हृदयीं जाणा । एका बाजूने दयेचा बाणा । दुसर्‍या बाजूने न्यायदंड ॥
हेंचि खरें मानवाचें लेणें । उगीच आहे सोनें मिरविणें । अंगीं वीरता नसतां मरणें । चोराहातीं ॥
कांहीलोक भोळे असती । आपुलें मानव्यभूषण खोविती । लोक त्यांसीच सात्विक म्हणती । वेडयापरी ॥
ज्यास करवेना ब्रीदाचें रक्षण । नाही अंगीं न्यायाचें भूषण । तो कैसा सात्विकजन । म्हणावा आम्हीं ? ॥
जो चोरांनी नागवावा । गुंड लोकांनी फसवोनि द्यावा । परस्त्रियेने भोंदवावा । तो सात्विक कैसा ? ॥
तोंडावरची न उडवी माशी । दच्के पाहतांचि पोलिसासि । न कळे आपुला हक्कहि ज्यासि । सात्विक त्यासि म्हणों नये ॥
त्यास म्हणावें दुबळा प्राणी । भित्रा विकासहीन अज्ञानी । ज्यांत नाही पुरुषार्थाचें पाणी । रक्षणासाठी ॥
सर्वाभूतीं परमेश्वर । त्यासि बाधक नसे सत्यव्यवहार । करावें संघटनेने गांव सुंदर । ही पूजाचि तयाची ॥
सर्वाभूतीं प्रेमभाव । वाढवावा गुणगौरव । दूर सारोनि उपद्रव । गांवचे आपुल्या ॥
आपुले वारकरी भाविक । तेचि वारकर्ते पाईक । करोनि दुष्टांसि  लाविला धाक । शिवाजीच जणुं सर्वहि ॥
तीच घेवोनि प्रेरणा । गांवी उभारावी न्यायसेना । जेणें कांही नुरे धिंगाणा । गांवीं आपुल्या ॥
दारू गांजा भांग अफीम । जुगार वेश्यादि वाईट काम । यांचें उरूं न द्यावें नाम । आपुल्या गांवीं ॥
त्यासाठी गांवच्या कांही सज्जनांनी । लागावें व्यसन-निर्मूंलनीं । उत्तम गुणांच्या अनेक श्रेणी । वाढवाव्या गांवीं ॥
गांवचे चार सज्जन मिळोनि । अनिष्टप्रथा बंद कराव्या त्यांनी । ज्याने गांवास पावे नुकसानी । न ठेवावें तें ॥
कांही उन्मत्त शेतकरी । टोचती बैलासि तुतारी । रक्त काढूनि वासना पुरी । करिती आपुली ॥
परस्परांना मदत करावी । अडीअडचण ती निभवावी । सर्वांकडोनि करोनि घ्यावी । योग्य सेवा ॥
गांवसेवेंत आली अडचण । तिला द्यावें अग्रस्थान । आपापली जागा-जमीनहि देऊन । सोय करावी सर्वांची ॥
सर्वांकडोनि ऐसी सेवा नव्हे । तरि गरजूंना सहकार्य द्यावें । होईल तेवढें तरी करावें । निष्कपटपणें ॥
मुलाबाळांचें असतां लग्न । सर्वांनी जावें धावोन । पडोंचि न द्यावें ओझें, न्यून । आईवडिलांसि तयांच्या ॥
थोडेंथोडें सर्वांनी आणावें । वरवधूंना साहित्य द्यावें । भोजनापासोनि उरकवावें । सर्वतोपरीं ॥
मांडवावरी पांच डहाळे । टाकावे हा धर्म गांवकर्‍या कळे । तैसेचि निभवावे प्रसंग सगळे । सहकार्याने ॥
जैसें जैसें सहकार्य वाढे । तैसें गांव उन्नतीस चढे । न पडे विपत्तीचें कोडें । गांवीं कोणा मानवासि ॥
ऐसी सेवा बिंबतां जीवनीं । कांहीच गांवीं न पडे उणी । तरीहि असावा स्वतंत्रपणीं । सेवकांचा विभाग ॥
सुसज्ज असावेत गांवचे तरुण । कोणतेंहि संकट येतां ऐकून । आपुलीं सर्व कामें सोडून । धांव घ्यावी तयांनी ॥
आग लागणें, विहिरींत पडणें । कॉलरा होणें, मूर्च्छा येणें । प्रत्येक प्रसंगीं धांवून जाणें । कर्तव्य त्यांचें ॥
ऐसी ग्रामसेवेची योजना । जागृत जेथे ग्राम-सेना । तेथे स्वर्गींच्या नंदनवना । बहर येई सहजचि ॥
ऐसें संघटनांनी गांव । भोगूं लागेल दिव्य वैभव । ग्रामराज्यचि सुखाची ठेव । तुकडया म्हणे ॥


  ग्रामस्नान   

एका सज्जनें विचारिलें । म्हणे ग्रामराज्यांत काय ठेविलें ! जिकडे तिकडे गोंधळ चाले । अस्ताव्यस्तपणाचा ॥
कागदीं पुस्तकांत, काव्यांत । खेडयाचें वर्णन दिव्य बहुत । परि वस्तुस्थिति पाहतां तेथ । क्षणभरीहि राहवेना ॥
रस्ते सर्व घाणींनी भरले । आजूबाजूंस डबकें साचलें । एकहि काम न निभे तेथलें । शहराविण ॥
’ खेडयाकडे चला ’ म्हणतां । परि एकहि सोय नसे पाहतां । घरें कसलीं ? हुडेचि तत्त्वता । डुकरखोपडे खुराडे ॥
नाही कसलें मनोरंजन । दंढारी-तमाशावांचून । उगेचि कां करावें वर्णन । खेडें उत्तम म्हणोनि ? ॥
मित्रा ! तुझें म्हणणें ऐकिलें । माझ्या मनीं योग्य तें पटलें । त्याचें कारण तेंहि ऐकिलें । पाहिजे श्रोतीं ॥
जेव्हा कार्यकर्ते होती आळसी । त्यांत उपभोगाची वाढे खुशी । तेव्हाच अंतर पडे कार्यासि । गांवशिवेच्या ॥
एकदा चुकलें तरि चाले । पण नेहमी चुकतचि गेलें । त्यानेच राज्यांचेंहि मरण ओढवलें । गति काय गांवांची ? ॥
कार्यकर्त्यांनीच घेतली निशा । काय पाहतां मग गांवाची अवदशा । सुरू झाला गुंडांचाचि तमाशा । लोक झाले भलतैसे ॥
वतनदार इजारदार । ग्रामजोशी वेशकर । पूर्वी ज्यांना ज्यांना ग्रामाधिकार । चुकलें त्यांच्या हातूनिया ॥
चुकलियावरीहि कोणीच बघेना । मग लोक काढती वाटा नाना । जैसा ज्यास वाटे धिंगाणा । करूं लागती हौसेने ॥
कोणी हौसेने घर बांधलें । मार्गावरीच ओटे वाढले । कोणाचें छप्पर पुढे आलें । गाडी कांही जाईना ॥
कोणी घाण नाली सोडूनि दिली । ती सर्व मार्गावरि आली । माणसें ढोरें सारीं फसलीं । घराभोंवती बिचार्‍याच्या ॥
कांहींनी सांडपाणी साचविलें । मच्छर जंतु अति वाढले । रोगराईनी बेजार झाले । शेजारी सगळे ॥

सर्वांनी मिळोनि गावातील स्वच्छता राखावी. मी समजतो हे गाव एक शरीर आहे. त्यास नेहमी पवित्र राखावे. त्यानेच गावी सर्वत्र आनंद नांदेल. ज्याप्रमाणे आपण स्नान करतो, त्याप्रमाणे गावासही स्वच्छ, निर्मळ ठेवावे.


