ग्रामीण भागातील व्यवसाय संधी - १० फायदेशीर व्यवसाय



ग्रामीण भागातील व्यवसाय


ग्रामीण भागातील व्यवसाय संधी - १० फायदेशीर व्यवसाय | Agriculture Business Ideas in marathi भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशाच्या आर्थिक योगदानात शेतीचं मोठं महत्व आहे. औद्योगिक आधुनिकरणामुळे आजचा तरुण वर्ग शेती करण्यात फारसा रस घेत नाही. महाराष्ट्रातील पूर्वेकडील जिल्ह्यांप्रमाणे कोकण प्रदेश मात्र शेतीबाबत उदासीन दिसून येतो. मुंबई शहर कोकणात आहे असे असताना दुर्दैवाने कोकणातील जगप्रसिद्ध हापुस आंबा, फणस, काजू, नैसर्गिक आणि ऑर्गानिक शेती उत्पादने, मसाले आणि सर्वांच्या आवडीचे मासे ही सर्व उत्पादने कोकणातील असली तरी मुंबई किंवा इतर शहरात ही उत्पादने विकण्यासाठी कोकणाबाहेरील दलाल काम करतात. कोकणची अर्थव्यवस्था समृद्ध करण्यासाठी कोकणी माणसांनीच दुर्लक्ष केल्याने महाराष्ट्र शासनही कोकण विभागात विषेश लक्ष देत नाही.

निसर्गाने कोकणाला भरभरून दिलंय. सर्वात जास्त पाऊस कोकणातील रत्नागिरी जिल्हात पडतो. कोकणाला 720 किलोमीटरचा विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला आहे. कोकणातील निसर्गरम्य हिरवाई आणि अनेक पर्यटनस्थळे पर्य़टकांना खुणावते आहे. शिवाय कोकणाला ऐतिहासिक वारसाही आहे. कोकणभूमी शेतीपूरक अनुकूल हवामान,  वातावरण, जलसंपदा, भूसंपदा व वनसंपत्तीने नटलेली आहे. त्या मातीत सोनेही पिकवता येऊ शकतं. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या लेखामध्ये अश्याच काही ठराविक उद्योग- व्यवसायांची यादी देत आहे most profitable business in konkan village जे कोकणात किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही ग्रामीण भागात सहजरीत्या सुरू करता येऊ शकतात, ज्यात महाराष्ट्र आणि केंद्र शासनाकडून विशेष अनुदानही प्राप्त होते.


ग्रामीण भागातील व्यवसाय संधी - १० फायदेशीर व्यवसाय

शेती-उद्योग व्यवसाय

१. आंबा-काजू लागवड (फलोत्पादन)

२. खैर लागवड

३. बांबू लागवड

४. काळीमिरी उत्पादन

५. हळद लागवड

जोडधंदे-लघुउद्योग

६. मत्स्य पालन (मत्स्यव्यवसाय) 

७. दुग्ध व्यवसाय

८. कुक्कुटपालन

९. मधमाशी पालन (मधुमक्षिका पालन)

१०. मशरूम शेती (अळंबी उत्पादन)


१. आंबा- काजू लागवड (फळबाग लागवड)

आंबा-काजू लागवड हा व्यवसाय कोकणात प्रामुख्याने केला जातो. कोकण प्रदेशाचे हवामान आणि जमिन आंबा- काजू लागवडीसाठी फारच अनुकूल असल्याने यांच्या लागवडीत दिवसेंदिवस अधिकच भर पडत आहे. परकीय चलने मिळवून देणारी आणि बाजारात रास्तभाव मिळत असल्याने तळागाळातील कोकणातील शेतक-यांचे आंबा-काजू लागवडीकडे विशेष लक्ष आकर्षित झाले. याचं दुसरं मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र शासनाची फळबाग लागवड योजना. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यास विशेष अनुदान मिळते तसेच रोपंही पुरवली जातात. फक्त एकदा लागवड करून रोपं मोठी झाल्यावर प्रत्येक हंगामाला यातून उत्तम नफा मिळवता येतो. थोडी मेहनत घेऊन तुम्ही कोकणात आंबा - काजू लागवड करू शकता. यात अमाप नफा कमावता येतो. सोबत कोकम,  फणस, नारळ, पपया, केळी, चिकू, पेरू, आवळा आणि अननस इत्यादी फलपिकेही घेऊ शकता.

२. खैर लागवड

आंबा - काजू सोबतच खैरलाही बाजारात प्रचंड मागणी असून उत्तम बाजारभाव मिळतो. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (मग्रारोहयो) अंतर्गत खैर, साग, चंदन, बांबू इ. लागवडीसाठी शासनाकडून रोपांची देखभाल आणि संगोपन केल्याबद्दल शेतकऱ्याला आर्थिक मोबदला मिळतो. शेताच्या बांधावर किंवा शेतजमिनीवर ही वृक्ष लागवड करता येते. मग्रारोहयो चे जॉबधारक असलेले आणि स्वतःच्या नावे जमीन असणाऱ्यांनी या योजनेचा  लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायतीकडे किंवा सामाजिक वनीकरण विभागाकडे अर्ज करावा.

