एक अनोखा वाढदिवस..! | Hailstones Birthday Celebration

अनोखा वाढदिवस..! - एक सामाजिक उपक्रम | Unique Birthday Celebration in marathi वाढदिवस माणसांचा होतो.. देवाचा होतो.. काही हौशी प्राणीमित्र अगदी कुत्र्या-मांजराचाही वाढदिवस करतात.. पण आकाशातून पडलेल्या गारेचा वाढदिवस साजरा झाला तर..? होय! पण गारेचा (Hailstones Birthday Celebration) वाढदिवस साजरा झालाय. कुठे परदेशात नाही.. इथंच..! लांजा तालुक्यातील, पालू गावात.
 
महाराष्ट्रातील मोठी गार

जगातील सर्वात मोठी गार आणि हा वाढदिवस साजरा केलाय एका शास्त्रज्ञाने. पालू गावातील नामेवाडी येथे ३ ऑक्टोबर २०१० रोजी बर्फाची भलीमोठी गार (बर्फाचा मोठा गोळा) आकाशातून कोसळला होता. ही जगातील सर्वात मोठी गार असल्याचे संशोधनाअंती सिद्ध झाले. त्यामुळे ज्या नामेवाडी, तिठवली भागात ही गार कोसळली होती, त्याच ठिकाणी तब्बल तीन वर्षानी प्रथमच त्या गारेचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यासाठी पुणे येथील भौतिक शास्त्रज्ञ किरणकुमार जोहरे हे उपस्थित होते. ३ ऑक्टोबर २०१० रोजी सायंकाळी वादळी वा-याबरोबरच गारांची बरसात करीत कोसळलेल्या तुफानी पावसान साऱ्या पंचक्रोशीला झोडपून काढले होते. जोरदार पाऊस कोसळत असताना सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास पालू-नामेवाडी येथील ‘तिठवली’ या भागात बर्फाचा प्रचंड खडा कोसळला होता. ज्या ठिकाणी हा बर्फाचा खडा कोसळला त्या ठिकाणी जमिनीवर मोठा खड्डा पडला होता.


ही घटना पाहिलेल्या गुरख्यांनी त्याबाबतची माहिती पालू ग्रामपंचायतीचे सदस्य नितीन गाडे यांना सांगितली. गाडे यांनी त्यानंतर घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हा खडा ५० किलोपेक्षा अधिक वजनाचा होता. त्यानंतर या गारेची तज्ज्ञांमार्फत पाहणी करण्यात आली होती. तसेच तो संशोधनासाठी पाठवण्यात आला होता. पुणे येथून आलेल्या शास्त्रज्ञ किरणकुमार जोहरे यांनी सांगितले की, तब्बल तीन वर्षे या गारेवर संशोधन सुरू होते. तीन वर्षाच्या अध्ययनानंतर सदरचा बर्फाचा तुकडा ही गारच असल्याचे स्पष्ट झाले होते. गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा अनेक ठिकाणी आकाशातून बर्फाचे गोळे पडले होते. मात्र ही जगातील आजवरची सर्वात मोठी गार असल्याचा दाखलाही स्पेनचे शास्त्रज्ञ डॉ. जिझस फ्रीअस यांनी दिला होता. त्यामुळेच जगातील सर्वात मोठय़ा अशा या गारेचा वाढदिवस साजरा करणे व त्याद्वारे पालू गावाला जगाच्या नकाशावर आणण्याच्या दृष्टिकोनातून पुणे येथील शास्त्रज्ञ किरणकुमार जोहरे हे पालू येथे आले होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये केक कापून या गारेचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या गारेचा फोटो काढून ही गार पडण्याची घटना उघडकीस आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे पालू येथील ग्रामपंचायत सदस्य नितीन ऊर्फ बंटी गाडे  यांचाही या वेळी शास्त्रज्ञ जोहरे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

जगातील सर्वात मोठया ठरलेल्या या गारेचे स्मरण दरवर्षी लोकांना व्हावे यासाठी आपण पुढील प्रत्येक वर्षी पालू येथे येऊन या गारेचा वाढदिवस साजरा करणार असल्याचे जोहरे यांनी सांगितले. याशिवाय ज्या ठिकाणी गार पडली त्या ठिकाणी एक चबुतरा उभारून त्या ठिकाणी या गारेची माहिती देणार असल्याचे गावातील सदस्य श्री. बंटी गाडे यांनी जाहीर केले. या संकटातील महाकाय गारेचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सारे गावकरी एकत्र येतात. असा हा अनोखा कुतूहलपूर्ण आणि अनोखा गारेचा वाढदिवस Hailstones Birthday Celebration गावात आजही दरवर्षी ३ ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. विशेष म्हणजे ग्रामस्थांनी ह्या अनोख्या वाढदिवसाची परंपरा आजही सुरु ठेवली आहे हे महत्वाचे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या