gramgeeta tukdoji maharaj

कांहींनी सडकेवरि गुरें बांधलीं । त्यांतहि मारकुंडींच निघालीं । मार्गस्थांची फजीती झाली । सांगतां येना ॥
कांहींनी दारीं दगड ठेविले । जाणाराचें गाडेंचि उलटलें । कांही ठोकर लागोनि पडले । अंधारामाजी ॥
कांहींनी टाकला पुंजाणा । केरकैचणीं कांचखिळे नाना । बोचती येणार्‍या-जाणार्‍यांना । बोलूंच नका ॥
साहेब चाले मोटारींनी । कांही जाती जोडे घालोनि । गरीबास विचारीना कोणी । पाय त्याचे फुटले तरी ॥
सडकीं फळें शेंग टरफलें । कुजके सोप मार्गीच टाकले । आजूबाजूस पाहोनि फेकलें । ढोबर त्यावरि माऊलीने ॥
गांवचे मार्ग विष्टेने व्यापले । आड कोने घाणींनी भरले । ठायींठायीं उकिरडे साचले । गांव वेढलें गोदरींनी ॥
घराघरांचे कुंप सडले । कांटे रस्त्यावरीच पडले । फास आणणारासहि न कळलें । साफ करावें म्हणोनिया ॥
गांवीं खंडार्‍यांत माजलें रान । विंचू-सर्प राहती लपोन । पडक्या गढीचे हूडे भयाण । तेथील घाण पुसूं नये ॥
विहिरी कोणी बांधून ठेविल्या । त्या पुन्हा नाही दुरुस्त केल्या । घुणार्‍या घाण करीतचि गेल्या । सडला पाण्यांत पाचोळा ॥
कोणी रस्त्यावर टाकिला गाळ । विहिरी मोर्‍या उपसोनि ओंगळ । टाकोले हीर, फुटके खपरेल । मेलेले उंदीरहि त्यावरि ॥
श्रीमंतांचे वाढले गोठे । रस्त्यावरीच आले ओटे । मार्गीच लाकडें विटा गोटे । कोण बोले तयांना ॥
गांवातील पंच झोपले । " काय म्हणावें ? नातलग मित्र आपलें ! " म्हणोनि त्यांनी डोळे लाविले । गांव झालें डोंगर हें ॥
ऐसीच विचित्र गांवाची स्थिति । हें आलें माझ्या अनुभवाप्रति । म्हणोनीच वाटे लावावी सुसंगति । गांवोगांवीं आतातरी ॥
हे सगळेंचि दुरुस्त कराया । शहाण्यांनी जावे खेडयांकडे या । आदर्श ग्राम हाचि पाया । राष्ट्राचा असे म्हणोनि ॥
जें जे गांवीं शहाणे झाले । शक्तियुक्तींनी पुढे निघाले । ते सर्व शहराकडे धावले । म्हणोनि माजलें रान येथे ॥
भंगी साफ करिती शहर । तैसे पूर्वी कामदार महार । झाडीत होते गांवगल्ली सुंदर । पुढे केवळ पाटलांची ॥
कधीकाळीं काढिती भजन । घरोघरीं बोलावया जाऊन । तुटका वीणा टाळ दोन । मृदंग गेला कामांतूनि ॥
मग राहिले वाजंत्रीबाजे । त्यांतहि तालस्वर अंदाजें । कसेंतरी लाविती, साजे । लग्नमौंज म्हणोनिया ॥
कर्णा शंख घंटया नगारे एकचि गोंधळ करिती सारे । बेताल होतां कोठूनि भरे । ताल जीवनीं गांवाच्या ॥
ऐसा झाला तालतितंबा । विस्कळित झाल्या कीर्तनें, सभा । म्हणती ’ दयायावी रुक्मिणीवल्लभा ’ । आपुली शुध्दचि नाही ॥
गांव-देवळाची पालखी निघे । जो तो तमाशा म्हणोनि बघे । कसली भावना ? खिदळती तुंगे । आयाबाया पाहोनि ॥
चालतांना शिस्त नाही । जनलोकांची अजीव घाई । कोणाचाहि पायपोस नाही । पायीं कोणाच्या ॥
कोणी कोणाचें ऐकेना । पुढे घासावयासि करी धिंगाणा । याचे शिक्षणचि नाही कोणा । कैसे चालावें मार्गाने ॥
नाही चालणारांसि शिस्त । चालती जैसीं जनावरें समस्त । माणसाचें चालणेंचि स्वस्थ । विसरले लोक ॥

गावात ठिकठिकाणी अशी विचित्र परिस्थिती अनुभवायास मिळते. म्हणूनच हे सगळे दुरुस्त कराया शहाण्यांनी आता गावाकडे यावे. कारण आज आदर्श गावाचा पाया तुम्ही रचलात. तर अखंड राष्ट्र आपोआपच आदर्श म्हणून विकसित होईल. 

मार्गीं लागती ठोकरा । कितीकांच्या बोटांचा झाला चुरा । रेटा बसे मागे-सामोरां । करितां प्रदक्षिणा ही सारी ॥
सध्याची ऐसीं प्रदक्षिणा । ही प्रदक्षिणेची विटंबना । मार्गाची घाण साफ होईना । प्रदक्षिणा काय कामाची ? ॥
मी समजतों गांवहि शरीर । त्यास राखावें नेहमी पवित्र । त्यानेच नांदेल सर्वत्र । आनंद गांवीं ॥
जैसें आपण स्नान करावें । तैसें गांवहि स्वच्छ ठेवीत जावें । सर्वचि लोकांनी झिजूनि घ्यावें । श्रेय गांवाच्या उन्नतीचें ॥
मिळोनि करावी ग्रामसफाई । नालीमोरी ठायींठायीं । हस्तेंपरहस्तें साफ सर्वहि । चहूकडे मार्ग ॥
त्यांत जी जी निघेल घाण । ती दूर न्यावी गांवापासून । अस्ताव्यस्त न देतां फेकून । नीट व्यवस्था लावावी ॥


 स्वावलंबी ग्रामनिर्माणकला  

हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे । हें सूत्र ध्यानीं ठेवोनि खरें । आपुलें ग्रामचि करावें गोजिरें । शहराहूनि ॥
हें गांवीचे लोक विसरले । आळसाद्वारें दुर्दैव शिरलें । दैन्य दारिद्रय सर्वत्र भरलें । गांवामाजीं ॥
शहरीं यंत्रादिकें आलीं । गांवची उद्योगकला मेली । कुशल माणसें शहरीं गेलीं । उद्योगासाठी ॥
शहरीं गेली गांवची बुध्दि । शहरीं गेली गांवची समृध्दि । कष्टाळू शक्ति, हस्तकलासिध्दि । तेहि गेली ॥
गांवीं उरली मुख्यत: शेती । ती कशीबशी चालविती । विशेष बुध्दि, शक्ति, संपत्ति । यांचा ओघ दुसरीकडे ॥
उत्तम शिक्षित, सामर्थ्यवान । ते नोकरीसाठी फिरती वणवण । उद्योगधंदे वा शेती कोठून । होईल उन्नत गांवची ? ॥
हे सर्व जरि लक्ष पुरविती । तरि छोटे उद्योग आणि शेती । निश्चयें सर्वांसि पोषिती । बेकार दीन कोणी नुरे ॥
कारण, गांवींच कच्चा माल । ज्यावरि जगतां येई खुशाल । तो गांवीं पक्का नोहे म्हणोनि हाल । गांवाचे आमुच्या ॥
कच्चा माल मातीच्या भावें । तो पक्का होतां चौपटीने घ्यावें । मग ग्रामजन कैसे सुखी व्हावे ? पिकवोनीहि ते उपाशी ॥
त्यांच्या सुखाचें मुख्य साधन । सर्वतोपरी स्वावलंबन । शहरावरि न राहतां अवलंबून । काम करावें सर्वांनी ॥
उत्तम बुध्दि कौशल्य ज्ञान । शक्ति सामर्थ्य इकडे योजून । गांवीं वाढवावें स्वावलंबन । आळस झाडून सर्वांचा ॥
जिकडे तिकडे स्वावलंबनप्रेम । घरोघरीं चालावें कांही काम । आपुलें करोनि दुसर्‍यासि निष्काम । मदत करावी मानवांनी ॥
घरीं मुलाबाळांनीहि राबावे । शेतीं कामधंदे हस्तें करावे । बायकापोरांसहित सुखी व्हावें । कष्ट करोनिया ॥
हातीं उद्योगाचें साधन । मुखीं रामनामाचें चिंतन । हाचि धर्म आहे महान । गांवकरी लोकांचा ॥
गांवचा एकेक घटक । बनवावा कलावंत सेवक । जो आपुलें घर सुरेख । करोनि गांवा शोभवी ॥
कष्ट करणाराचें जीवन । शोभा देतें देवाप्रमाण । स्वत: स्वावलंबी होऊन । सहकार्य करी जो गांवाशीं ॥

जे व्यवसाय - उद्योग  गावात नसतील तर ते सुरु करावेत. त्याचे योग्य प्रशिक्षण घ्यावे, नवनविन वस्तू निर्माण कराव्यात. त्या वस्तू गावी प्रत्येकाच्या घरी असाव्यात. अश्याने उद्योगाला चालना मिळते आणि गावचे धन गावातच राहुन गावाची शक्ति वाढते.

