शिधापत्रिका तपासणी नमुना कसा भरायचा ?

 

अपात्र शिधापत्रिका मोहीम राबण्याबाबत शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने २८ जानेवारी, २०२१ रोजी शासन निर्णय काढून शिधापत्रिका तपासणी मोहीम राज्यात राबवायला सुरवात करण्यात यावी अशा सूचना दिल्या. त्याप्रमाणे, अपात्र शिधापत्रिका शोधून रद्द करण्यासाठी शिधापत्रिका तपासणी मोहीम राज्यात सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी शिधापत्रिका तपासणीचा अर्ज Shidha Patrika Tapasani Namuna Form भरून संबधीत शिधापत्रिका दुकानात/कार्यालयात जमा करणे, सर्व शिधापत्रिकाधारकांना बंधनकारक केले आहे.

केसरी किंवा इतर लाभार्थी रेशनकार्ड असणारे ज्यांचे उत्पन्न एक लाखाच्यावर आहे त्यांचे कार्ड श्वेत (पांढरे) होणार आहे. याचाच अर्थ कार्डामार्फत मिळणाऱ्या अन्नसुरक्षा योजनेमध्ये त्यांना समाविष्ट केले जाणार नसल्याने त्यांचे धान्य बंद होईल, अशी माहिती रेशनिंग व नागरी पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्याबाबत शिधापत्रिका तपासणी फॉर्म अर्ज कसा भरावा हे या लेखात पाहणार आहोत.

शिधापत्रिका तपासणी नमुना कसा भरावा | शिधापत्रिका तपासणी नमुना | shidha patrika tapasani namuna | ration card tapasani form
शिधापत्रिका तपासणी नमुना अर्ज कसा भरावा हे पाहण्याआधी ही मोहीम नेमकी काय आहे हे पाहुयात. त्यामुळे, शिधापत्रिका तपासणी नमुना अर्ज भरताना आपल्याला मदत होईल.

अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम काय आहे?

राज्यातील अपात्र असलेल्या बी.पी.एल, अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी, शुभ्र व आस्थापना कार्ड या सर्व प्रकारच्या  शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दिनांक १ जानेवारी, २०२१ ते ३० एप्रिल, २०२१ या कालावधीमध्ये ही मोहीम राबविण्यात यावी अश्या सूचना शासनाने  दिल्या आहेत.

राज्यात अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम राबवताना शासनाकडून पुढील महत्वाचे आदेश/सूचना देण्यात आल्या आहेत.

१. शिधापत्रिकेची तपासणी करताना एका कुटुंबात व एका पत्यावर दोन शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत.

२. सादर केलेल्या संशयास्पद वाटणाऱ्या शिधापत्रिकांच्या पुराव्याबाबत पोलिसांकडून तपासणी करून घेण्यात यावी.

३. विदेशी नागरिकांना एकही शिधापत्रिका दिलेली असणार नाही याची दक्षता घ्यावी.

४. शिधापत्रिकेची तपासणी करताना, ज्या शासकीय/निमशासकीय/खाजगी कार्यालयातील कर्मचारी/कामगार यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असेल अशा कर्मचाऱ्यांच्या शिधापत्रिका तत्काळ अपात्र ठरवून रद्द करण्यात याव्यात.

५. विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्यात याव्यात.

६. अस्तित्त्वात नसलेल्या व्यक्ती, स्थलांतरीत व्यक्ती, मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात यावे.
थोडक्यात शिधापत्रिकाधारक खरोखरच लाभ घेण्यासाठी पात्र आहेत काय? याची पाडताळणी करणे हा अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीमचा मुख्य उद्देश आहे.


शिधापत्रिका तपासणी नमुना कसा भरायचा?

१. ज्या व्यक्तीच्या नावे शिधापत्रिका आहे त्या व्यक्तीचा फोटो फॉर्मच्या उजव्या बाजूला लावायचा आहे.

२. त्यानंतर, तुमच्या गावाचे नाव, तालुका आणि जिल्हा टाकायचा आहे.

