ग्रामसेवक कर्तव्य व कामे Duty of Gram Sevak In Marathi

 

ग्रामसेवक कर्तव्य व कामे Duty of Gram Sevak In Marathi पंचायत राज्यव्यवस्थेत ग्रामपंचायतीला महत्वपूर्ण स्थान आहे. ग्रामीण जनतेशी प्रत्यक्ष संपर्क साधणारी 'लोकशाही संस्था' असे तिचे स्वरुप असल्याने तिला पंचायतराज संस्थेचा पायाभूत घटक मानले जाते. ग्रामपातळीवर विकास कामांचा विचार करता, सरपंच सोबत ग्रामसेवकालाही Gram Sevak महत्वाची भूमिका बजावावी लागते. ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीचा सचिव किंवा ग्राम विकास अधिकारी Village Development Officer अशा नावांनी देखील ओळखले जाते.

ग्रामसेवक कामे | ग्रामसेवक कर्तव्य | ग्रामपंचायत सचिवाची कार्य | ग्रामविकास अधिकारी कामे | ग्रामपंचायत सचिव कोण असतो | gram sevak info in marathi

गावाचा विस्तार, लोकसंख्या आणि उत्पन्न लक्षात घेता, प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक किंवा एकापेक्षा अधिक ग्रामसेवकाची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्ह्यापरिषदकडून नेमणूक केली जाते. त्याचे वेतन व भत्ते जिल्हा निधीतून दिले जाते. 

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ तसेच, ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ नुसार ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी हे काम पाहत असतात. या पदावर कार्यरत असतांना त्यांनी करावयाच्या कामांची कर्तव्यसूची Gram Sevak Kame शासनाकडून वेळोवेळी प्रसिद्ध केली जाते.

हे देखील वाचा : गावाचा सरपंच कसा असावा?

ग्रामसेवक कामे / कर्तव्ये व अधिकार: 

ग्रामसेवकाला गावाच्या विकासाच्या दृष्टीने, विकासकामांचे नियोजन, ग्रामपंचायत निधी, ग्रामसभा अहवाल, ठरावांची अंमलबजावणी, पत्रव्यवहार, शासकीय योजनेचे व्यवस्थापन इत्यादी सारख्या अनेक जबाबदाऱ्या व कर्तव्ये पार पाडाव्या लागतात.

• महाराष्ट्र ग्रामपंचात अधिनियम, १९५८ कलम ७ नुसार ग्रामपंचातीच्या सहकार्याने ग्रामसभा, मासिक सभा बोलाविणे, त्यांची नोटिस काढून संबधितांना देणे, सभेचा कार्यवृत्तांत लिहणे व सभेमध्ये झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी व पूर्तता करणे.

• मनरेगा व वित्त आयोग योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीचे उत्पन्न व इतर प्रशासकीय व जिल्हापरिषदकडून उपलब्ध होणारे अनुदान याचा विचार करून, ग्रामपंचायतीचे सरपंच व सभासद यांचे सहकार्य घेऊन, गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने गावविकासाचा पंचवार्षिक आराखडा तयार करणे.


• पंचवार्षिक आराखडा तयार करीत असताना ग्रामपंचायतीमार्फत राबविल्या जाणाऱ्या विकास योजनेवर लाभार्थी निवडीसह जानेवारी महिन्यात वार्षिक कृती आराखडा तयार करून एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या ग्रामसभेपुढे कामाचे प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवणे.

• ग्रामसभेत प्रस्ताव मान्य झाल्यानंतर, सदर प्रस्ताव संबंधित खातेप्रमुख तांत्रिक अधिकारी यांच्याकडे मंजुरीकडे पाठवणे.

• ग्रामपंचायतीने विकास विषयक कामांवर केलेल्या कामाचा अहवाल तयार करणे आणि त्याची माहिती ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर लावणे.

टीप : ग्रामपंचायत अधिनियम कमल (६०-क) (२) नुसार, ग्रामपंचायतीने विकासकामांवर केलेल्या कामाचा अहवाल तयार करण्यात आणि त्याची माहिती ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर लावण्यात ग्रामसेवकाने कसूर केल्यास, महाराष्ट्र जिल्ह्या परिषद जिल्हा सेवा (शिस्त आणि अपील) नियम, १९६४ च्या नियम ४ अन्वये संबंधित ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई केली जाण्यास पात्र असेल.

हे देखील वाचा : ग्रामपंचायतीला दरवर्षी किती निधी मिळतो?

• सरपंच, उपसरपंच यांना सभेच्या वेळी व आवश्यकता असेल तर कायदेविषयक सल्ला देऊन आपले मत मांडणे. 

• ग्रामपंचायतीकडील सर्व प्रकारची माहितींचे जतन करणे व सरपंचाच्या मदतीने गाव विकासाची कामे पार पाडणे.

• राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सर्व अभिलेख (Records) जतन, वेळोवेळी आवश्यक त्या नोंदी घेऊन अद्ययावत (updated) ठेवणे. 