अहो ! जीवनाची एक तरी कला । असावी लागते मानवाला । तरीच तो ’ मानव ’ शोभला । नाहीतरि कल्ला जीवनाचा ॥
गोड बोलण्याची कला । नेटकें राहण्याची कला । अंग-मेहनतीची कला । आवश्यक आहे जीवनासि ॥
सुंदर लिहिणें अक्षरओळी । स्पष्ट वाचणें पुस्तकें सगळीं । जरा न दिसे टाळाटाळी । कोठेहि कलावंताची ॥
जीवनांत यावा सरळपणा । साधा सात्विकतेचा बाणा । हृदय-निर्मळतेचा निशाणा । कलावंताचा धर्म हा ॥
एरव्ही कला सर्वांनाच येते । कलेवांचून नाही रिते । परि तारतम्य पाहिजे तेथे । लोकांपुढे न्यावया ॥
कष्ट करोनि आपुल्या हातें । आदर्श करावें घरातें । असेल जरी झोपडी ते । भासवावी नंदनवन ॥
माती मिळवोनि घरें बांधलीं । परि चुन्यापेक्षाहि सुंदरता आली । थोडके पैसे लावोनि केली । रचना सगळी घराची ॥
आपुल्या गांवींच विटा केल्या । मडकीं-सुरया ओतल्या भाजल्या । कवेलू-कुंडयांसहित निर्मिल्या । आपुल्या गांवीं ॥
गांवचें आरोग्य असावें उत्तम । सर्व प्राणीमात्रासि लाभावें क्षेम । म्हणोनि चालवावें आरोग्यधाम । गांवामाजी ॥
आपुल्याच गांवची वृक्षवल्ली । कंदमुळें आणोनि औषधें केलीं । निसर्ग-उपचारासहित दिलीं । पाहिजेत वैद्यें ॥
चालवावें ऐसा वैद्यांप्रति । सर्पादि विषें उतरविती । घाव बुजविती हाड जुळविती । औषधें ऐसीं अनुभवोनि ॥
जेथे पुरुषांचा दवाखाना । तेथे हवी सूतिकागृहाचीहि योजना । दोहोंचीहि आवश्यकता ग्रामजना । भासतसे अत्यंत ॥
प्रत्येकाचा कितीतरि वेळ । श्रमशक्ति आणि बुध्दीचें बळ । व्यर्थ जातसे तें उपयोगी सकळ । लावितां गांव सुखी होई ॥
ऐसें गांव होतां आदर्शपूर्ण । शहराहूनीहि नंदनवन । सर्वांचें करील आकर्षण । सुंदर जीवन तुकडया म्हणे ॥


 साधी राहणी 

चिंता थोर रक्षणाची । चोरभय अग्निभयादिकांची । लालसा वाढे उपभोगाची । माणूस होय पशुजैसा ॥
असला दिसला त्यासि पैसा । जीव होतो कासाविसा । वाटे खर्च करावा कैसा । झोप त्यासि लागेना ॥
नाहीतरि पैसा जहर । शांति न लाभूं दे क्षणभर । माणसासि बनवितो वानर । चंचल चित्त करोनिया ॥
चिंता लावितो कमावितांना । पशूसारिखे कष्ट नाना । जाळतो तनुमना जीवना । सर्वकाळ मानवाच्या ॥
आला पगार खर्च झाला । सिनेमा तमाशे पाहण्यांत गेला । त्यांतूनि उरला कांही, त्याला । उत्तम मार्ग लागेना ॥
दारू, गांज्यादिक पितो । कांही पैसा सट्टयांत जातो । कांही विभागणीस लागतो । व्यभिचाराच्या ॥
कांही उन्मादाच्या भरीं । झगडा करतां मार्गावरि । वकिलांचीं घरें भरी । ’ शाहजोग आम्ही ’ म्हणावया ॥
कांही खाण्यांत आलें बाष्कळ । मग उठलें पोट, कपाळ । डॉक्टर-वैद्यांची झाली धावपळ । पैसा गेला त्यासाठी ॥
कांही दाखवाया मोठेपण । देती पार्टी, बिदागी, दान । हसतां हसतां फसती घेवोन । बेगर्जी वस्तु ॥
कांही लोक कमाई करिती । त्यांची त्यांनाच न पुरे पुरती । खर्च वाढतां कर्ज घेती । धोका भोगती जाणोनिया ॥
जैसा कर्ज घेवोनि खर्च करी । तैसा कमाईस लक्ष न घरी । तेणें संकटें येती घरींदारीं । मग विचारी ’ काय करूं ? ’ ॥
पुढे जीवा लागली हळहळ । लोटतां न लोटे पुढचा काळ । म्हणोनि बुध्दि झाली चंचळ । चोरीचहाडी करावया ॥
अक्कल नाही आमदानीची । समज नाही मोजमापाची । जीभ चटकली खाण्यापिण्याची । धरला मार्ग चोरीचा ॥
कलंक लागला घराण्यावरि । आईबापाची बदनामी पुरी । पुत्र निघाले ऐसे वैरी । उत्तम कोणी म्हणेना ॥
हौसेसाठी सोडला धर्म । किळसवाणे करिती उद्यम । नाना प्रकारें व्यभिचारकर्म । करिती आणि करविती ॥
कोणी धनिक राक्षसचि असती । पैसा देवोनि गुलाम करिती । पाप करिती करवोनि घेती । आपणासाठी ॥
कोणी फसवोनि धन कमाविती । आपणचि उपभोग भोगती । त्यांचीहि शेवटीं होते फजीती । ऐकिली कीर्ति बहुतांची ॥
कांहींना जवानीचा चढे तोरा । लग्नें करिती दहाबारा । सरला पैसा आणि बोजवारा । कोणी थारा देईना ॥
जीवनासि आवश्यक धन । सर्व कार्यांचें प्रारंभसाधन । प्रपंचीं पदोपदीं पाहिजे सुवर्ण । परि विचारधन आधी हवे ॥
नाहीतरि माणुसकीचें पडे विस्मरण । अंगीं वाढती हीन गुण । लोक तोंडापुरते म्हणती सज्जन । पाठ फिरवितां धिक्कातिरी ॥

प्रत्येक मनुष्याला एक तरी कला अवगत असावी. त्याशिवाय मानवी जीवनाला अर्थ उरत नाही. गोड बोलण्याची कला, नेटके राहण्याची कला, अंग मेहनतीची कला, सुवाच्य अक्षरं काढण्याची कला इ. अवगत असावी. परंतु, फक्त कला आणि हुशारी असुनही उपयोग नाही. ती कला लोकांसमोर उपयोगात आणता आली पाहिजे.

शेवटीं मनुष्याचा निर्मळ व्यवहार । हाचि ठेवतो हृदयीं आदर । जो परस्परांच्या हिताचा विचार । आत्मत्वाने चालवी ॥
मनुष्यधर्म म्हणोनि सर्व करावें । परि भिकारीच न व्हावें । जीवन कर्तव्यशील राहावें । ऐसेंचि करावें सत्कर्म ॥
जें टिकेल तें करणें बरें । ज्यासि सज्जन म्हणती साजिरें । कंजूषीहि न करणें बरे ! उधळपट्टीहि न व्हावी ॥
ऐपत पाहोनि प्रसंग करावे । प्रसंगीं कदर्यु न बनावें । परि पैसेहि न उधळावे । भीक लागेल ऐशापरी ॥
लौकिकासाठी भिकारी न व्हावें । अंथरूण पाहून पाय पसरावे । प्रसंग शोभे ऐसे करावे । टिकाऊ परिणाम लक्षूनि ॥
मनुष्य भावनेच्या आहारीं जातो । तेव्हा तारतम्यचि सोडतो । कांहीहि विचित्र करीत सुटतो । ’ हौसेला मोल नाही ’ म्हणोनि ॥
परिणामांची पर्वा न करितां । व्यर्थचि दाखवितो उदारता । घरीं धनसंपत्ति नसतां । कर्ज काढोनि हौस करी ॥
पुढे आपुला करोनि नाश । भिकेस लावी मुलाबाळांस । नाही कोणाचाचि विकास । ऐसें कासया करावें ? ॥

रोज न्यायाने मिळवावें धन । थोडें थोडें करावें जतन । कांही खर्चावें त्यांतून । प्रसंगासाठी संसारीं ॥
योग्य अतिथींचा करावा आदर । त्यांसहि द्यावी भाकरींत भाकर । आपुल्यापरीने करावा सत्कार । आलियाचा ॥
दुसर्‍याच्या दु:खांत दु:खी व्हावें । त्याच्या आनंदीं सुख मानावें । प्रसंगीं आपणासि वगळितां यावें । न्यायी बुध्दीने ॥
आपण कमवावें आपण खावें । परि उरलें तें गांव-कार्यीं लावावें । कमींत कमी खर्चात जावें । नेटकेपणें ॥
कमावणें ती नव्हे श्रीमंती । बचत केली तीच संपत्ति । यानेच संपन्न होई व्यक्ति । वाढे श्रीमंती गांवाची ॥
थोडया थोडयांतचि अधिक खर्चे । काटकसरीने रोज वाचे । थेंबें थेंबें तळें साचें । मग तें मना शांति देई ॥
तिळातिळांतचि तेल पूर्ण । क्षणाक्षणाने बनलें जीवन । कणाकणाने सांचे धनधान्य । कामीं येई प्रसंगीं ॥
अधिक न घ्यावा एकहि घांस । तेणें नशीबीं नये उपास । थोडा त्रास अधिक विकास । शेवट गोड याचि मार्गे ॥
ऐसें वर्तन व्हावें गांवी । गरजांची धांव कमी करावी । अनासक्ति वाढवावी । प्रत्येकाने अनुक्रमें ॥
काटकसरीचें करितां वर्तन । अपार वांचेल गांवी धन । त्याने गांव होईल नंदनवन । सर्वतोपरीं ॥
गांवासि सत्ययुग आणावा । त्याच्या सुखें स्वर्ग मानावा । आपुल्या इंद्रियांच्या चवा । सोडूनि द्याव्या थोडथोडया ॥
मग जाणोनिया आत्मरंग । राहावें नित्यानंदस्वरूपीं दंग । तेव्हाचि जीव होय अभंग । अमर स्थानीं शेवटच्या ॥
सम्यक आचार सम्यक विचार । संग्रामाचा आदर्श थोर । साधु-संत महावीर । जगज्जेते झाले या मार्गे ॥
शुध्द आचार-विचारांचें फळ । व्यक्तिसवेंचि गांव सोज्ज्वळ । गांवीं सुखें नांदतील सकळ । तुकडया म्हणे ॥