३. शिधापत्रिकाधारकांचे संपूर्ण नाव - म्हणजेच ज्यांचा (कुटुंब प्रमुखाचा) फोटो तुम्ही फॉर्मवर लावणार आहे,  त्यांच्या आडनावाने सुरवात करून लिहायचे आहे. (उदा. आडनाव, पाहिले नाव, वडिलांचे नाव).

४. त्यानंतर, त्यांचे वय लिहा, नागरिकत्व- भारतीय, व्यवसाय किंवा नोकरी करत आहेत काय ते टाका.

५. त्यापुढे, जर व्यवसाय करत असाल तर, व्यवसायाचा पूर्ण पत्ता लिहायचा आहे.

६. त्यानंतर शिधापत्रिकेची वर्गवारी लिहायची आहे म्हणजेच, तुमचे रेशनकार्ड बीपीएल/अंत्योदय/अन्नपूर्णा/केशरी/आस्थापना असे कोणत्या वर्गवारीत येतं तिथे टिक करा.

७. त्यानंतर, शिधापत्रिकेचा अनुक्रमांक टाकायचा आहे. हा अनुक्रमांक तुमच्या रेशनकार्डच्या पहिल्या पानावर सर्वात वरच्या बाजूला ६ किंवा ७ अंकी नंबर असेल तो टाकायचा आहे.

८. त्यापुढे, पूर्ण निवास पत्ता हा पर्याय दिसेल, त्या मध्ये तुमचा पत्ता म्हणजेच, रेशनकार्डवर असलेला पत्ता लिहायचा आहे आणि फॉर्म सॊबत टाकलेल्या पत्त्याचा पुरावा कागदपत्रे जोडावी लागतील. (पुरावा कागदपत्रे पुढे पाहू).

९. पुढचा पर्याय आहे, अर्जदार व कुटुंबातील घटक व्यक्तींची नावे व इतर माहिती- त्या मध्ये कुटुंबाप्रमुखसहित कुटूंबातील व्यक्तींची नावे म्हणजेच, रेशनकार्ड शेवटच्या पानावर ज्या व्यक्तींची नावे आहेत. त्यांचं अर्जदारशी नातं, स्त्री/पुरुष, वय टाका. युनिटचा पर्याय तसाच सोडून द्या किंवा तो रेशन दुकानदाराला विचारून टाका. त्यानंतर कमावते व्यक्ती असणाऱ्यांचे व्यवसाय व वार्षिक उत्पन्न लिहा. नसेल कमावत तर तो रकाना तसाच सोडा. आणि त्यानंतर नागरिकत्व - भारतीय लिहा.

१०. त्यानंतर, पुढील पर्याय कुटूंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गानी मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न - त्यामध्ये, कुटुंबातील कमावत्या व्यक्तींचे वर्षाचे एकूण उत्पन्न बेरीज करून लिहा.


घरगुती स्वयंपाकाच्या गॅस जोडणी बाबत माहिती: 

 टीप: ही माहिती व्यवस्थित आणि खरी टाकायची आहे. सर्वप्रथम, गॅस सिलिंडर असेल तर तुमचं शिधापत्रिका रद्द होईल ही गोष्ट मनातून काढुन टाका. असा कोणताही निर्णय शासनाने घेतला नाही.

गॅस जोडणी धारकाचे नाव

जर तुमच्याकडे गॅस जोडणी असेल तर ते कोणाच्या नावाने आहे त्यांचं नाव लिहा.

गॅस ग्राहक क्रमांक

हा क्रमांक तूमच्या गॅस जोडणीच्या पुस्तकात पाहायाला मिळेल. तो इथे टाकायचा आहे.

गॅस सिलिंडरची संख्या

गॅस जोडणी नसेल तर तो एक/दोन पर्याय खोडून त्यापुढे नाही असे लिहा. असेल तर सिलिंडरची संख्या किती आहे, एक/दोन किंवा तीन ते लिहा.

