पार्लेश्वर वडापाव सम्राट मा. श्री वसंत नामे - एक मुलाखत | Parleshwar vada pav samrat

 पार्लेश्वर वडापाव सम्राट मा. श्री वसंत नामे

Parleshwar Vada Pav Samrat Vasant Name  दिनांक ४ जानेवारी, २०१७ रोजी सायंकाळी ६ वा. झी युवा या मराठी चॅनलवर विलेपार्लेतील प्रसिद्ध पार्लेश्वर वडापाव सम्राट Famous Vada Pav in Mumbai , मुंबईतून द्वितीय क्रमाकाचे मानकरी असलेले मा.श्री वसंत नामे यांनी दिलेली मुलाखत. (श्री.वसंत नामे सह पत्नी सौ.शुभदा नामे यांच्या समवेत).
 
संचालन       : अपूर्व रांजणकर आणि स्नेहा चव्हाण
चॅनल           : झी युवा मराठी
कार्यक्रम      : युवागिरी
स्थळ           : पार्लेश्वर वडापाव सम्राट, विलेपार्ले, मुंबई

Vasant Name Parleshwar Vadapav Samrat

अपूर्व: सर मला सांगा, कसं उभं केलत? कुठून सुरवात झाली पार्लेश्वर वडापावची ?

वसंतजी: पार्लेश्वर वडापावची सुरवात साधारणतः १९८६ साली विलेपार्ले मधेच झाली. आज जवळ जवळ ३२ वर्षे झाली. त्यावेळी घरची परिस्थिती थोडी कठीण होती.अश्या वेळेस ह्या मॅडमने (पत्नी- सौ. शुभदा वसंत नामे) काहीतरी जोडधंदा सुरु करूया असे सांगितले. मग मी ही ठरवले काहीतरी नक्की करूया जेणेकरून घर- संसार सुरळीतपणे चालेल. आई ने ही होकार दिला आणि त्यानंतर घरातील सगळ्यांचाच होकार मिळाल्यावर लोकांच्या सेवेसाठी आम्ही सादर झालो.

स्नेहा: म्हणजे पूर्ण फॅमिली आहे यामध्ये?

वसंतजी: हो! पूर्ण फॅमिली आहे यामध्ये.

स्नेहा: मुली? मुलं?

वसंतजी: फक्त मुलगी नाही त्याची चिंता वाटते.

अपूर्व: मग तुमची मुलं ही आहेत ना आता इथे?

वसंतजी: हो आहे ना. इथे एक प्रशांत म्हणून आहे.

(दोघेही प्रशांत ला हाय करतात)

अपूर्व: तर ३२ वर्षापूर्वी ही एवढंच मोठं होतं तेव्हा?

वसंतजी: नाही. त्यावेळेस एक छोटीशी वडापावची गाडी होती. पार्ल्यामध्ये वडापाव Parleshwar Vada Pav Centre टाकायचा हे कठीणच होतं. कारण पार्लेकर म्हणजे टेस्ट ओळखणारी लोकं त्यांना त्यांच्या पसंतीच दिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलो. त्याप्रमाणे क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्हीवर भर दिला. त्यामुळेच पार्लेकर आमच्या पर्यंत पोहोचले.

स्नेहा: काहीतरी असं हटके असेल तुमच्या वडापाव मध्ये त्यामुळे एवढी गर्दी जमा होते. साधारणतः किती माणसे दररोज येतात?

वसंतजी: जरा अपेक्षेपेक्षा जास्त. म्हणजे जशी आम्ही अपेक्षा ठेवतो.
येथून डहाणूकर कॉलेज, साठये कॉलेज जवळ आहे. ती मुलं जास्त प्रमाणात या इकडे येतात आणि जसं त्यांना हवं असतं तसं आम्ही त्यांच्यासाठी सादर करतो. आताचं फॅड म्हणजे चायीनिजचे. तर व्हेज चायीनिज भजी शरीराला अपायकारक होणार नाही अश्या चांगल्या तऱ्हेने बनवून देतो.

अपूर्व: मी एक बाहेर बोर्ड बघितला. ५००० मुलांना दोन वडापाव फ्री! काय आहे हे नेमकं?

