ग्रामपंचायत नमुने 1 ते 33 (अभिलेख) Gram panchayat namuna 1 to 33


ग्रामपंचायत नमुने 1 ते 33 (अभिलेख ) Gram panchayat namuna 1 to 33 भारतीय प्रशासनाच्या संरचनेतील अंतिम टप्प्यातील स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायतीला अनन्य साधारण महत्व आहे. तीला सुव्यवस्था प्राप्त होण्यासाठी व ग्रामपंचायतीने केलेली कामे व व्यवहार यांच्या नोंदी ठेवण्यासाठी एकूण ३३ Gram panchayat namuna नमुन्यात कामकाजाची नोंद ग्रामपंचायतीला ठेवावी लागते. त्या नूमुन्यांना ग्रामपंचायत अभिलेख नमुने 1 ते 33 'ग्रामपंचायतीचे अभिलेख' किंवा 'ग्रामपंचायतीच्या नोंदवह्या' असेही म्हटले जाते. हे नुमने म्हणजे ग्रामपंचायतीचा आत्मा असतो. काही नमुने वर्षाच्या सुरवातीला तयार होतात तर काही वर्षाच्या शेवटी तर, काही ठराविक असतात. विविध नमुन्यात विविध कामांच्या नोंदी वर्गीकृत करून त्या जतन व अद्ययावत ठेवणे ग्रामपंचायतीला बंधनकारक असते.

ग्रामपंचायत नमुने १ ते ३३ | gram panchayat namuna 1 to 33 marathi | ग्रामपंचायत अभिलेख नमुने 1 ते 33

ग्रामपंचायत नमुने १ ते ३३:

ग्रामपंचायत नमुना १ - अर्थसंकल्प/अंदाजपत्रक

पुढील आर्थिक वर्षाकरिता जमा खर्चाचा अंदाजित अहवाल म्हणजे अर्थसंकल्प अधिनियमाचे कलम ६२ अन्व्ये ग्रामपंचायतीने डिसेंबरपूर्वी पंचायत समितीकडे सादर करणे आवश्यक आहे. त्या अर्थसंकल्पास फेब्रुवारी सभेत पंचायत समिती मान्यता देईल व मार्च पूर्वी ग्रामपंचायतकडे परत करतील.


ग्रामपंचायत नमुना २ : पुनर्विनियोजन व नियत वाटप

मूळ अर्थसंकल्पातील एखाद्या प्रमुख शीर्षावर खर्चात वाढ/घट करायची असेल तर सुधारित अर्थसंकल्प करणे आवश्यक आहे. सुधारित अर्थसंकल्प ग्रामपंचातीच्या आवश्यकतेनुसार करता येईल. मूळ अर्थसंकल्पप्रमाणे यालाही पंचायत समितीची मंजुरी आवश्यक आहे.

ग्रामपंचायत नमुना ३ : ग्रामपंचायत जमा खर्च विवरण

ग्रामपंचायत वर्षाअखेरीस मत्ता आणि दायित्वे यांचे विवरण तयार करून ग्रामसभेपुढे ठेवतील आणि जूनपूर्वी पंचायत समितीला सादर करतील. हेच विवरण ग्रामपंचायत ग्रामसभेला सादर करतील. चर्चाअंती ग्रामसभेने दिलेल्या सूचनांची नोंद ग्रामपंचायत घेईल.

ग्रामपंचायत नमुना ४: ग्रामपंचायतीची मत्ता व दायित्वे

ग्रामपंचायत वर्षाअखेरीस मत्ता आणि दायित्वे यांचे विवरण तयार करून ग्रामसभेपुढे ठेवतील. आणि जूनपूर्वी पंचायत समितीला सादर करतील. ग्रामपंचायतीकडून देय असलेल्या थकीत रक्कमा/देयक म्हणजे दायित्व व ग्रामपंचतीला येणे असलेल्या रक्कमा म्हणजे मत्ता.

ग्रामपंचायत नमुना ५: सामन्य रोकड वही

ग्रामपंचातीच्या रोजच्या आर्थिक व्यवहाराची नोंद वही म्हणजे 'सामान्य रोकड वही'. ग्रामपंचायत प्राप्त झालेली प्रत्येक रक्कम नमुना ७ व नमुना १० याच्या नोंदी यात असतील. रोजचा व्यवहार संपताच रोकडवही बंद केली जाईल. अखेरीस असेलेली शिल्लक आकड्यात व अक्षरात लिहून सरपंच/सचिव स्वाक्षरी करतील. महिन्याच्या अखेरीस मासिक गोषवारा काढून पास बुकातील नोंदीशी मेळ घालण्यात येईल.