३. बांबू लागवड

शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी बांबू लागवड एक महत्वाचे घटक आहे. बांबूसाठी सर्वप्रकारची जमीन योग्य असते. शिवाय त्याची निगा आणि संगोपन करण्यासाठी विशेष खत - पाणी द्यावे लागत नाही. बांबूची लागवड बिया आणि कंदाद्वारे या दोन पद्धतीत करता येते. बांबू, विक्रीसह अनके उपयोगात आणता येतो. जसे की, बांधकाम,  हस्तकेलच्या वस्तू बनवणे, कोंबांपासून भाजी, शिडी, टोपली, सुपे, शेतीची अवजारे, टेबल-खुर्ची आणि दरवाजे इत्यादी सारख्या अनेक वस्तू बांबूपासून बनवल्या जातात. बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून अटल बांबू समृद्धी योजना सुरू केली आहे. त्यात शेतकऱ्यांना विशेष अनुदान मिळते. त्यासाठी तुम्ही बांबू विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर जाऊन बांबू शेतीसाठी असलेल्या अनुदानाची माहिती आणि ऑनलाईन अर्ज करू शकता.

४. काळीमिरी लागवड

कोकणातील हवामान मसाल्याच्या पदार्थ उत्पादनासाठी पूरक आहे. काळीमिरीला मसाल्याच्या पदार्थामध्ये 'मसाले पिकांचा राजा' आणि 'काळे सोने' असे संबोधले जाते. भारतात विविध मसाले पिकांपासून मिळणा-या एकुण परकीय चलनापैकी 70 टक्‍के परकीय चलन एकटया काळ्या मिरीपासून मिळते. भारतात उत्‍पादन होणा-या एकूण काळी मिरीपैकी 98 टक्‍के उत्‍पादन एकटया केरळ राज्‍यात होते. त्‍याखालोखाल कर्नाटक व तामिळनाडुचा क्रमांक लागतो. मात्र कोकण विभागात तुरळक मिरी लागवड करणारे शेतकरी आढळतात. कोकण किनारपट्टीतील हवामान या पिकाच्‍या लागवडीस अनुकूल असल्‍याने परसाबागेतील आंबा, फणस किंवा नारळ सुपारी यांसारख्‍या कोणत्‍याही झाडावर वेल चढवून मिरी लागवड करता येते. काळीमिरी सोबतच जायफळ, वेलची,दालचिनी इत्यादी उत्पादने घेऊ शकता. काळी मिरीची रोपे शेतक-यांना लागवडीच्या क्षेत्र विस्‍तावर 50 टक्‍के अनुदान शासनाकडून मिळते. 

५. हळद लागवड

हळद हे कोकणातील महत्त्वाचे भविष्यातील कृषी उत्पादन आहे. काळीमिरी सोबतच हळद हे एक मसालेचे पदार्थ वर्गातील प्रमुख पीक म्हणून ओळखले जाते. भारतात उत्पादनाचा विचार केला असता प्रथम क्रमांक आंध्रप्रदेश असून त्यानंतर ओरिसा, तामिळनाडू आसाम, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा क्रम लागतो. कोकण विभागातही हळद लागवडीसाठी अनुकल वातावरण उपलब्ध आहे.  हळदीचा उपयोग रोजच्या आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनांमध्ये, जैविक कीटकनाशकांमध्ये मोठया प्रमाणावर केला जातो. सामाजिक कार्यातही हळदीला खूप महत्त्व आहे. हळदीच्या लागवडीमध्ये सर्वात कठीण बाब म्हणजे हळदीची पूर्वमशागत व काढण प्रक्रिया होय. यामुळे हळदीला चांगला भाव असूनही शेतकरी या पिकाची लागवड सहसा करत नाहीत. परंतु सध्या हळद पिकामध्ये झालेल्या यांत्रिकीकरणासोबतच व हळदीच्या औषधी गुणधर्मामुळे हळदीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढणार आहे.


६. मत्स्यव्यवसाय (मत्स्योद्योग किंवा मत्स्यशेती)

कोकणातील लहान - मोठ्या नद्या, दऱ्या आणि समुद्राला जोडणाऱ्या खाड्या आणि 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा असल्याने मत्स्यव्यवसाय हा कोकणातील एक  प्रमुख व्यवसाय आहे. महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळच्या वतीने मत्स्यव्यवसायाला भविष्यात अधिक  चालना मिळावी म्हणून महाराष्ट्रात खाऱ्या/गोड्या पाण्यातील मत्स्यबीजाचे वितरण, जलाशय विकास योजना,  मच्छिमारांसाठी साधन सामुग्री व्यवस्थापन योजना इ. प्रस्तावित आहेत यात कोकणाविभागाचाही समावेश आहे. त्यामुळे भविष्यात मत्स्यव्यवसायाला कोकणात जास्त वाव आहे. त्यामुळे तुमच्या आवारातही *** पद्धतीने गोड्या आणि ख्याऱ्या पाण्याच्या मास्यांची शेती करता येऊ शकते.