  श्रमसंपत्तिमहत्त्व  

श्रोतेजन प्रश्न करिती । आमुच्या गांवीं आहे संपत्ति । परि सुख न मिळे लोकांप्रति । ऐसें झालें ॥
विकास कार्याचा कोठला ? गांवीं वाद बळावला । धनिक-गरीबांचा लागला । वर्ग-कलह ॥
समाज या दोहोंभागीं विभागला । एक न मानी एकाला । परस्परांवरोनि विश्वास गेला । उडोनि त्यांचा ॥
आता काय करावी योजना ? कोणाची थोरवी पटवावी जना ! कैसेनि होईल ग्रामरचना । सुंदर आमुची ? ॥
ऐका प्रश्न हा महत्वाचा । आवश्यकचि निर्णय याचा । त्यावांचूनि गांवाचा । मूळपायाचि ढासळे ॥
श्रीमंत-गरीबांचा वाद । गांवास करील बरबाद । म्हणोनि ही दूर करावी ब्याद । जाणत्यांनी ॥
देवाघरीं एकचि प्राणी । ना श्रीमंत ना भिकारी कोणी । ही आहे समाजरचनेची उणी । मानवनिर्मित ॥
मूलसिध्दांतीं भेदचि नाही । हा प्रलोभनांचा खेळ सर्वहि । समज येतां दोघांसहि । भेद कांही दिसेना ॥
खेळाकरितां दोन पक्ष केले । परि खेळ विसरोनि लढूं लागले । आपसांत वैमनस्य आले । अज्ञानाने ॥
एकाकडे आले अधिक कंचे । तो म्हणे माझ्याचि मालकीचे । मग खेळणेंहि थांबलें इतरांचें । एकाचिया लोभामुळे ॥
ऐसेंचि आहे संसाराचें । घरचें आणि समाजाचें । तितंबे झाले कुटूंबांचे । अज्ञानें आणि लोभाने ॥
कामाकरितां जाति केली । काम विसरून जातचि धरली । जन्मजात थोरवी मिरविली । वर्णधर्माच्या नांवाने ॥
ऐसेंचि झालें अर्थव्यवस्थेचें । हिस्सेदार सर्वचि धनाचे । पण कांहीच राहिले मानाचे । बाकी मेले भुकेने ॥
एक राहिला गरीब गडी । एकाची वाढली श्रीमंती बडी । ही सर्व अज्ञानाची बेडी । भोवली सगळया ॥

जीवन जगण्यास धन आवश्यक आहे. परंतु फक्त धन हेच सर्वेकाही आहे असं म्हणू नये. त्यासोबत विचारधन असणं गरजेचं आहे. धनाचा साठा असणाऱ्या लोकांना माणुसकीचे विस्मरण पडते. आणि तेच अतिधन त्यांचे चित्त वानराप्रमाणे करते. 

धनासाठी राखणदार आणला । त्याने कमजोर मालक पाहिला । आपणचि बळकावून बसला । पैसा शक्तियुक्तीने ॥
ऐसेंचि झालें गरीबी-श्रीमंतीचें । कष्ट करणारे झाले दूरचे । पैसे घेणारे झाले कायमचे । मालक येथे ॥
आता कांही केल्या समजेना । कोण पुसतो उपदेश-कीर्तना ? । फार तर मुंगियासि साखरकणा । देवोनि म्हणे दान केलें ॥
हजारोंचें जीवन पिळावें । तेणें त्यांच्यांत रोग वाढावे । मग दवाखाने धर्मार्थ घालावे । धर्मशील म्हणवोनिया ॥
पाहतां आजचा मजूर । न मिळे पोटासि भाकर । तैसेंचि काम करवी अहोरात्र । वारे मालक धर्मशील ! ॥
हा तों राहतो महालीं शहरीं । मुलें गाडी नेती सिनेमादारीं । शिकती व्यभिचार व्यसनें चोरी । लुटती कारभारी खेडुतां 
कांहींनी खूप बुध्दि लढविली । संपत्ति अतोनात वाढविली । काढोनि कवडीहि नाही दिली । प्राण जातां श्रमिकांचा ॥
गांवांतील लोक उपाशी मरे । म्हणती मरती ते मरोत बिचारे । आयुष्य सरल्या कोण तारे ? पैसा-दवा सब झूट ! ॥
ऐसें अधिक धन जमविलें । समाजीं कामीं नाही आलें । ते चोरचि म्हणावे ठरले । एकलकोंडे आपगर्जी ॥
ज्याचे पाशी अधिक जमीन । न देई मजुरां पोट भरून । तो कशाचा भाग्यवान ? महाकदर्यु म्हणावा ॥
भव्य वाडा पडला सुनसान । एकचि पत्नी एक संतान । परि न देई शेजारपण । वा रे भूषण कृपणाचें ! ॥
कित्येकांचें जनावरी वागणें । सरंजामशाहीने वजन टाकणें । धाकदडपणाने कामें घेणें । घातक होईल यापुढे ॥
गरीब सारेच ओरडती । श्रीमंत हे गुंड आहेत म्हणती । परि यांची लागली नेत्रपाती । कांहीं केल्या उघडेना ॥
यासि उपाय करावा कांही । त्यासाठी मार्ग दोनचि पाही । कायदा अथवा धर्ममार्ग राही । सेवाभावें समज द्याया ॥
ही पाळीच कां येऊं द्यावी ? म्हणोनि कांही योजना शोधावी । गरीब-श्रीमंत दोन्हीहि बरवीं । राहतील ऐसी ॥
परस्परांचा विचार घ्यावा । आपला समतोल हिस्सा ठेवावा । कोणासहि राग न उदभवावा । ऐसें करावें गांवाने ॥
तुमचा पैसा आमचे श्रम । तुमची बुध्दि आमुचा उद्यम । एकाचा घोडा एकाचा सरंजाम । असावा जैसा ॥
मुळीं जीवनाची तैसीच रचना । एकास हात लागती नाना । सर्वां मिळोनीच हा आपुल्या स्थानां । बनतो सन्माना घ्यावया ॥
कोणाचे निभेना वगळूनि ग्राम । प्रत्येकासि प्रत्येकाचें काम । काम झालिया पुन्हा भ्रम । वाढतो याचा ॥
सुतार याचे खांब करी । बेलदार याची भिंत उभारी । कुंभार याचे कवेलू उतारी । छावणीसाठी ॥
लोहार खिळेफासे घडवी । मजूर बांधी घरें-पडवी । ऐसें न करितां हा गोसावी । राहता कोठे ? ॥
चांभार याचे जोडे बनवी । विणकर याला वस्त्रें पुरवी । नीटनेटके कपडे शिवी । शिंपी यासाठी ॥
शेतकरी याला पिकवोनि दे । धान्य मिरची भाजी कांदे । सर्वांच्या श्रमें घर आनंदें । साजवी हा आपुल्यासाठी ॥
सर्वांचे हात सर्वासि लागे । सर्वांस जगविती गुंतले धागे । हें समजोनि जो गांवीं वागे । तोचि खरा बुध्दिमान ॥
परि यांत भाव वाईट शिरला । कोणी न मानीच कोणाला । म्हणे पैसे देतों आम्हीं सकलां । म्हणोनि कामें करिती हे ॥
खरे महत्त्व आहे परिश्रमाला । परि हा मानतो पैशाला । काम न करितां, पैसा असला । तरी काय भागतसे ? ॥
खोदूनि आणली गोटेमाती । तासली फाडी रचल्या भिंती । तेव्हाच बनली ती संपत्ति । परिश्रमाच्या स्पर्शाने ॥
रानीं असोत लांकडे काडया । त्या श्रमाविण न होती गाडयामाडया । श्रमाविण संपत्ति म्हणजे कवडया । त्याहि वेचल्या श्रमाने ॥

काहीजण वडिलोपार्जित धन असल्याचा गर्व बाळगतात.  त्यांना महाअज्ञानी म्हणावे. अश्यांनी वेळीच सावध होऊन पुढील धोका ओळखावा. कारण निकष्टिकांची जमीन- धन क्षणिक असते.