ग्रामपंचायत नमुना ५ क: दैनिक रोकडवही

प्रथम नमुना ७, नमुना १० व धनादेश यांची नोंद यामध्ये घेतली जाईल. आणि दैनिक एकत्रित रक्कम नमुना ५ मधील सामान्य रोकडवही मध्ये नोंद घेतल्या जाईल. प्रत्येक आठवड्याला सरपंच/सचिव सर्व पावत्या व धनादेश यांचा मेळ घेऊन स्वाक्षरी करतील.

ग्रामपंचायत नमुना ६ : जमा रकमांची वर्गीकृत नोंदवही (मासिक)

ही नोंद एक महत्वाचे अभिलेख आहे. यातील नोंदी नुसारच मासिक व वार्षिक जमा खर्चाचा हिशोब काढण्यात येतो. अर्थसंकल्पात नमूद केलेल्या प्रत्येक शिर्षासाठी या नोंदवहीत स्वतंत्र पानं असतात. नुमना क मध्ये दाखविण्यात आलेल्या सर्व रक्कमांची नोंद यामध्ये दाखविण्यात येते. प्रत्येक महिन्याचा हिशोब पूर्ण केल्यानंतर ग्रामपंचायतीचे सचिव नुमना २६ क, २६ ख मधील जमा खर्चांचे मासिक विवरण तयार करून पंचायत समितीकडे पाठवितात.

ग्रामपंचायत नमुना ७ : सामन्य पावती

ग्रामपंचायतीस प्राप्त झालेल्या विशिष्ट रक्कमेसाठी उदा. सर्व प्रकारची फी, अंशदान, देणगी इ. साठी रक्कम प्राप्त झाल्याची पोच पावती म्हणून नमुना ७ चा वापर होतो. रु. ५०००/- पेक्षा अधिक रक्कमेसाठी सर्व पावत्यावर महसुल मुद्रांक लावणे आवश्यक आहे. या सर्व पावत्यांची नोंद नुमना ५ क व नुमना ६ मध्ये घेण्यात येते.

ग्रामपंचायत नमुना ८: कर आकारणी नोंदवही

ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १२४ अन्वये ग्रामपंचायतीचे अधिकार क्षेत्रातील करास (Tax) पात्र असलेल्या सर्व जमिनी व इमारती यांची ग्रामपंचायतीने मान्यता दिलेली यादी म्हणजे कर आकारणी नोंदवही.

ग्रामपंचायत नमुना ९:  कर मागणी नोंदवही

नमुना ८ प्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या कराच्या रक्कमेच्या नोंदीची यादी म्हणजे कर मागणी नोंदवही. कर आकारणी नोंदवही मधील एकूण रक्कम ही कर मागणी नोंदवही मधील चालू वर्षाची मागणीची रक्कमे एवढीच असल्याची खात्री सचिव/सरपंच करतात. प्रत्येक दिवशी झालेल्या वसुलीची नोंद यामध्ये घेण्यात येते. वर्ष अखेरीस सरपंच / सचिव यांना नुमना नोंदवहीत नोंदविण्यात आलेल्या कराच्या वसुलीची एकूण रक्कम आणि नमुना ६ मधील वर्गीकृत नोंद केलेली रक्कम यांची पडताळणी करावयाची असते.


ग्रामपंचायत नमुना ९ क: कराची मागणी पावती

ग्रामपंचायत कर मागणी नोंदवही मधील प्रत्येक कर दात्यावर नमुना नं ९ क प्रमाणे कर मागणी बिल बजावले. मागणी बिल दिल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीकडून पंचायतीचे येणे असल्याचे सिद्ध होत नाही. मागणी बिल बजावून कर न भरल्यास कलम १२९ (२) प्रमाणे कर मागणी नोटीस बजावण्यात येईल.

ग्रामपंचायत नमुना १० : कर व फी बाबत पावती

ग्रामपंचायतीस कराच्या रूपात प्राप्त झालेल्या प्रत्येक रक्कमेसाठी पंचायत करदात्यास नमुना १० मधील पावती देण्यात येईल. अशा सर्व पावत्यांच्या नोंदी त्याच दैनिक रोकडवही नमुना ५ क मध्ये घेण्यात येते. त्या सर्व रक्कमांची (नमुना ६) वर्गीकरण नोंदवहीत घेण्यात येते.