७. दुग्ध व्यवसाय (पशुपालन)

शेतीव्यवसायला जोडधंदा म्हणून पशुपालन हा व्यवसाय फार पूर्वीपासून केला जातो. समाजातील मोठा घटक या व्यवसायावर अवलंबून आहे. यात मुख्यतः गाई, म्हशी, शेळीचे पालन केले जाते. या उद्योगाला चालना देण्‍यासाठी राज्य शासनाने सहा दुधाळ संकरित गाई/म्‍हशींचे गट वाटप करणे ही राज्‍यस्‍तरीय योजना सुरु करण्‍यात आली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्‍यांना 6 दुधाळ जनावरांचा एक गट वाटप करतांना 50 टक्‍के अनुदान तर अनुसूचित जाती/जमातीच्‍या लाभार्थ्‍यांना 75 टक्‍के शासकीय अनुदान मान्य केले आहे. याशिवाय नुकतीच सुरू करण्यात आलेली  शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत गाय व म्हैस पक्का गोठा बांधणे, शेळी/मेंढी पालन शेड बांधणे इत्यादी शासनाकडून लाभ मिळवता येतो. शेतीला पूरक व्‍यवसाय म्‍हणून दुग्‍ध व्‍यवसायाची जोड दिल्‍यास शेतक-यांना वर्षभर खात्रीशीर उत्‍पन्‍न मिळते.

८. कुक्कुटपालन

पशुपालनासोबत कुक्कुटपालन (कोंबडीपालन) हा सुद्धा एक प्राचीन व्यवसाय आहे. मांस आणि अंडी याचा वाढता वापर लोकांच्या दैनंदिन जीवनात अधिकाधिक दिसून येतो. त्यासाठी कुक्कुटपालन केल्यास हमखास उत्तम नफा मिळवता येऊ शकतो. या व्यवसायास चालना मिळावी म्हणून तलंग वाटप, कुक्कुट पक्षाचे गट वाटप आणि शरद पवार ग्रामसमृद्धी योजने अंतर्गत कुक्कुटपालन शेड उभारणी इत्यादी सारख्या अनके योजना महाराष्ट्र सरकारामार्फत राज्यात राबवल्या जात आहेत. 

९. मधमाशी पालन (मधुमक्षिका पालन)

मध आणि त्यापासून बनविण्यात येणारी उत्पादने यांची बाजारात वाढती मागणी पाहून हा उद्योग अधिक उत्पन्न देणार उद्योग म्हणून उदयास येत आहे. मध आणि मेण ही दोन उत्पादने मधमशिपालनातून मिळतात. मधमाशांचं संगोपन शेतावर किंवा घरच्या आवारात पेट्यांमध्ये करता येते. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधमाशा पालन उद्योग राबविला जातो. त्यात मध उद्योगासाठी आवश्यक असलेली साहित्य मधपेट्या (वसाहतीसह) मधयंत्र व अन्य साहित्य पुरविण्यात येते. शासनाकडून यात 80 टक्के अनुदान असते, तर 20 टक्के रक्कम परतफेड करायची असते. साधारणपणे 45 हजार रुपयांना मधमाशांच्या 10 पेट्या मिळतात. 

१०. मशरूम शेती (अळंबी उत्पादन)

पावसाळ्यात रुजून येणारी मशरूम ही वनस्पती बुरशी गटात मोडते. मशरूमची शेती ही एकप्रकारे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. आवश्यक असलेले अभ्यास आणि प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय कोकण विभागात देखील करता येतो. यात मुख्यतः भाताच्या पेंढयाचा वापर करता येऊ शकतो. मशरूमची वाढती मागणी आणि औषधी गुणधर्मामुळे या व्यवसायात नव्याने उतरण्यासाठी खूप मोठी संधी आहे. केंद्र शासनाकडून यासाठी अनुदानही मिळते. 

मित्रहो, याशिवाय पर्यटन व्यवसाय, फुलशेती, वनशेती, भाजीपाला शेती यांसारखे अनके फायदेशीर व्यवसाय-उद्योगधंदे आहेत जे कोकण विभागात किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही ग्रामीण भागात सहजरित्या सुरू करता येऊ शकतात. वरील नमूद केलेल्या व्यवसायची सुरवात कशी करावी? त्याची प्रक्रिया काय आहे? शासनाकडून अनुदान किती मिळते? शासकीय योजना काय आहे? योजनेची पात्रता त्यासाठी अर्ज कुठून आणि कसा करता येऊ शकतो ? याबद्दलची अधिक माहिती तुम्हाला पुढील लेखात वाचायला मिळेल. वरील माहिती आवडल्यास टिपण्णी करून नक्की कळवा आणि आपल्या मित्र-परिवार मध्ये शेअर करा.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

•  गावचा सरपंच कसा असावा? | असा असावा आदर्श सरपंच

•  ग्रामपंचायतीला एका वर्षात किती निधी मिळतो?

•  पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना संपुर्ण माहिती | लाभ घेण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या