गॅस कंपनीचे नाव

ज्या कंपनीची गॅस जोडणी असेल त्या कंपनीचे नाव लिहा. (उदा. Hp Gas, Bharat Gas)

- त्यापुढे, चालू मतदार यादीमध्ये शिधापत्रिका धारकाचे नाव आहे / नाही ते लिहा म्हणेजच, वोटर आयडी असून, मतदान यादीत कुटूंबप्रमुखाचे नाव आहे की नाही ते लिहा.

- त्यानंतर, निवासासंबंधी पुरावा म्हणून फॉर्म मध्ये दिलेले किमान एक कागदपत्र फॉर्म सोबत जोडायचे आहे. दिलेल्या कागपत्रासमोर टिक करा. उदाहरण. आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, लाईट बिल इत्यादी. 

टीप: लाईट बिल, भाडेपावती  जोडले असल्यास  मागील तीन महिन्यापेक्षा जास्त जुने नसावे.

त्यानंतर, अर्ज दिल्याची दिनांक आणि अर्जदाराची/ कुटुंबप्रमुखाची स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा द्यायचा आहे. 

- त्याखाली, रेशन दुकानाचे नाव व क्रमांक, परवाना नंबर, पत्ता, रेशन दुकानदाराची सही इत्यादी माहिती रेशन दुकानदाराकडून टाकून घ्यायची आहे.


कार्यालयीन वापरासाठी -

हा पर्याय रेशन दुकानदार किवा शासकीय अधिकाऱ्याकडून भरला जाईल. त्यामुळे, हा पर्याय तसाच सोडायचा आहे. 

हमीपत्र -

ज्या रेशनधारकांकडे गॅस जोडणी नाही आहे त्यांनीच या हमीपत्रावर स्वाक्षरी करायची आहे. ज्यांच्याकडे गॅस जोडणी असेल त्यांनी हमीपत्रावर सही करू नये. 

हमीपत्रात थोडक्यात असे दिले आहे की, माझ्या किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे गॅस जोडणी नाही असे मी लिहून देतो. तसेच, चौकशी दरम्यान गॅस जोडणी आढळून आल्यास रेशनकार्ड रद्द होईल. 

टीप: गॅस जोडणीबाबतची खरी माहिती फॉर्म मध्ये टाकावी. गॅस जोडणी असले तरीही तुमचे रेशनकार्ड रद्द होणार नाही.

पोच पावती : 

यामध्ये रेशनकार्ड धारकाचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर शिधापत्रिकाचा बारा अंकी SRC क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर फॉर्मसोबत जे कागदपत्रे जोडले आहेत त्यावर टिक करायचे आहे. आणि सर्वात खाली रेशन दुकानदार अधिकाऱ्याची स्वाक्षरी/सही घ्यायची आहे. आणि त्याची पोचपावती म्हणून तुमच्याकडे ठेवायची आहे.

जर तुम्हाला रेशनकार्डचा १२ अंकी SRC क्रमांक माहिती नसेल तर, https://rcms.mahafood.gov.in/PublicLogin/frmPublicUserRegistration.aspx या लिंक वर जाऊन ऑनलाईन पाहू शकता किंवा रेशन दुकानदाराला विचारू शकता.

मित्रहो, शिधापत्रिका तपासणी फॉर्मसॊबत कुटुंब प्रमुखाच्या आधारकार्डशिवाय कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या आधारकार्डची प्रत जोडून रेशन दुकानात किंवा तलाठी कार्यालयात द्या. फॉर्म दिल्यावर फॉर्मची पोच पावती घ्यायला मात्र विसरू नका.

शिधापत्रिका तपासणी नमुना अर्ज pdf 

Shidha Patrika Tapasani Namuna form pdf , शिधापत्रिका तपासणी नमुना अर्ज pdf  इथून डाऊनलोड करा - Download

शिधापत्रिका तपासणी मोहीम शासन निर्णय Download 

सूचना / अपडेट : 
शासन परिपत्रक क्र. : बैठक-२०२१/प्र.क. २९ /ना.पू २८, दिनांक १ एप्रिल, २०२१ नुसार अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम काही प्रशासकीय कारणास्तव पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या