गांवीं जे जे श्रीमंत असती । तयांचें धन गांवची संपत्ति । समजोनि वागावें या रीतीं । मदत द्यायासि प्रसंगीं ॥
आपणापाशी अधिक असे । शेजार्‍यासि पुरवावें हर्षें । सर्व मिळोनि राहावें सरिसें । गांवधर्म म्हणोनिया ॥
धन हें गरीबांचें रक्त । समजोनि वागोत श्रीमंत । श्रम ही गांवाची दौलत । म्हणोनि व्हावा मान तिचा ॥
ऐसें केलिया सकळ जनांनी । वर्गभेद मिटतील गांवचे दोन्ही । यास बुध्दि द्यावया उपजोनि । साधुसंतांनी काम घ्यावें ॥
आणि सावध असावें सरकार । नीटनेटका घडवाया व्यवहार । जनतेमाजी भराभर । वारें शिरवावें शिक्षणाचें ॥
लहान मुलीमुलांपासोनि । मिटवावी गरीब-श्रीमंत श्रेणी । सर्वांस पाहाया समानपणीं । लावावें प्रत्यक्ष कृतीने ॥
शब्दांत नको समसमान । प्रत्यक्ष पाहिजे धनमानशिक्षण । फूट पाडिती ते द्यावेत हांकोन । गांवचे भेदी ॥
नसतील ऐकत जे जे कोणी । त्यांना कायद्याने घ्यावें आटपोनि । मग रचना करावी समानगुणीं । इमान जागीं ठेवोनिया ॥
जैसे बापास पुत्र सारिखे । तैसे गरीब श्रीमंत राजाचे सखे । हा भेद मिटविणें काम निकें । त्याचेंचि असे राजधर्में ॥
पण जेथे सरकार मिंधा झाला । तेथे आग लागली प्रजेला । मग कोण पुसे कोणाला ? धिंगाणा झाला पहा सर्व ॥
संतसाधूहि मिंधे झाले । दक्षणेवरील मोहून गेले । मग पर्वताचे कडेचि लोटले । समाजावरि ॥
जनतेचा मग वालीच नाही । ती चेततां मग आगचि सर्वहि । भस्म होईल सगळी मही । हाहा:कारें ॥
सगळी जनता बंदिस्त केली अथवा मारोनि टाकिली । तरी श्रमाविण पैदास कुठली ? कष्टावें लागेल सर्वांसि ॥
मग हें ऐसें कां होऊं द्यावें ? सकळांनी आधीच जागृत व्हावें । आपुल्या परीने सावरावें । कार्य नीट गांवाचें ॥
उत्तम व्यवहारें धन घ्यावें । उत्तम कार्यासाठी लावीत जावें । जेणें परस्परांचें कल्याण व्हावें । तैसेचि करावे व्यवहार ॥
ऐसा कदर्युपणा नसावा । की ज्याने गांवचि व्याजें बुडवावा । प्रसंग पडतांहि न द्यावा । साथ लोकां ॥
अविचाराने न उधळावें धन । फसवोनि न घ्यावें गरीबांपासून । दोन्ही मार्ग समसमान । ठेवावे देवघेवीचे ॥
न व्हावा शेवटचा कळस । म्हणोनि सहानुभूतीचा वाढो हव्यास । विरोधचि करूं नये यास । कोणी कोणा ॥
सगळयांनी मिळोनि वागावें । सर्वांचें समजोनि कार्य करावें । श्रीमंत-गरीब दिसोंचि न द्यावे । बहिरंग जीवनीं ॥
ते दिसावेत गुणावरि । बुध्दीवरि, कार्यावरि । ऐसे असले प्रकार जरी । समताभाव तरी न सोडावा ॥
तेचि करितील परिवर्तन । समाजांत उत्तम ज्ञानकण । पेरूनि करितील परम पावन । भारतमाता ॥
ऐसी सुबुध्दता सगळयांत यावी । तरी श्रीमंती-गरीबी मिटावी । नाहीतरि गति बरवी । नाही आता समाजीं ॥
हें समजणेंचि जरूर आहे । काळ याचीच वाट पाहे । तो ऐसा थांबलाचि न राहे । स्वारी करील वेगाने ॥
म्हणोनि माझें एवढेंचि सांगणें । वाढवा सामाजिक वृत्तीचें लेणें । मिरवा सामुदायिकतेचीं भूषणें । लोकांमाजी ॥
कोणी म्हणती धनी आम्ही । काय आहे आम्हां कमी ? कमाई केली वडिलें नामी । घरबसल्याचि आमुच्या ॥
हें तयांचें महाअज्ञान । कळली नाही त्यांना खूण । यापुढे जाईल धन-जमीन । निकष्टिकांची ॥
आज निकष्टिकांची चालती । उद्या विचारूं नका फजीती । म्हणोनि समजोनि घ्यावी युक्ति । उद्योगाची ॥
सर्व तर्‍हेच्या कलाकुसरी । शिकूनि वागावें शहाण्यापरी । पोट भरावयाची उजागरी । तेव्हा लाभे ॥
हें जंव करितील शिक्षितजन । तेव्हा बंद होतील मजुरांचे वाग्बाण । नाहीतरी ते बेईमान । ठरवितील आपणां ॥
म्हणतील आम्हीं कष्ट करावे । तुम्ही आरामांत राहावें । सांगतां ’ समानतेने ठेवावें ’ । कोण म्हणेल पुढारी ? ॥
सर्वांवरि सारखेंच प्रेम । मग सर्वांकरितां एकचि नियम । सर्वांनी करावेत परिश्रम । अपापल्या परींनी ॥
एकाने करावें काम । दुसर्‍याने करावा आराम । हें तों आहे हराम । देश-हिताच्या दृष्टीने ॥
अरे ! उठा उठा श्रीमंतांनो ! । अधिकार्‍यांनो ! पंडितांनो ! । सुशिक्षितांनो ! साधुजनांनो ! । हांक आली क्रांतीची ॥
गांवागांवासि जागवा । भेदभाव हा समूळ मिटवा । उजळा ग्रामोन्नतीचा दिवा । तुकडया म्हणे ॥


  ग्रामोद्योग 

एक श्रोता प्रश्न विचारी । आम्हीं ऐकिलें गीतेमाझारीं । कर्ममय असे सृष्टि सारी । न करतांहि कर्म घडे ॥
सर्वांसचि लागलें कर्म । कर्म हाचि देहाचा धर्म । तेथे काम करावें मुद्दाम । हें बोलणें विपरीत ॥
आपण म्हणतां परिश्रम करा । येणें पोषण होईल अहंकारा । सहज चालेल तोचि बरा । व्यवहार लोकीं ॥
ही श्रोतियाची शंका । भ्रमवीत आली नित्य लोकां । परि ही नव्हे गीतेची भूमिका । निर्भेळ ऐसी ॥
कर्ममय विश्व आहे । कोण रिकामा बसला राहे ? प्रत्येक जण करीतचि जाय । कांहीतरि कर्म ॥
परि त्या कर्माचे अनेक प्रकार । कांही शुध्द निषिध्द मिश्र । कांही विधियुक्त कांही पवित्र । निष्काम कर्म ॥
कांही देहेंद्रियांसाठी । कांही निपजती मनाच्या पोटीं । कांही विवेकबुध्दीने गोमटीं । निपजती कर्मे ॥
कांही कर्मे स्वत:करिता कांही कुटुंबाचीया हिता । कांही कर्मे गांवा लोकांकरितां ।  सेवाधर्मरूप ॥
आपल्या देहाचें करणें काम । हा कसला आला महाधर्म ? । हें आहे नित्यकर्म । सहजचि घडणारें ॥
तैसेंचि प्रसंगाविशेषें कांही । करणें सणोत्सवादि सर्वहि । त्यांतहि विशेष ऐसें नाही । नैमित्तिक कर्मी ॥
नित्यनैमित्तिक कर्मे सहज । तीं करणें आवश्यक काज । न करितां विस्कटेल समाज । परि करणें नव्हे महाधर्म ॥
तैसेंचि पोटासाठी करणें काम । हे नव्हेत पुण्यपरिश्रम । उरल्या वेळीं जें सेवाकर्म । त्यासि धर्म बोलती ॥
तेंचि माणुसकीचें कर्म । जें दुसर्‍यांसाठी केले श्रम । एरव्ही पशुपक्षीहि करिती उद्यम । आपुलाले ॥
निषिध्द आणि सकाम कर्म । तैसेचि त्यागूनि अहं-मम । जगासाठी करावेत श्रम । ईश्वरार्पण बुध्दीने ॥
हेचि गीतेची शिकवणूक । वारंवार निश्चयात्मक । जेणें सर्वेश्वराचें पूजन सम्यक । तेंचि कर्म गीतामान्य ॥
एरव्ही कामाविण कोणी नाही । हें मजसीहि कळे नि:संशयीं । परि त्यासि काम आज न म्हणों कांही । जें न उत्पादन वाढवी ॥
श्रमिकांस जेणें लाभेल अन्न । तें कर्म श्रेष्ठ यज्ञाहून । एरव्ही गीतेचें नांव सांगून । भलतें समर्थन करूं नये ॥
एक नौजवान आळसें निजला । म्हणे हेंहि पाहिजे शरीराला । म्हणोनि तो सारखाचि झोपला । फक्त उठला भोजनासि ॥
भोजन झाल्यावरि पुन्हा पडला । कैसा आवडेल घरच्या लोकांला ? कोणी थट्टामस्करी करूं लागला । म्हणे हेंहि कामचि आहे की ॥
एक सावकारीचें घाशी लिखाण । एक झगडयाचें चालवी प्रकरण । कोणी उपद्रव करी हातीं धरोन । लोक हरप्रकारें ॥
असलें काम जरी बंद पडलें । तरी माझ्यामतें कांही न अडलें । परि निर्वाहाचें उत्पादनचि शांतलें । कैसें चालेल जीवन ? ॥
म्हणोनि सर्वांनी काम करावें । ग्रामाचें धन वाढवावें । येथे गरीब-श्रीमंत न पाहावें । कामासाठी ॥