• शासनाने व जिल्हा परिषदेने बसविलेले विविध ग्रामपंचायत कर व फी यांची वसुली करणे. प्रत्येक चार वर्षांनी कर आकारणीत वाढ सुचविणे व ग्रामनिधीची संपूर्ण जबादारी सांभाळणे.


• ग्रामपंचायतीचे पत्रव्यवहार सांभाळने व ग्रामपंचायत व पंचायत समिती यामधील दुवा म्हणून काम करणे.

• ग्रामपंचायत हद्दीतील जमीनी, रस्ते, इमारती, पडसर जागा व इतर सार्वजनिक जागा यांच्या मोजमापाचे दस्तऐवज, कराराचे दस्तऐवज अद्ययावत ठेवणे. ग्रामदर्शक नकाशा ग्रामपंचायतीमध्ये ठेवणे.

• जन्म-मृत्य, विवाह नोंदणी इत्यादी बाबत रजिस्ट्रेशन अक्टनुसार निबंधक/कुलसचिव म्हणून कर्तव्य पार पाडणे.

• ग्रामपंचायत क्षेत्रात कार्यरत असलेल्या सोसायट्या, दूध डेअरी, नागरी पत संस्था, स्थानिक महिला मंडळे, बालवाडी, तरुण मंडळे, बालवाडी, अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा, स्वयंसेवी संस्था यांच्याशी समन्व्य साधून गावात लोकोपयोगी विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे.

• ग्रामपंचायतीच्या पातळीवर शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान एक दिवस ग्रामपंचायतीमध्ये एकत्र आणून गावातील प्रश्न सोडविण्यासाठी चर्चा करणे व त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करणे.

• ग्रामपंचायत काही नियमांची व कायद्याची उल्लंघन करणारी कृती करत असेल किंवा तसे करावयाचे ठरविले असल्यास त्याबाबतचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करणे.

• निवडणूकांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना व आदेश यांचे काटेकोरपणे पालन करणे.

• ग्रामपंचायतीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे व त्यांच्याकडून कर वसुली करण्याची जबाबदारी पार पाडणे. तसेच, त्यांच्या रजेच्या हिशेब, भविष्य निर्वाह निधी, बोनस इत्यादी शासनाच्या कायद्यानुसार व नियमानुसार देणे.

• सेवा हमी कायद्यानुसार दाखले विहित मुदतीत देणे.

• गावातील दारिद्ररेषेखालील लोकांचे सर्वेक्षण करणे.


• रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीने उद्योगधंद्यात वाढ करणे.

• गावातील पडीक जमीन लागवडयोग्य करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे.

• गावातील रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण, सांडपाणीसाठीची गटारे,परिसर स्वच्छता, पशुधन विकास, बाल कल्याण विकास, साक्षरता मोहीम याबाबतीत शासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचना व आदेश यानुसार काम करणे.

• शासनाकडून तसेच जिल्ह्यापरिषदेकडून वेळोवेळी जाहीर होणाऱ्या योजनांची माहिती प्राप्त करून ती ग्रामसभा, मासिकसभे मार्फत ग्रामस्थांपर्यंत पोहचवणे व त्याबाबतची माहिती ग्रामस्थांना देणे. व पंचायत समिती पातळीवरील तांत्रिक अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन त्या योजना राबविणे.

 महिला बालकल्याण, समाज कल्याण, साक्षरता प्रसार, अंधश्रद्धा निर्मूलने, इत्यादी कामे स्थानिक संस्था यांचे सहकार्य घेऊन या योजनांबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे.

• पशुसंवर्धनाच्या विविध योजनेसाठी प्रोत्साहन देणे व संकरित जनावरांच्या वाढीस उत्तेजन देणे.

• गावाला शुद्ध पाणी पुरवठाकरून अशा योजना सुस्थितीत ठेवणे, त्यांची दुरुस्ती व देखभाल करणे, शुद्धीकरणासाठी औषधाचा पुरेसा साठा करणे. 

• गावतील पाणी वाटपाचे नियोजन, देखभाल व दुरुस्तीसाठी होणाऱ्या खर्चाइतकी ग्रामपंचायत अधिनियम कलम १२९ नुसार पाणीपट्टी व विशेष पाणीपट्टी कर आकारणी करणे. 

• पूर, दुष्काळ, भूकंप, टोळधाड, टंचाई, साथरोग इत्यादी नैसर्गिक आप्पती उदभवल्यास त्याबत त्वरित संबंधित खात्याला कळविणे व ग्रामपंचायतीने आरोग्य खात्याच्या सहाय्याने प्राथमिक उपाययोजना करणे.

याशिवाय, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर वरिष्ठ अधिकारी तसेच, शासनाने वेळोवेळी सोपविलेली इतर कामे पार पाडणे इत्यादी कर्तव्य ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचे असते.

