एकीचे बळ | Unity is strength in marathi


एकीचे बळ कथा लेखन मराठी

वाचक मित्रहो,

'एकीचे बळ' काय असते हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही. तरीही ते मी पुन्हा आठवतो.
बालपणीच्या अभ्यासक्रमातील एक पाठ..एकीचे बळ. जवळ जवळ प्रत्येकाला माहिती किंवा ऐकलेली अशी कथा.. म्हणजे ती अशी की एक शेतकरी आणि त्याला चार मुलगे असतात..पण ते आपापल्या मर्जीने आपापल्या परीने वागायचे..म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी आणि एकीचे बळ शिकवण्यासाठी शेतकर्यांने एकदा चार काठ्या एकत्र बांघून एक जुडी आणली..आणि त्या चौघांना एकत्र बोलावले..पहिल्यांदा मोठ्या मुलाकडे ती काठ्यांची जुडी दिली आणि तोडण्यास सांगितली.. पण तो एकटा ती जुडी तोडण्यास असमर्थ ठरला....वैगरे...वैगरे..

Unity is strength in marathi

ही कथा आठवण्याचा उद्देश हाच की, वस्तीत, समाजात एकजूट नसेल तर काहीच शक्य नाही. आणि एकजूट असेल तर अशक्य असे काहीच नाही. एकीचे बळ सर्वात मोठं असते. परंतु, आपापसातील ही एकी सध्या कुठेतरी दुभंगत चाललीय, एकीचे बळ कुठेतरी कमी पडतंय असं वाटतं. आणि याचं खरंच दुःखही वाटतं. पण आजची परिस्थिती काहीशी वेगळी भासते. म्हणजे वरील गोष्टीचा आधार घेतला तर "आपापली काठी त्या जुडीतून वेगळी करून घेवून मग ती मोडणे" आणि मूळ अर्थ बाजूला ठेऊन अगदी त्या गोष्टीचा असाच मतितार्थ घेतल्याचं दिसून येतं. स्वतःला 'वेगळं करून घेणं' आणि आपापल्या त्या जबाबदारीतून मोकळं होणं मग बाकी इतरांचे काही त्यांना देणं घेणं नाही. काहींच्या अश्या विचारसरणीमुळे ते एकीत फूट पाडून, स्वतःचे आणि समाजाचे नुकसान मात्र करीत असतात.


प्रत्येक देशात, राज्यात, समाजात किंवा परिवारात म्हणा वाद-विवाद, मतभेद हे असतातच आणि यापुढेही असणारच, ती काळ्या दगडावरची रीघ आहे, कधीही न बदलणारी. तो प्रत्येक माणसाचा स्वभाव आहे आणि ते स्वाभाविक आहे. कोणताही देश ,राज्य, समाज, तेव्हाच पुढें जातो तेव्हा तो यातून किंचित वर उठतो, पुढे जातो.मी अमुक पक्षाचा,
तू तमुक पक्षाचा,
तू सरपंच,
मी फक्त ग्रामसदस्य.
तू मंडळाचा अध्यक्ष,
मी फक्त सभासद.
तू गावकर,
मी फक्त गावकरी.
तू शहरातला,
मी गावातला.
तू श्रीमंत,
मी गरीब.
इत्यादीसारखा, दुसऱ्याबद्दल असणारी असूया, दुजाभाव कितीही नकारलं तरी प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी असतोच.


• काही चुकीचं होतयं असं वाटत असेल, तर तुमचं म्हणणं मधुर स्वरात मांडा.
• तुमचे विचार शांतपणे लोकांना पटवून द्या. त्यांना तोडण्या ऐवजी स्वतःशी जोडुन घ्या.
• एकत्र - एकजुटीने रहा. एकमेकांचा सल्ला- विचार घ्या.
• इतरांनाही बोलू द्या, त्यांना ही ऐका.
• कोणाबद्दल मनात राग, द्वेष, गैरसमज ठेवू नका.
• सगळ्यांना विचारात घ्या, एकमेकांचा सन्मान करा.
• चुकलेल्यानां उदार मनाने क्षमा करा. त्यांना योग्य दिशा दाखवा.
• पैसा, संपत्ती, पदाचा कधीही गर्व करू नका. कारण गर्वाचे घर नेहमीच खाली असते.
• समाजापासून स्वतःला वंचित ठेवू नका. सामाजिक सभेत आवर्जून हजेरी लावा.
• एकाद्याला टाकून बोलण्यापेक्षा बोलून टाका. कारण, तुमच्या मनात साचलेला इतरांबद्दलचा राग, द्वेष तुमचं स्वतःचाच नुकसान करीत असतो.


गावातील, समाजातील जी लोकं मनापासून, निस्वार्थपणे एकी बांधण्यासाठी, टिकवण्यासाठी आणि समाजकार्यासाठी झटत असतात. हे सगळं करण्यासाठी त्यांनी दरमाही पगार नक्कीच मिळत नाही. ते तुमच्या भल्यासाठीच झटत असतात. तुमच्या सारखा त्यांचाही प्रपंच आहे. तरीही ते यासाठी वेळ काढतात. त्यासाठी त्यांना पाठींबा द्या, प्रोत्साहन द्या, त्यांचं मनोबल वाढवा.


संत तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे,
ऐसे निश्चयाचे बळ । तुका म्हणे तेचि फळ


सर्वांच्या प्रयत्नांने, दृढनिश्चयाने, एकीने समाजाला, गावाला नंदनवन बनऊयात एकत्रित, संघटीत राहूयात. असं म्हणतात, प्रेमाने जग जिंकता येतं. अहो..! जगाचं सोडून द्या. फक्त आपल्या समाजातील चार माणसांची एकी जरी आपणस शेवटपर्यंत टिकवून ठेवता आली. तरीही एकीचे बळ नक्कीच फळास येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या