गावात आता फक्त शेती उरली आहे, लोकं तीच कशी बशी चालवत आहेत. बुद्धी आणि शक्ति असूनही यांचा ओघ मात्र  दुसरीकडे आहे. उत्तम शिक्षित, सामर्थवान लोकं चाकरी करण्यासाठी वणवण फिरत आहेत. शेती आणि उद्योगधंद्या वाचून गावची उन्नती अशक्य आहे.

श्रीसंत गोरा राबे अंगें । देवहि माती तुडवूं लागे । तेथे श्रीमंत आळसें वागे । हें महापाप ॥
यावरि बोले एक श्रोता । नाही गरीब मजुरासीच काम पाहतां । बेकारांचा वाढतो जत्था । तेथे श्रीमंतां काम कोठे ॥
श्रोतियाची ही विचारसरणी । आहे भ्रमाची पोसणी । सारा देश दीन-दरिद्री अज्ञानी । तेथे काम न दिसे तया ॥
पुन:पुन्हा जन्मा यावें । मातृभूमीसि सुखी करावें । ऐसें थोर म्हणती जीवेंभावें । तेथे काम न दिसे तया ॥
देशांत कामांचा उभा डोंगर । दारिद्रयदु:खाचा वाहतो पूर । अर्धनग्न अर्धपोटी लोक अपार । त्यांचें दु:ख कां न दिसे ? ॥
येथे विश्रांतीसि नाही वेळ । निरंतर कार्यकर्ते प्रबळ । पाहिजेत ठायींठायीं सकळ । काम ऐसें देशापुढे ॥
परि ज्यांना होणें आहे साहेब । लोकांवरि कसावया रुबाब । न कष्टतां इच्छिती आराम खूब । तेचि राहती बेकार ॥
शिक्षणाचा द्यावा उपयोग । करोनि प्रचार आणि प्रयोग । तंव ते स्वत:चि बनती रोग । समाजाच्या जीवनीं ॥
एका बाजूने शिक्षित-श्रीमंतांचें । तैसेंचि झालें मजूर-गरिबांचें । शिथिलता आळस दोघांचे । घरीं थाटला दिसताहे ॥
जेव्हा पोटासि भूक लागे । तेव्हाचि घरोघरीं काम मागे । नाहीतरि आळसा घेवोनि संगें । खुशाल पडे झोपडीमाजी ॥
सकाळीं आठ वाजतांचें काम पूर्ण । दहा वाजतां उठे घरांतून । नाही कामावरि मन । चुथडा करी कामाचा ॥
म्हणे श्रीमंतासि काय झालें ? ते काय भिकेसि लागले ? काय होतें काम न केलें । तरी आमुचें नुकसान ? ॥
कामासाठी हात उचलेना । तोंडीं सारखा वाचाळपणा । मजूरी न देतां धिंगाणा । घालितसे लोकांपाशी ॥
ऐसें करणें आहे चुकीचें । पैसे कसून घ्यावेत कामाचे । परि कामचुकार होणें हें आमुचें । ब्रीद नव्हे सर्वथा ॥
मजूर सकाळीं पाहिजे उठला । नित्यविधिकर्मांतून निपटला । घरकाम करोनि निघाला । पाहिजे तत्काळ कामासि ॥
जेव्हा कामाची वाजेल घंटा । मजूर चालला चारी वाटां । उद्योगांचा चालला सपाटा । ऐसें व्हावें ॥
मजुरावरीच आहे उत्पादन । उत्पादनचि मुख्य ग्रामाचें धन । तयामाजी करणें कुचरपण । वेडेपणाचें ॥
मजूर इकडे कार्यनिष्ठा न जाणे । श्रीमंत तिकडे आळशी बने । म्हणोनि झालें कंटाळवाणें । जीवन आता देशाचें ॥
उत्पादनाची गति खुंटली । उपभोगाची भावना वाढली । काय करील भूमाता भली । मशागत नसतां जमिनीची ? ॥
यासि सर्वचि असती जबाबदार । शक्ति संपत्ति विचार प्रचार । हें एकहि नाही ताळयावर । म्हणोनि ग्राम ओसाडलें ॥
श्रीमंतां आपुलें न वाटे काम । गरीबा उत्पादनाचें नाही प्रेम । शिक्षितां हीन वाटतो परिश्रम । यानेच आली शिथिलता ॥
ऐसें न व्हावें आता पुढती । सर्वांनी सुधारावयास पाहिजे मति । म्हणोनि आहे माझी विनंति । सकळांप्रति आग्रहाची ॥

दिखाऊ कपडे कोरडी ऐट आणि नोकरपेशी थाटमाट हे शिक्षणाचे उद्दिष्ट्य मुळीच नव्हे. बापाला शेतीची चिंता आणि मुलगा नोकरी करण्यात दंग. अश्याने शेती संपुष्टात येईल. मुलांना उच्च शिक्षण जरुर द्यावे. जेणेकरून गावाचं भूषण वाढेल. फक्त मोठी पदवी आणि कोरडा दिखाऊपणाला उच्चशिक्षित म्हणू नये. गावाची उन्नतीसाठीचे मुलांना लहानपणापासूनच धडे द्यावेत. तेव्हाच ग्रामउन्नती साधेल.

जें जें ज्याचेनि काम बने । त्याने तें सेवा म्हणोनि साधणें । आपुलेंहि बरें करणें । गांवासि होणें भूषणावह ॥
जो जो पोटापाण्याचें काम न करी । उत्पादनासि ना सुधारी । त्यास विरोध करावा, विचारी । माणसाने गांवाच्या ॥
श्रमनिष्ठेचा करावा प्रचार । सर्वांस आपुलकी वाटे पुरेपूर । ऐसी व्यवस्था करावी सुंदर । गांवचें उत्पादन वाढवोनि ॥
गांवचें वाढवाया उत्पन्न । गांवीं कराया नवनिर्माण । काय करावें ऐसा प्रश्न । वारंवार ऐकूं येई ॥
त्यासि उपाय हाचि प्रथम । कामगार करिती जे श्रम । त्यांची शक्ति वांचे तिला काम । द्यावें सहायक दुसरेंहि ॥
आणि इतरांचा वेळ कितीतरी । जाई व्यर्थचि गांवीं घरीं । कामीं लावितां तो निर्धारीं । काया पालटेल गांवाची ॥
गांवचे कलावंत निपुण । त्यांना द्यावें उत्तेजन । नवनव्या वस्तु कराव्या निर्माण । उपयोगाच्या जीवनासि ॥
उद्योगें यंत्रेंहि निर्मावी । परदेशा भीक न मागावी । आपणचि करोनि भोगावीं । वैभवें सारीं ॥
जो जो धंदा गांवीं नसला । प्रोत्साहन मिळावें त्या कार्याला । परि तो पाहिजे योग्य ठरला । गांवाच्यासाठी ॥
गांवचे उद्योग मागासले । त्यांस शिक्षणाने पुन्हा उजळिलें । ऐसें असावें सुधारलें । गांव आमुचें ॥
नसतील त्या वस्तु निर्माव्या । येत नसतां शिकोनि घ्याव्या । घरोघरीं त्याच दिसाव्या । गांवच्या वस्तु ॥
आपुल्या गांवीं जे जे होते । आपणचि वस्तु वापरावी ते । तेणें गांवींचें धन गांवींच राहतें । शक्ति वाढते गांवाची ॥
म्हणोनि प्रत्येकाने आपुल्या गांवीं । ग्रामीण वस्तूंना चालना द्यावी । त्यांत सुधारणाहि घडवावी । उन्नति व्हाया कलावंतांची ॥
ऐसे सर्वचि उद्योगधंदे । चालवावेत गांवींच आनंदें । नांदावेत सकळ लोक स्वच्छदें । सुखसमाधानें ॥
गांवीं असावें वस्तुप्रदर्शन । आपुल्याच गांवीं झालें निर्माण । बीं बियाणें, शेती-उद्योग-सामान । तयामाजीं ठेवावे ॥
खेळणीं लेणीं जीवनोद्यमें । लाकडी लोहारी बेलदारी कामें । कुंभारी, विणकरी, उत्तम चर्मे । असावीं तेथे ॥
असावें सुंदर एक घर । त्यामाजीं वस्तू विविध सुंदर । आम्हींच निर्मिलेल्यांचा भर । असावा तेथे ॥
गांवीं जें मालधन निर्माण होतें । बघावया लोकांनी यावें तेथे । योग्य किंमती देवोनि तें तें । घ्यावें सामान तयांनी ॥
गांवीं असावी उद्योग-समिति । जी सतत करील उद्योग-उन्नति । गांवाचें आर्थिक जीवन हातीं । घेवोनि लावील सोय जी ॥
गांवचिया धनिकांकडोनि । संपत्तीचा वांटा मिळवोनि । सर्वांच्या हितासाठी रात्रंदिनीं । उपयोग करावा तयाचा ॥