ग्रामपंचायत नमूना ११ : किरकोळ मागणी नोंदवही

कर व फी व्यतिरिक्त इतर जमा होणाऱ्या रक्कमेची मागणी यामध्ये असते उदा:  नोटीस बजावणीसाठी आकारली जाणारी फी, शासनाकडून मिळालेला जमिन महसूल, माती, शेण यांसारख्या बाबींपासून मिळालेले उत्पन्न, जिल्हा परिषदेकडून मिळालेले अनुदान, फिरती सिनेमागृह, सर्कस, पर्यटकांकरिता दिलेल्या तात्पुरत्या खोल्या, बाजार यांचे भाडे यासाठी नमुना ७ पावतीचा वापर करण्यात येतो. सर्व पावत्यांची नोंद दैनिक रोकड वही नमुना नं. ५ क मध्ये घेण्यात येते.

ग्रामपंचायत नमुना १२: आकस्मिक खर्चाचे प्रमाणक 

कोणतीही रक्कम काढावयाची असेल तर प्रमाणकाचे आधारावर काढावी लागते. प्रत्येक विशिष्ट नमुन्यातच तयार करावी लागते. ग्रामपंचायत दैनंदिन कार्यालयीन खर्चासाठीचे देयक नमुना नं. १२ ला जोडण्यात येतो. प्रमाणित करून मिळालेले साहित्यसाठा नोंदवही मध्ये नोंदणी करूनच सरपंचाच्या मान्यतेने ग्रामनिधीतून रक्कम काढण्यात येते.

ग्रामपंचायत नमुना १३ : कर्मचारी वर्गाची सूची व वेतनश्रेणी नोंदवही

या नमुना नोंदवहीत ग्रामपंचायतीच्या आस्थापनेचा तपशील असतो. प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तींची नोंद, मंजूर पदे व   कार्यरत कर्मचारी यामधील तफावत वेळोवेळी तपासण्यात येते. आस्थापनेत वेळोवेळी झालेल्या बदलाची नोंद घेऊनच सरपंचाला स्वाक्षरी करावयाची असते.

ग्रामपंचायत नमुना १४: मुद्रांक हिशोब नोंदवही

यामध्ये खरेदी केलेले व वापरलेल्या मुद्रांकांची नोंद घेतली जाते. दरमहा ग्रामसेवक/सचिव पडताळणी करून स्वाक्षरी  करतात.

ग्रामपंचायत नमुना १५ : उपभोग्य वस्तूंसाठी नोंदवही

यामध्ये खरेदी केलेली सर्व पावती पुस्तके, धनादेश पुस्तके, लेखन सामग्री व इतर खरेदी केलेल्या वस्तू यांची नोंद हिशोब या नमुन्यात असतो. प्रत्येक नोंदीपुढे सरपंचाची स्वाक्षरी आवश्यक असते. या नोंदवहीत नोंद घेतल्यानंतरच देयक अदा करता येतात.

ग्रामपंचायत नमुना १६ : जड वस्तू संग्रह व जंगल मालमत्ता नोंदवही 

यामध्ये जड वस्तू उदा. टेबल, खुर्ची, घड्याळ, कपाट यांसारख्या कायम व टिकाऊ स्वरूपाच्या सर्व वस्तूंची नोंद स्वतंत्र पानांवर घेतली जाते. त्यावर सरपंच स्वाक्षरी करतात.

ग्रामपंचायत नमुना १७ : अग्रीम दिलेल्या/अनामत ठेवलेल्या रक्कमांची नोंदवही 

ग्रामपंचायत वेगवेगळ्या कारणांसाठी कर्मचाऱ्यांना अग्रीम मंजूर करून नियमित वसुली करीत असते. त्यांच्या नोंदी नमुना १७ मध्ये घेतल्या जातात. ग्रामपंचायतीकडे जेव्हा अनामत रक्कमां जमा होतात, त्यांची नोंद नमुना नं. ५ क दैनिक रोकड नोंद वहीत घेवून यामध्ये घेण्यात येते. ग्रामपंचायतीच्या पूर्व मंजुरी शिवाय कोणतीही रक्कम परत करता येत नाही. परत केलेल्या रक्कमेची नोंद यामध्ये घेण्यात येते.

ग्रामपंचायत नमुना : १८ किरकोळ रोकडवही

रुपये ५०० पेक्षा कमी असलेल्या रक्कमेचे प्रदान दर्शनी धनादेशाद्वारे करून त्याची नोंद यामध्ये करण्यात येते. अश्या किरकोळ रक्कमेचे प्रदान प्रमाणकाच्या आधारे करून, यामध्ये नोंद घेतली जाते. किरकोळ रक्कमेच्या सरपंचाची मंजुरी घेऊन धनादेशाद्वारे बँकेतून रक्कम काढून अदा करता येते व तशी नोंद यामध्ये घेण्यात येते.