हे देखील वाचा : नवीन ग्रामपंचायत स्थापना निकष व अटी

पदाधिकाऱ्यांना योग्य मार्गदशन करणे ग्रामसेवकाचे कर्तव्य:

ग्रामीण जनतेशी दैनंदिन व्यवहारात नित्याचा व प्रत्यक्ष संबंध येणारे शासकीय कर्मचारी तलाठी आणि ग्रामसेवक हेच असतात. ग्रामसेवकाने आपल्या कार्याद्वारे लोकांचा विश्वास संपादन केला तर विकासकामांच्या अंमलबजावणीत लोकांचे सहकार्य मिळवणे त्याला सहज शक्य होते. 

ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनाही त्यांच्या कामात मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ग्रामसेवकवर असते. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी अनुभवी नसतील तर त्यांना ग्रामसेवकाच्या सहकार्यावरच अवलंबून राहावे लागते. अशा वेळी ग्रामपातळीवर विकासकार्यांना गती देण्यात आणि त्यांची यशस्वीरित्या पूर्तता करण्यात ग्रामसेवक महत्वाची भूमिका बजावू शकतो.


ग्रामसेवकबाबतच्या तक्रारी:

वरीलप्रमाणे ग्रामसेवकाची भूमिका महत्त्वाची असली तरी ती बऱ्याच ग्रामसेवकांकडून योग्य प्रकारे पार पाडली जात नाही, अशा तक्रारी त्यांच्याबाबत केल्या जातात. ग्रामसेवकांविरुद्धच्या तक्रारी मध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा हा असतो की, तो गावातील लोकांना फारसा उपलब्ध होत नाही. याचे कारण असे की, ग्रामसेवक हा सहसा आपल्या नोकरीच्या गावी वास्तव्यास नसतो. त्यामुळे तो आपल्या सोयीनुसार नोकरीच्या गावी येतो. अश्या स्थितीत ठराविक वेळी तो लोकांना भेटेलच याची खात्री नाही. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व गावातील काही ठराविक लोकांची मर्जी सांभाळली की सामान्य लोकांशी कसेही वागले तरी चालू शकते हे त्याने अनुभवाने ओळखले असते. त्याप्रमाणे त्याची कृती होत असते.

अर्थातच, काही वेळा ग्रामसेवकालाही अनेक अडचणींना तोंड देत काम करावे लागते. विशेषत: ज्या ग्रामसेवकावर दोन किंवा अधिक ग्रामपंचायतींचे जबाबदारी येऊन पडलेली असते. त्याला अनेकदा तारेवरची कसरत करावी लागते. मात्र या पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर घेणारेही काही असतात.


ग्रामपंचायतीमधील भ्रष्ट्राचार किंवा आर्थिक गैरव्यवहार यात बऱ्याचवेळा ग्रामसेवकचा सहभाग असतो. ग्रामपंचयतीच्या पदाधिकाऱ्यांना प्रशासनाची व आर्थिक व्यवहाराची माहिती नसेल तर त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन ग्रामसेवक आर्थिक व्यवहार करतो. काही प्रसंगी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामसेवक यांनी एकमताने ठरवून भ्रष्टाचार केल्याचेही उदाहरणे आहेत. याशिवाय, ग्रामीण जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिची फसवणूक करण्याचा प्रयत्नही ग्रामसेवकाकडून केला जातो. अपवाद वगळता कित्येक ग्रामसेवकांनी अनेक गावे परिपूर्ण व समृद्ध करण्यासाठी महत्वाची भूमिका केली आहे. त्यामुळे, ग्रामसेवक आपली भूमिका आणि कर्तव्य पार पाडण्यात किती प्रमाणिक आहे यावरही त्याच्या भूमिकेचं महत्व अवलंबून असते. 

थोडक्यात, गावातील सर्वसामान्य लोक आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांना वेळोवेळी योग्य असे मार्गदर्शन करणे व ग्रामस्थांचा विश्वास संपादन करुन सर्वांच्या सहाय्याने गावातील विकासकामे मार्गी लावणे, विविध सरकारी योजना, अनुदाने आणि ग्रामनिधी यांच्याद्वारे गावे समृद्ध करून, विकासपथावर आणणे. या गोष्टी ग्रामसेवकाला कराव्या लागतात, म्हणून ग्रामीण विकासातील ग्रामसेवकाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते.

वाचकमित्रहो, वरिल महत्वपूर्ण माहिती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचवा आणि याबाबत तुमचा अभिप्राय खाली टिप्पणी करून नक्की कळवा.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

सरपंच अधिकार व कर्तव्य

• सरपंच अविश्वास ठराव

• सरपंच-उपसरपंच मानधन

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

  1. गावाचा नाव असलेल्या जागेच सर्व्हे करायचा साठी गावच्या तर्फे ग्राम सेवक अर्जात देऊ शकतो का ? तसे ग्राम सेवकास ते अधिकार आहेत का ?

    उत्तर द्याहटवा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.