वसंतजी: हे म्हणजे कॉलेजच्या मुलांचं प्रेम आहे आमच्यावर!!
दरवर्षी ठरलेलं असतं प्रत्येक जानेवारीच्या महीन्यामधे कॉलेजच्या मुलांना प्रत्येकाला एक कुपन देऊन दोन दोन वडापाव फ्री देतो. आणि हे जवळ जवळ ५००० विद्यार्थ्यांना देतो. आणि दुसरी एक कल्पना अशी आहे की, शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी ह्या दोघानां एक 'स्मार्ट कार्ड' दिलेलं आहे. स्मार्ट कार्ड याचा अर्थ जवळ जवळ १५ रुपये वडापाव आहे तो ते स्मार्ट कार्ड दाखवून मुलांना फक्त १० रुपयात मिळतो आणि ते फक्त पार्लेश्वर मध्ये. आणि यामुळे त्यांचे पालक लोकं ही आमच्यावर नेहमी खुश असतात. दुसरं म्हणजे वडापाव खायला आलेल्यांचा फोटो काढून इथे लावले जातात. त्यांना इथे हिरो बनवलं जातं. त्यांनंतर ते काय करतात आपले फोटो काढून दुसर्यांना दाखवतात. आणखी एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते. वडापाव बरोबर आम्ही ग्रीन सलाड फ्री देतो. ग्रीन सलाड हे पोटासाठी चांगले असते असा डॉक्टरांचा नेहमीच सल्ला असतो. त्यामुळे तो आम्ही वडापाव सोबत लोकांना देतो. आणि पाहिजे तेवढा देतो. मागितला की आणखी देतो.
"आपण काय देणार? तेव्हा लोकं येणार त्यावर आपलं सगळं गणित अवलंबून असतं."

स्नेहा: सेलीेब्रिटिस ही भरपूर येतात इथे?

वसंतजी: हो! सेलीेब्रिटिसचे फोटो लावले आहेत इथे. याचे कारण की आज जवळ जवळ ३२ वर्ष झाली आम्ही या मध्ये आहे. तर अशी एक कल्पना सुचली का नाही एखाद्या वडापावला पंचविसाव्या वर्षी साजरा का नाही करू शकत? म्हणून ते पार्लेश्वर वडापावचं पंचविसावं वर्ष आम्ही तीन दिवस साजरी केलं. या मध्ये सगळे सेलीेब्रिटिस सामाजिक, शैक्षणिक,आणि वैद्यकीय या क्षेत्रातल्या लोकांना बोलवून त्यांचा सन्मान केला. त्या प्रेमापोटी मोठी मोठी लोक जसे विठ्ठल कामत सर यांच्याही शुभेच्छा आम्हाला भेटल्या.

अपूर्व: मला सांगा सर! पार्ल्यात तर आहेच, मुंबईतही फेमस आहेच. पण तुमच्या अजून कुठे शाखा आहेत काय?

वसंतजी: याचा ही विचार केला आहे मी. जसं पार्ल्यामध्ये आम्ही लोकांची सेवा करत आहोत. त्याप्रमाणे मुंबईतही करावी त्या उद्देशाने जवळ जवळ आम्ही दादर जे मुंबईचे हृदयस्थान आहे जर तिथेही आम्ही गेलो आणि तिकडे ही हा वडापाव लोकांपर्यंत पोहचला तर पूर्ण मुंबई मध्ये या वडापावच नाव होईल. असं माझं स्वप्न होतं. त्याप्रमाणे मी जवळ जवळ ४ वर्षापुर्वी एका वहिमध्ये लिहून ठेवलं होतं. आणि ते मी पूर्ण करून दाखवलं आणि आमच्या सेवा दादर पूर्व आणि दादर पश्चिम Famous Vada Pav in Dadar इकडे ही पोहचल्या.

अपूर्व: मग तिकडे दादरेश्वर असे नाव आहे काय?

वसंतजी: (हसून..) पार्लेश्वर हा ब्रँड आहे.पार्ल्यातील पार्लेश्वर मंदिराच्या समोर वडापावची गाडी उभी करून संकल्प केला होता. म्हणून पार्लेश्वर हा ब्रँड पूर्ण मुंबईमध्ये 'पार्लेश्वर' या नावानेच पोहचेल. त्याला त्याची ओळखच ती आहे. पार्लेश्वर वडापाव सम्राट. 'सम्राट 'ही लोकांनी दिलेली पदवी आहे आम्ही नाही लावली. आणखी एक बोलायचं राहून गेलं. इकडचा जो पूर्ण मसाला आहे तो तीस वर्षा पासून आमच्या मॅडम(पत्नी) करतात.

अपूर्व: धन्यवाद! थँक्यू सो मच!!

वसंतजी: धन्यवाद! !

समाप्त!

•  गावचा सरपंच कसा असावा? | असा असावा आदर्श सरपंच


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या