आवश्यक धन थोडे थोडे  जतन करून ठेवावे. परंतु ते न्यायमार्गाने कमविलेले असावे. त्यातूनही प्रपंचासाठी काही खर्च करीत जावे. अतिथींचा सम्मान करावा. त्यांनाही कधी अडचणीत असताना शक्य होईल तेवढी निस्वार्थ मदत करावी. अश्याने परस्पर स्नेहबंध टिकून राहतील. 

कांही असती जमीनदार । तेचि गांवचे अर्थभांडार । त्यांना सर्व कारभार । सोपवाया लावावा मजूरांवरि ॥
किंवा धनिक जरी ना वळे । शेतकरी-मजुरांच्याचि बळें । थेंबें थेंबें साचवावें तळें । त्यांच्या अल्प ठेवींचें ॥
त्यांतूनि निर्माण करावा वस्तुसंग्रह । सर्वांना उपयोगी भांडारगृह । सर्वां मिळोनि चालवावें नि:संदेह । दुकान सर्व वस्तूंचें ॥
त्यांत असावी सर्वांची मालकी । हुशार किसानांची ठेवावी चालकी । सर्वांच्या अनुमतीने व्यापार-एकी । करावी गांवीं ॥
एक असावें धान्यभांडार । चालावया गांवचे व्यवहार । त्यांत असावे सर्व जनतेचे शेअर । सोयीसारखे ॥
प्रसंगीं त्यांतूनचि धान्य न्यावें । सर्वांमिळोनि कर ठरवावे । प्रसंगीं सर्वांनी वाटून घ्यावें । उत्तम रीतीं ॥
त्यांतूनचि करावी गांवची सेवा । उणीव पडेल ज्या कष्टी जीवां । अथवा ग्रामसुधारणेस लावावा । वाढवा त्याचा ॥
गांवीं चालते सवाई-दिढी । त्यास याने बसेल अढी । ग्रामनिधीची उघडतां पेढी । थंडावेल व्यापारी-सावकारी ॥
गांवीं आवश्यक तेलघाणी । शुध्द तेलादिकांची निशाणी । गांवचीं कामें सर्व मिळोनि । गांवींच करावीं उपयुक्तशीं ॥
उद्योगहीनांना उद्योग द्यावे । कामें देवोनि सुखी करावें । आपणासमान पाहिजे बरवें । केलें त्यांसि सुखवस्तु ॥
काम ज्याने ज्याने करावें । त्याने हक्कानें पोटभरि खावें । लागेल तेवढें मागावें । हें तों आहे प्रामाणिक ॥
जयास न मिळे कामधाम । त्याने समितीस सुचवावें नाम । ग्रामसेवाधिकारी उद्यम । देईल त्यासि ॥
काम देणें कर्तव्यचि त्याचें । जमा असतील फंड गांवाचे । त्यांतूनि पुरवावें मोल कामाचें । उपयोगी ऐशा ॥
मजुरा मजुरी पूर्ण द्यावी । जेणें मुलेंबाळें सुखें जगवी । तैसींच उत्पन्ने वाढवोनि घ्यावीं । गांवामाजीं ॥
याने सर्वांस मिळेल सुख मिटेल जीवनाची भूक । ग्रामराज्य होईल सुरेख । आर्थिकतेने समृध्द ॥
यास्तव श्रीमंत शिक्षित हुद्देदार । कलावंत शेतकरी कामगार । सर्वांनी मिळोनि ग्रामोध्दार । करावा ग्रामोद्योगांनी ॥
शहराकडे चालला प्रवाह । तो थांबवाया नि:संदेह । सर्वांचा गांवींच होईल निर्वाह । ऐसी योजना करावी ॥
खेडेंचि शहराचें जनक । शहर भोवतें खेडें उत्पादक । शहराकडे न जातां लोक । धावावे उलट खेडयाकडे ॥
ऐसी करावी ग्रामसेवा । हेंचि कर्म आवडे देवा । संशय कांही मनीं न धरावा । तुकडया म्हणे ॥


 सर्वोन्नतीचा विद्यार्जनपथ 

श्रोतियाने केला प्रश्न । खेडें शहराहूनि महान । ऐसें म्हणतों आपण जन । परि एक खूण न विसरावी ॥
शहरांत आहे उच्च शिक्षण । तें खेडयांत पावेल कोण ? कोणी आला जरी शिकोन । तरी येथे होतो गावंढळ ॥
’नगरामाजीं नागरचि होइजे ’ । यासाठी शहरचि विद्यार्थ्यां पाहिजे । खेडयामाजीं ’ नांगरचि वाहिजे ’ । ऐसें होतें ॥
ऐका ऐसी जयांची भावना । लक्ष द्यावें त्यांनी या वचना । येथे शिक्षणाची मूळ कल्पना । तीच चुकली आपुली ॥
दिखाऊ कपडे कोरडी ऐट । नोकरपेशी थाटमाट । हें शिक्षणाचें नव्हे उद्दिष्ट । ध्यानीं घ्यावें नीट हें आधी ॥
अजब ऐसी शिक्षणाची प्रथा । जेथे कामीं नये बापाची संथा । बाप करी शेतीची व्यवस्था । मुलगा मागे नोकरी ॥
व्हावें मोठे बाबूसाहेब । काम जुजबी पैसा खूब । मोठी पदवी दिखाऊ ढब । ही उच्चता म्हणोंचि नये ॥
हें सर्व मागील विसरोन । मुलामुलींना द्यावें शिक्षण । जेणें गांवाचें वाढेल भूषण । सर्वतोपरीं ॥
नुसतें नको उच्च शिक्षण । हें तों गेलें मागील युगीं लपोन । आता व्हावा कष्टिक बलवान । सुपुत्र भारताचा ॥
शिक्षणांतचि जीवनाचें काम । दोन्हींची सांगड व्हावी उत्तम । चिंता नसावी भोजनासाठी दाम । मागण्याची भीक जैसी ॥

शिक्षिताने कधीही शिक्षणाचा गर्व ठेवून एखाद्या बाबूसाहेबप्रमाणे वागू नये. नदी तलाव आणि विहिरीत पोहणे यांसारखेही नानापरीचे शिक्षण असावे. गावी भोजनाचा प्रसंग असता, मुलास पंगत वाढतां येऊ नये,  घरचें पाणी भरतां येऊ नये आणि आपुल्याच तोर्‍यामध्ये राहे, तरि तें ज्ञान त्याचें व्यर्थ समजावे. 