ग्रामपंचायत नमुना १९ : कामावर असलेल्या व्यक्तींचा हजेरीपट

ग्रामपंचायतीने कोणत्याही कामावर रोजंदारीवर लावलेल्या मजुरांची नावे या नमुन्यात असतात. हजेरीपटाची एकच प्रत असते. त्याला अनुक्रमांक देऊन ग्रामपंचायतीच्या शिक्याने प्रामाणित केलेले असते. हजेरीपटाचा हिशोब नमुना १५ मध्ये असतो. हजेरीपटाचा कालावधी संपल्यानंतर सरपंच मंजूरी देतील व आवश्यक तेथे मुद्रांकावर स्वाक्षरी घेऊन मजुरी अदा केली जाईल.

ग्रामपंचायत नमुना २०: कामाच्या अंदाजाची नोंदवही 

प्रशासकीय मंजुरीसाठी प्रस्तावित असलेल्या कामाचा तपशीलवार आराखडा व अंदाजित खर्चाचा तपशील या नमुन्यात असतो.

ग्रामपंचायत नमुना २० क : मोजमाप वही 

पंचायतीने केलेल्या किंवा कंत्राट दराने केलेल्या कामाचे मोजमाप पंचायत  समितीच्या अभियंत्यांकडून यामध्ये नोंदविण्यात  येते.


ग्रामपंचायत नमुना २० ख : कामाचे देयक

ग्रामपंचायतीने केलेल्या कामाचे मोजमाप करून मोजमाप वहीत नोंद केल्यानंतर कामाचे देयक या नमुन्यात करण्यात येते. मोजणी पुस्तकातील परिणाम व दर अचूक असल्याची खात्री करून सरपंच/ सचिव यांची स्वाक्षरी असते. 

ग्रामपंचायत नमुना २० ख १ : कामाचे देयक 

कामाच्या अंदाजाची नोंदवही, मोजमाप वही, कामाचे देयक या खर्चाची पडताळणी करून रक्कम प्रदान करण्यात येते. 

ग्रामपंचायत नमुना २१ : कर्मचाऱ्याच्या देयकाची नोंदवही 

ग्रामपंचायतीमधील कायमस्वरूपी नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतनाचे देयक तयार करण्यासाठी या नमुन्याचा उपयोग होतो. यामध्ये कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी, मत्ता, होणाऱ्या कापती व निव्वळ द्यायची एकूण रक्कम यांचा हिशोब असतो.

ग्रामपंचायत नमुना २२: स्थावर मालमत्ता नोंदवही ( रस्ते व जमिनी व्यतिरिक्त )

ग्रामपंचायतीच्या मालकीच्या असेलेल्या स्थावर मालमत्तेच्या नोंदणी यात असतात. प्रत्येक मालमत्तेला एक स्वतंत्र पान असते. कोणतीही स्थावर मालमत्ता संपादित करण्यात येईल किंवा हस्तांतरित करण्यात येते. तेव्हा ती प्राप्त झाल्याची नोंद यात असते. ज्यावेळी सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीने मालमत्तेची विल्हेवाट करण्यात येईल. तेव्हा त्यातून प्राप्त झालेल्या रक्कमा ग्रामनिधीत जमा होतात त्याची नोंद यात असते. प्रतिवर्षी एप्रिल मध्ये ही नोंद सरपंच /सचिव यांच्याकडून प्रमाणित केली जाते.

ग्रामपंचायत नमुना २३: ताब्यातील रस्त्यांची नोंदवही

ग्रामपंचातीच्या हद्दीतील रस्त्यांच्या सर्व नोंदी लांबी, रुंदी व इतर तपशिलासही यामध्ये असतात. ग्रामपंचायत जेव्हा रस्त्याचे काम करील त्यावेळी सर्व स्तंभात आवश्यक माहितीसह नोंदी घेतल्या जातात. प्रतिवर्षी एप्रिल मध्ये हि नोंदवही सरपंच/सचिव यांचेकडून प्रमाणित केली जाते.

ग्रामपंचायत नमुना २४: जमिनीची नोंदवही 

ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या, संपादित केलेल्या, शासनाकडून हस्तांतरित केलेल्या, सर्व जमिनी, मोकळ्या जागा, पडीत जमिनी, गायरान इत्यादी सविस्तर नोंदी या नमुन्यात ठेवल्या जातात.