मुलांत एखादा तरी असावा गुण । ज्याने पोट भरेल त्यांत निपुण । नये संसारामाजी अडचण । कोणत्याहि परी ॥
जीवनाच्या गरजा संपूर्ण । निर्वाहाचें एकेक साधन । संबंधित विषयांचें समग्र ज्ञान । यांचा अंतर्भाव शिक्षणीं ॥
नदी तलाव आणि विहिरी । यांत पोहणें नानापरी । आपत्ति येतां धावोनि तारी । ऐसें शिक्षण असावें ॥
गांवीं भोजनाचे असती प्रसंग । स्वयंपाक करतां यावा यथासांग । हेहि कला शिकवावी सप्रयोग । मुलांमुलींसि ॥
असलें शिक्षण वाटतें साधारण । परि याचें जीवनांत अग्रस्थान । नाहीतरि जगावें जनावरासमान । होईल स्वयंपाक न येतां ॥
मुलगी बहु शिकली शाळेमाझारीं । परि स्वयंपाक करतां नये घरीं । काय करावी विद्याचातुरी ? कामाविण लंगडी ती ॥
अशिक्षित स्वयंपाक करोनि खाई । सुशिक्षित चणे फाकीत राही । दोरास घालता नये वंधाहि । जेथे तेथे पराधीन ॥
मुलास पंगत वाढतां नये । घरचें पाणी भरतां नये । आपुल्याच तोर्‍यामध्ये राहे । तरि तें व्यर्थ ज्ञान त्याचें ॥
याचसाठी शिक्षण घेणें । कीं जीवन जगतां यावें सुंदरपणें । दुबळेपण घेतलें आंदणें । शिक्षण त्यासि म्हणों नये ॥
गांवावर आली गुंडांची धाड । विद्यार्थी दारें लाविती धडाधड । वाडवडिलांच्या अब्रूची धिंड । काय शिक्षण कामाचें ? ॥
म्हणोनि पाहिजेत बलवान मुलें । कुस्ती मल्लखांब खेळणारे भले । धडाडीने प्रतिकारार्थ धजले । तरीच शिक्षण उपयोगी ॥
ऋषिकालीन ऐसी प्रथा । शिक्षणांत होती जीवन-संथा । याकरितां आश्रमांची व्यवस्था । होती पूर्वी ॥
शिक्षण झालें वैभवस्थानीं । मग गांवचें जीवन न बसे मनीं । उच्च ज्ञान आणावें साध्या जीवनीं । कैसें तेंहि कळेना ॥
त्यापेक्षा उच्च ज्ञानाचीं विद्यालयें । गांवींच आणावीं निश्चयें । जीं ग्रामजीवन सजवितील चातुर्ये । शिकवोनि जना ॥
मुलांना शिकवाव्या नाना कला । चापल्य ध्येयनिष्ठादि सकला । गांवचि सांभाळूं शकेल आपुला । ऐसें द्यावें शिक्षण ॥
गांवासि कैसें आदर्श करावें । याचेंचि शिक्षण प्रामुख्यें द्यावें । सक्रियतेने करावयासि लावावें । विद्यार्जनीं ॥
जनसेवेचें प्रमाणपत्र । त्यासि महत्त्व यावें सर्वत्र । उद्याचें राष्ट्र आजचे कन्यापुत्र । समजोनि त्यांना सुधारावें ॥
गांवचें सर्वांत मुख्य पुत्रधन । त्याचें संरक्षावें चरित्रधन । तेणें गांवाचें वाढेल महिमान । चारित्र्यापरी उज्ज्वल ॥
आपणांसि वाटे जैसें गांव व्हावें । तैसेंचि बालकांना शिकवावें । शहाणे करोनि सोडावे । विद्याशिक्षणें सर्वचि ॥
बाळपणींच शिक्षण होई । वय झालिया त्रास जाई । वळविल्याहि न वळती कांही । इंद्रियें त्यांचीं ॥
जन्म देण्याचें काम मातापित्यांचें । शिक्षणाचें काम विद्यागुरूंचें । तेथे आसक्तीने पुत्रधन देशाचें । बिघडवूं नये लाडवोनि ॥
आईबापांचा प्रेमळ चाळा । पुरवी लहान मुलांचा आळा । मुलगा होतो ठोंब्या-भोपळा । अतिलाडाने निकामी ॥
हें तों विद्यागुरु साहेना । अथवा शिक्षिका चालूं देईना । मुलांस वळवावें कैसें त्यांना । माहीत असतें मानसशास्त्र ॥
म्हणोनि सर्व गांवाने मिळून । काढावें शिशुसंगोपन । बाईबुवास शिक्षण देऊन । नेमावें त्या कार्यासि ॥

अरे ! उठा उठा श्रीमंतांनो ! । अधिकार्‍यांनो ! पंडितांनो ! । सुशिक्षितांनो ! साधुजनांनो ! । हांक आली क्रांतीची ॥
गांवागांवासि जागवा । भेदभाव हा समूळ मिटवा । उजळा ग्रामोन्नतीचा दिवा । तुकडया म्हणे ॥

पाठशाळा असावी सुंदर । जेथे मुलीमुलें होती साक्षर । काम करावयासि तत्पर । शिकती जेथे प्रत्यक्ष ॥
सुंदर गाणें बोलणें वागणें । टापटिपीने घरीं राहणें । आपलें काम आपण करणें । शिकवावें तयां ॥
ऐसें करितां होईल प्रगति । मुलें उत्तम विद्यार्थी बनती । थोरथोर उद्योगधंदेहि शिकती । पुढे पुढे ॥
विद्यार्थी कार्याने सुरवात करी । त्यांतचि गणितशास्त्रादि सांवरी । नाहीतरी वाचनपठणचि परोपरी । कांही करवेना अंगाने ॥
ऐसें जीवन आणि शिक्षण । यांचें साधावें गठबंधन । प्रथमपासूनचि सर्वांगीण । शिक्षण द्यावें तारतम्यें ॥
जीवनाचें प्रत्येक अंग । शिकवावा महत्त्वपूर्ण उद्योग । काम करावायची चांग । लाज नसावी विद्यार्थ्या ॥
मुलगा वरोनि दिसे शिक्षित । काम करतांहि दिसे निष्णात । कामाची लाजचि नाही ज्यांत । जन्मास आली ॥
करितो शेताचें निंदण । उपणणें, उतारी, नांगरण । शेण काढावयासहि उत्सुक मन । दिसे जयाचें ॥
सर्व तर्‍हेचा उद्योगधंदा । कराया लागला मुलगा छंदा । वाढला अभिमान गांवचा बंदा । तयार झाला म्हणोनिया ॥
ऐसी घ्यावी गांवें काळजी । मुलांच्या अज्ञानपणामाजीं । तरीच गांवाचा उत्कर्ष सहजीं । होईल तेणें ॥
आजचे सान सान बाल । उद्या तरुण कार्यकर्ते होतील । गांवाचा पांग फेडतील । उत्तमोत्तम गुणांनी ॥
म्हणोनि म्हणतों बालधन । ठेवा गांवकर्‍यांनो ! जपून । कोण सांगेल निघतील रत्न । किती गांवीं ॥
ईश्वराचें जन्म देणें । आईबापासि निमित्त करणें । विद्यागुरूंचें शिकवणें । भाग्य बने गांवाचें ॥
या कोवळया कळयांमाजीं । लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी । विकसतां प्रकटतील समाजीं । शेकडो महापुरुष ॥
कितीक होतील सेवाभावी । कित्येक चतुर कलावैभवी । उद्योगधंद्यांनी रंगवी । ग्रामासि आपुल्या ॥
कित्येक निर्मितील यंत्रागार । कित्येक होतील इतिहासकार । कित्येक होतील सल्लाचतुर । गांवीं आपुल्या ॥
कित्येक होतील राजकारणी । कित्येक होतील तत्त्वज्ञानी । कित्येक देतील भूषण मिळवोनि । क्रीडांगणीं गांवासाठी ॥
कित्येक संत-उपदेशक । कित्येक वीर-संरक्षक । कित्येक व्यापारनिपुण, सेवक । हरकामी ऐसे ॥
ऐसा हा साजेल गांव-संच । सर्व गुणांचा आदर्श उच्च । कोणी न दिसेल जीव नीच । आपुल्या गांवीं संस्कारें ॥
गांवचें राज्य गांवचि करी । कोणाचीच न चाले हुशारी । आमुचे आम्हीच सर्वतोपरीं । नांदूं गांवीं ॥
प्रेमें सर्वचि करूं सेवा । जेणें सर्व गांवासि लाभ बरवा । मग ऐसा कोण उरेल ठेवा । जो न लाभे खेडयामाजीं ? ॥
खेडयांत उपजले ज्ञानेश्वरादि । काय उणी त्यांची बळबुध्दि ? श्रीकृष्ण आणि महात्मा गांधी । हालवी सूत्रें खेडयांतूनि ॥
म्हणोनि मित्रहो ! ऐका निश्चिती । गांवींच मुलांचें शिक्षण घ्या हातीं । पांग फिटेल जन्मजातीं । सुखी होतील सकळ जन ॥
कोणी म्हणती जातचि मूर्ख । मुलें कैसी निघतील चलाख ? कांही जाती मुळांतचि चोख । हुशार असती शिक्षणीं ॥
असतील भिकार्‍यांचीं मुलें । शिक्षण देवोनि करावे चांगले । पुण्य लाभेल पांग फेडले । त्यांचे म्हणोनि गांवासि ॥
असोत गरीब किंवा धनिक । मुलांस विद्या शिकवाव्या अनेक । गांवाने संपत्ति पुरवावी अधिक । याच मार्गी ॥
यांतचि वेचावें खूप धन । करावें पूर्वजांचिया नांवाने दान । विद्यालयें झालिया पवित्र संपन्न । गांव होईल स्वर्गपुरी ॥
आदर्श होतील विद्यार्थीगण । गांवाचें पालटेल जीवन । कोठेच न उरेल गावंढळपण । टिकाऊ परिवर्तन या मार्गे ॥


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या