ग्रामपंचायत नमुना २५: गुंतवणूक वही 

ग्रामपंचायतीने केलेल्या सर्व प्रकारच्या गुंतवणुकी, त्यावर मिळणारे व्याज, त्याची मुद्दल याबद्दलचा तपशील यात असतो. दरमहा सर्व साधारण रोकड वही नमुना नं. ५ यांच्याशी मेळ घालून प्रमाणित करण्यात येते. 

ग्रामपंचायत नमुना २६ क: जमा मासिक विवरण 

प्रत्येक महिन्यात मासिक हिशोब पूर्ण केल्यानंतर, मासिक विवरण यामध्ये तयार करून सचिव प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपूर्वी पंचायत समितीकडे पाठवील.

ग्रामपंचायत नमुना २६ ख: खर्चाचे मासिक विवरण

ग्रामपंचायत प्रत्येक महिन्यात मासिक हिशोब पूर्ण केल्यानंतर, मासिक विवरण पत्र यामध्ये तयार करून सचिव प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपूर्वी पंचायत समितीकडे पाठवील.

ग्रामपंचायत नमुना २७: लेखा परीक्षणातील आक्षेपांच्या पूर्ततेचे मासिक विवरण

लेखा परीक्षकांचा अहवाल प्राप्त झाल्यावर अनुपालन तयार करून पंचायत समितीकडे पाठवलेले, पंचायत समितीने निकाली काढलेले, लेखा परीक्षकाने ,मान्य व प्रलंबित असेलेले लेखा आक्षेपांची नोंद या नमुन्यात केली जाते.

ग्रामपंचायत नमुना २८: मागासवर्गीय १५ टक्के व महिला बालकल्याण १० टक्के करावयाचे खर्चाचे मासिक विवरण नोदनवही 

या दोन्ही शीर्षाखाली होणाऱ्या खर्चाचे मासिक विवरण यामध्ये असते. याचा अहवाल सचिव दरमहा पंचायत समितीकडे सादर करतील. 

ग्रामपंचायत नमुना २९: कर्जाची नोंदवही

यामध्ये ग्रामपंचायतीने घेतलेली कर्ज, व्याज व कर्जाची केलेली परतफेड यांचे विवरण असते. ज्या प्रयोजनासाठी कर्ज घेतले असेल त्यासाठीच खर्च करणे आवश्यक आहे. अर्थसंकल्पात तरदुदी नियमितपणे कर्जाची परतफेड करण्याची तरतूद ग्रामपंचायतीला करावी लागते. 

ग्रामपंचायत नमुना ३०: ग्रामपंचायत लेखा परीक्षण आक्षेप पूर्तता नोंदवही 

यामध्ये लेखा परीक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर केलेली पूर्तता, झालेले वसुली ग्रामपंचायतीच्या ठरावासह पंचायत समितीकडे पाठविण्यात येते. 

ग्रामपंचायत नमुना  ३१: प्रवास भत्ता देयक

ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व कर्मचारी यांना दिलेल्या प्रवास भत्ता ची नोंद या नमुन्यात केली जाते. 

ग्रामपंचायत नमुना ३२: रक्कमेच्या परताव्यासाठीचा आदेश

ग्रामपंचायतीकडे ठेवी नमुना १७ मध्ये नोंद घेऊन स्वीकारल्या जातात. त्याच ठेवी परत करत असताना केलेल्या कार्यवाहीची नोंद यामध्ये ठेवण्यात येते.

हे देखील वाचा : Pm Kisan 8th Installment date Marathi पीएम किसान सन्मान निधी योजना 2021 

ग्रामपंचायत नमुना ३३: वृक्ष नोंदवही 

ग्रामपंचायतीच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची नोंद, झाडांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाची नोंद, झाड नष्ट झाले किंवा तोडले असल्यास त्या कारणांची नोंद यात ठेवली जाते. 

वाचक मित्रहो, वरील प्रमाणे प्रत्येक नमुने आणि त्याची नोंदवही ठेवणे ग्रामपंचायतीला बंधनकारक असते. या नमुन्यांचा तपशील व विवरणे माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत ग्रामस्थांना प्राप्त करता येऊ शकतात. माहिती आवड्ल्यास नक्की शेअर करा.

हे देखील वाचा : ग्रामपंचायतीचे विसर्जन

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

माहितीचा अधिकार कसा वापरावा ?

ग्रामपंचायत कर आकारणी कशी करते ?

मनरेगा योजनेचा कायदा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या